ठाणे : ‘वन हक्क, वनपट्टे मिळालेच पाहिजेत,’ अशा घोषणा देत हाती फलक घेऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील शेकडो वनवासी बांधव सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. वनवासींची जमीन लाटण्यासाठी बिल्डरांना पुढे करून येथे ‘क्लस्टर योजना’ राबवण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच, 15 दिवसांत मागण्या मान्य झाल्या नाही, तर आमरण उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेले येऊर तसेच कोकणी पाडा येथे वनवासी बांधवांचे वास्तव्य आहे. या वनवासी पाड्यांमध्ये वनवासींना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी दररोज भांडावे लागत आहे. सोमवारी शेकडो वनवासी बांधव त्यांच्या वनवासी पाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत मोर्चा घेऊन आले. २००९ सालापासून या वनवासी पाड्यांमध्ये वनहक्काचे दावे प्रलंबित आहेत. तीन वर्षांपूर्वी हे दावे मंजूर करण्यात आले. मात्र, त्यावर ठाण्याच्या जिल्हाधिकार्यांनी अद्याप स्वाक्षरीच केली नसल्यामुळे ‘वन हक्क संरक्षण’ प्रमाणपत्र या वनवासींना मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना स्वतःचीहक्काची राहण्याची जमीन तसेच, विचार मूलभूत अधिकार मिळाले नाहीत. या वन हक्क प्रमाणपत्राच्या मागणीसाठी तसेच, इतर मूलभूत सुविधांच्या मागण्यासाठी वनवासी बांधव रस्त्यावर उतरले.