ठाणे : ठाणे महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत चार सदस्यीय ३३ प्रभागातील १३१ जागांपैकी ६६ जागा महिलांसाठी आरक्षित असतानाही तब्बल ७२ जणी निवडुन आल्या होत्या.२०२२ मध्ये त्रिसदस्यीय ४७ प्रभागातुन १४२ जागांपैकी ७१ जागा महिलासाठी आरक्षित आहेत. यात घोडबंदर,मुंब्रा-दिवा येथील ३८ प्रभागात २३ जागा महिलांना आरक्षित झाल्या असुन याही निवडणुकीत राजकिय पक्षांकडुन सर्वाधिक महिलांनाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणूकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. नौपाडा, कोपरी मध्ये सर्वसामान्य महिलांसाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित असल्याने इथे पुरूषांसाठी प्रत्येकी २ जागा मिळणार आहेत. तर कळवा आणि वागळे इस्टेट भागामध्येही महिलांना समान संधी मिळाली आहे. सोडतीत जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये दिवा आणि घोडबंदर परिसरातील बहुसंख्य प्रभागांमध्ये महिलांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
दिवा आणि घोडबंदर परिसरातील लगतच्या प्रभागांमध्ये तीन पैकी दोन ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी आरक्षण मिळाले असल्याने ठाण्यात ‘महिलाराज’ येणार आहे. दिवा आणि मुंब्र्याशी जोडणाऱ्या प्रभाग क्रमांक ४१ ते ४७ प्रभागांमध्ये अनुसूचित जातीचा अपवाद एक वगळता तीन पैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे येथील २१ नगरसेवकांपैकी १३ जागा महिलांसाठी आरक्षित असून ८ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत. तर घोडबंदर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक १ ते ६ पैकी प्रभाग क्रमांक ४ चा अपवाद वगळता इथेही महिलांचे प्राबल्य दिसून येत आहे. घोडबंदर परिसरातील प्रभागांमधून निवडून येणाऱ्या १८ पैकी १० नगरसेवक महिला असणार आहेत. त्यामुळे दिवा-घोडबंदरमध्ये महिलांचे वर्चस्व दिसून येत आहे.