नवी दिल्ली : चालू महिन्याच्या ५ तारखेला भारतातील ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’ची संख्या १०० झाली व त्यांचे एकूण मूल्य २५ लाख कोटींपार गेल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने स्टार्टअप क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी ‘मन की बात’च्या ८९व्या भागातून देशाला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. ‘स्टार्टअप’बरोबरच पंतप्रधानांनी यावेळी अन्य विविध विषयांवर भाष्य केले. तसेच आगामी योग दिनाची संकल्पना घोषित केली आणि योग दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहनही केले.
पंतप्रधान म्हणाले की, “पुढील महिन्यात दि. २१ जून रोजी आपण आठवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करणार आहोत. ‘मानवतेसाठी योग’ ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. मी तुम्हा सर्वांना योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. तुम्हीही योग दिनाची तयारी आत्तापासूनच सुरू करावी, असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या.”
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, “आपण कुठेही गेलो, तरी तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तेथील शूचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण आपण कधीही विसरता काम नये, ते जपले पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपल्याकडे तीर्थयात्रा महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे तीर्थसेवेचेही महत्त्व सांगितले आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थसेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण आहे.”
‘स्टार्टअप’बाबत पंतप्रधान म्हणाले की, “देशात ‘स्टार्टअप’साठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘स्टार्टअप’ जगतात आपल्याला भारताच्या प्रगतीची नवी झेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते. देशातील ‘युनिकॉर्न’ची संख्या १०० वर पोहोचली आहे. एक ‘युनिकॉर्न’, म्हणजे किमान साडेसात हजार कोटींचा ‘स्टार्टअप’, हे तुम्हाला माहिती असेलच. या ’युनिकॉर्न्स’चे एकूण मूल्य ३३० अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे २५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच भारतीय ‘युनिकॉर्न स्टार्टअप्स’चे मूल्य २५ लाख कोटींपार अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण ‘युनिकॉर्न’पैकी ४४ ‘युनिकॉर्न’ गेल्या वर्षीच तयार झाले होते.
इतकेच नाही, तर या वर्षातील तीन-चार महिन्यांत आणखी १४ नवीन ‘युनिकॉर्न’ तयार झाले.” पुढे ते म्हणाले की, “जागतिक साथरोगाच्या काळातही आपले स्टार्टअप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय ‘युनिकॉर्न’चा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे. येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले ‘युनिकॉर्न’ वैविध्यपूर्ण आहेत. भारताची ‘स्टार्टअप’ यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. ‘ई-कॉमर्स’, ‘फिन-टेक’, ‘एड-टेक’, ‘बायो-टेक’ अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ‘स्टार्टअप्स’चे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे.”
‘आत्मनिर्भर भारता’ला मिळेल चालना
‘व्होकल फॉर लोकल’चे महत्त्व सांगताने मोदी म्हणाले की, “तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहितीदेखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. या उत्पादनांचा वापर केल्याने तुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्याबरोबर ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालनाही मिळेल.