जगण्याची गझल करणारा गझलप्रेमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-May-2022   
Total Views |
 

mans 
 
 
एकेकाळी जगण्याचे कारण हरवले होते. रात्री अपरात्री कित्येक किलोमीटर नुसतं चालत राहायचं. मात्र, ‘तुझ्यानंतर’ पुस्तकाने सारं बदललं. जाणून घेऊया युवा गझलकार जयेश शंकर पवार याच्याविषयी...
 
मुंबईतील सांताक्रुझमध्ये जन्मलेल्या जयेश शंकर पवार याचा बालपणीचा स्वभाव मस्तीखोर होता. अभ्यासात अगदी जेमतेम असलेल्या जयेशने दहावीत अवघे ५० टक्के मिळवूनही घरच्यांना आनंद झाला. मात्र, अकरावीत अनुत्तीर्ण झाल्यानंतर जयेशने शिक्षणाला रामराम केला. यादरम्यान, जयेश एका मराठी सायंदैनिकातील शेरोशायरी एका डायरीत लिहून ठेऊ लागला. त्यामुळे वाचन वाढू लागले. मात्र, अभ्यासात त्याचे कधीही मन रमले नाही. नंतर जोगेश्वरीत एका ठिकाणी त्याने नोकरी सुरू केली. याचे त्याला महिना तीन हजार रुपये मिळत. त्यात लहान भाऊदेखील दहावीत अनुत्तीर्ण झाल्याने सगळे खापर जयेशवर फोडण्यात आले. शेवटी जयेश भावाला एका खासगी वर्गामध्ये शिकवणीसाठी घेऊन गेला. आश्चर्याची बाब म्हणजे, त्या ठिकाणी जयेशचा एक मित्र मुलांना शिकवत होता. त्यावेळी जयेश खिन्न झाला. जयेशने पुन्हा बारावी वाणिज्यला प्रवेश घेतला. जयेशने खेळासहित सर्व गोष्टी सोडल्या अन् तो ५२ टक्के मिळवून बारावी उत्तीर्ण झाला. पुढे त्याने चेतना महाविद्यालयात ‘बीकॉम’साठी प्रवेश घेतला. मात्र, इंग्रजीच्या भीतीने अनेकदा तो महाविद्यालयामध्ये जात नव्हता. यातच घरची परिस्थिती खालावत चालली होती. वडिलांचा मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय होता. मात्र,कर्जाचा बोजा वाढल्याने जयेश खासगी वर्गामध्ये अकाऊंट्स विषय शिकवू लागला. ‘बीकॉम’च्या पहिल्या वर्षातही जयेश अनुत्तीर्ण झाला आणि तो एक वर्ष घरीच थांबला. त्यात भर म्हणून बारावीचा अभ्यासक्रम बदलला आणि त्याला खासगी वर्गामध्ये शिकवणेही मुश्किल झाले आणि त्याने ती नोकरीही सोडली.
 
 
 
अखेर २०१३ साली त्याने चेतना महाविद्यालयात ‘बीए’ला प्रवेश घेतला. लायब्ररी कार्ड काढून जयेश वाचू लागला. एकांकिका, एकपात्री नाटकातही काम करू लागला. जयेशने बुद्धीबळातही राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. लेखक नितीन रिंढे हे जयेशला गुरू म्हणून लाभले. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, सुरेश भटांना जयेश वाचू लागला. मात्र, आता वाचलेलं आणि मनात साचलेलं मांडणार कुठे हा प्रश्न होता. अखेर जयेशने पहिली कविता कागदावर उतरवलीच. ‘एक पावसाचा थेंब, त्यात तुझे प्रतिबिंब। काल होतो मी कोरडा, आज झालो ओलाचिंब।’ ही कविता त्याने महाविद्यालयामधील सौमित्र कट्ट्यावर सादर केली. बोलायला कुणीही नसल्याने तो स्वतःशी संवाद साधत गेला आणि हळूहळू कविताही येत गेल्या. कविता स्पर्धांमध्ये तो बक्षिसे मिळवू लागला आणि तेच पैसे त्याला पुढे शिक्षणासाठी कामी येत गेले. पुढे मुंबई विद्यापीठात ‘एमए’साठी प्रवेश घेतला तो खास नेहरू लायब्ररीच्या आकर्षणाने. यानंतर जयेशने २०१७ साली गझलकार सुधीर मुळीक यांच्या सहकार्याने गझलेचा अभ्यास सुरू केला. ‘किती आज ओसाड झाल्यात बागा, फुलांना फुलांचाच असणार त्रागा। तुझ्या दोन ओठांत ओलावला की, किती छान जातो सुईतून धागा।’ हा त्याने लिहिलेला पहिला शेर. अखेर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जयेशने काही काळ उसंत घेत पुढे काय करायचे, यावर चिंतन केले. त्यानंतर त्याने ‘एचडीएफसी’ बँकेत नोकरी सुरू केली. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आणि वडिलांचे आजारपण बळावले. परिणामी बँकेतून वारंवार घरी यावे लागत असल्याने जयेशला ती नोकरीही सोडावी लागली. जयेश त्याच्यातील कलाकाराला मारत चालला होता. नंतर सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममताताई सपकाळ यांच्या ओळखीने जयेशने माईंच्या आश्रमात नोकरी सुरू केली. माईंच्या सान्निध्यात जयेश बदलला. माईंची ‘वाचलं पाहिजे, नम्र असावे, लोकांना देता आलं पाहिजे,’ ही शिकवण जयेशने आजही जीवापाड जपली आहे. कोरोना काळात ही नोकरीदेखील गेली आणि जयेश पुन्हा एकदा मागे गेला.
 
 
 
गझलांचे कार्यक्रमही कोरोनाने थांबले. अखेर स्वतःवर विश्वास ठेवून त्याने २०२१ साली ‘कृष्णगझल’ नावाचे ‘युट्यूब चॅनल’ सुरू केले. सोबत इन्स्टाग्राम, फेसबुक यांच्या साहाय्याने लिखाणही बहरले. आपण गेल्यानंतर आपली नोंद राहावी, मला वाचून कुणीतरी सावरावं या हेतूने त्याने ‘तुझ्यानंतर’ हे गझलांचे पुस्तक आईच्या वाढदिवशी प्रकाशित केले. अगदी अल्पावधीतच या पुस्तकाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सिंधुताई सपकाळ अर्थात माईंच्या जाण्यानेही जयेशला मोठा धक्का बसला. सध्या तो महाराष्ट्रभरातील कित्येक युवकांना गझललेखनाचे धडे देत आहेत. आतापर्यंत त्याने गझल मुशायर्‍याचे महाराष्ट्रभरात तब्बल ७८ प्रयोग केले आहेत. सध्याच्या काळानुसार जयेश गझलांचे सादरीकरण करण्यावर भर देतो.
 
 
“गझलेला ना अभ्यासक्रमात स्थान आहे, ना साहित्य संमेलनात मुख्य मंचावर. शासनाने गझलेला योग्य स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. गझलेच्या कार्यशाळा सुरू कराव्यात. पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याकडे लेखक, कवींना सन्मान व आदर मिळत नाही. मराठी भाषा, गझलेला तिचा सन्मान, दर्जा मिळायला हवा,” असे जयेश सांगतो.
 
 
 
एकेकाळी जगण्याचे कारण हरवले होते. आत्महत्येचे विचार मनात घोंघावत होते. रात्री अपरात्री कित्येक किलोमीटर नुसतं चालत राहायचं. सिद्धीविनायकला पायी जायचं. मात्र, ‘तुझ्यानंतर’ या पुस्तकाने जयेशचे आयुष्यच बदलले. महाराष्ट्राला आपल्या गझलांनी मंत्रमुग्ध करणार्‍या गझलप्रेमी जयेश शंकर पवार याला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आगामी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@