टिळकांच्या योगदानातून छत्रपती शिवरायांची समाधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2022   
Total Views |
 
 
 
 
shivsji
 
 
 
 
 
मुंबई : संभाजीनगर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या जाहीर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनीच बांधली होती, असे वक्तव्य केले. पण, त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह ’संभाजी ब्रिगेड’सारख्या संघटनांनी मात्र राज ठाकरे यांचा दावा सपशेल नाकारत, या प्रकरणाला जातीय रंग देत वादाला नवे तोंड फोडले आहे.
 
 
 
 
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की, लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते. पण, त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.” पण, मंत्री आव्हाड यांनी केवळ अर्धसत्य मांडून खरेतर जनतेची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केलेला दिसतो, हे इतिहासाची पाने चाळली असता स्पष्ट होते. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांच्याच अथक प्रयत्नांती आकारास आली, याचे दाखले कित्येक पुस्तकांमधील संदर्भांतून स्पष्ट होतात. तसेच ब्रिटिशांनीच छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, असा आव्हाड यांनी केलेला दावाही कसा फोल आहे,  छत्रपती शिवरायांची समाधी टिळकांमुळेच! हेदेखील ऐतिहासिक दस्तावेजांतून सिद्ध होते.
 
 
 
 
 
सर्वप्रथम ब्रिटिशांना शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचा असता, तर सर्व गड-किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली असतानाच, त्यांनी त्यादृष्टीने उपाययोजना केल्या असत्या. पण, मुळातच ब्रिटिशांचा तसा कुठलाही हेतू नसल्याचेच पुराव्याअंती स्पष्ट होते. पेशव्यांच्या पाडावानंतर या गड-किल्ल्यांवर ब्रिटिशांचेच राज्य होते. पण, हे गड-किल्ले सर्वस्वी दुर्लक्षित, उपेक्षित राहिले. डग्लस नावाच्या एका ब्रिटिश अधिकार्‍याने आपल्या ‘मुंबई व पश्चिम हिंदुस्थान’ या नावाच्या पुस्तकात यासंबंधी टिप्पणी केल्याचे आढळते. इंग्रजांनी त्या लेखाला दुजोराही दिला. म्हणजेच इंग्रजांकडून रायगडचे आणि रायगडावरील समाधीकडे दुर्लक्षच झाल्याचे खुद्द ब्रिटिश लेखक आणि मुद्रकांकडूनच स्पष्ट होते. डग्लसच्या या लेखामुळे खळबळ उडाल्याचे प्रा. न. र. फाटक यांनी त्यांच्या ‘लोकमान्य’ या पुस्तकात (पृ.१०२) वर स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. तसेच या पुस्तकातील (पृ. क्र. १०४) उल्लेखाप्रमाणे, “टेम्पल नावाचा एक ब्रिटिश गर्व्हनर (१८८० पूर्वी) रायगडावर गेल्याची आठवण एका एटीसी सहीच्या इंग्रज अंमलदाराने लिहिलेली मुंबईच्या ‘टाईम्स’ने दि. ५ मार्च १८९७च्या अंकात करकेरियांच्या वादविवादास अनुलक्षून प्रसिद्ध केली. एटीसी म्हणतो, तसे गडावरील ऐतिहासिक वास्तूंना जपण्याविषयी स्थानिक अंमलदारांना कडक इशारे टेम्पल साहेबांनी पाठविले असतील. पण, महाराष्ट्रातील गडकोट मराठ्यांच्या ठिकाणी स्वाभिमान जागृत करणारे असल्यामुळे ते नेस्तनाबूत झाले पाहिजे, म्हणजे गडावरील वास्तूंचे संरक्षण करण्याबद्दल त्याने हाताखालच्या अधिकार्‍यांना सुचविले असेल, हे एटीसीचे म्हणणे खरे समजणे धोक्याचे आहे. राज्यकर्त्यांनी चालवलेली गडाची निस्सीम उपेक्षा शिवस्मारकाच्या चळवळीने र्‍हास पावू लागली व ते श्रेय रायगडावरील 1896 मधील टिळक-प्रेरणेच्या पहिल्या शिवजन्मोत्सावाला देणे प्राप्त आहे.”
 
 
 
 
१८८६ मध्ये पुण्यात एक जाहीर सभा भरवून रानडेंनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न हाती घेतला. १८९३ पासून रानडे यांचे शिवचरित्र व शिवकाल यासंबंधीचे लेखही गाजू लागले. पुढे १८९५ साली खुद्द टिळकांनीही शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराची चळवळ सुरु केली. एवढेच नाही, तर ‘केसरी’मधूनही या चळवळीवर लेखांच्या, अग्रलेखांच्या माध्यमातून टिळकांनी सडेतोड भाष्य केले. दि. ३० मे, १८९५ रोजी पुण्याच्या हिराबागेत यासंबंधी एक सभाही भरली व त्यात स्मारक कमिटी नेमण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. पुढे टिळकांच्याच नेतृत्वात या चळवळीला व्यापक रुप आले आणि दि. १५ एप्रिल, १८९६ रोजी रायगडावरील उत्सवाची पहिली तारीखही ठरली. पण, या प्रथम उत्सवावेळीही कलेक्टरने आणलेला अडथळा, त्यावर टिळकांनी थेट महाबळेश्वर गाठून गर्व्हनरशी बुद्धिवाद करुन मिळवलेली परवानगी याचाही तपशीलवार उल्लेखही प्रा. न. र. फाटक आपल्या पुस्तकात करतात.
 
 
 
 
एवढेच नाही, तर टिळक उत्सवाकरिता रायगडावर महाडमधून जाण्यास निघाले असता, त्याचे वर्णन ‘काळ’कर्ते शिवराम महादेव उर्फ अण्णासाहेब परांजपे यांनीही केल्याचे आढळते. तसेच या उत्सवाच्या तयारीनेच गडाचा पुष्कळसा कायापालट घडवून आणला (पृ. १०६) असाही ‘लोकमान्य’ पुस्तकातील उल्लेख इथे टिळकांच्या या चळवळीतील बहुमूल्य योगदानाचे अचूक वर्णन करणाराच ठरावा. तसेच या पहिल्या उत्सवामुळे महाराष्ट्रात सर्वत्र शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होऊ लागली.
 
 
 
 
दि. २ जुलै १८९५ च्या ‘केसरी’च्या अंकात टिळकांनी अनेक लोकांकडून आलेल्या स्मारकसंबंधी सूचनांचीही चर्चा केलेली आढळते. त्यात टिळक म्हणतात, “कमेटीनें मनाशीं असें ठरविलें की, समाधीवर छत्री बांधून उत्सव सुरु करण्यासच मुळी ४० हजारांवर रुपये लागतील. पुतळ्याची गोष्ट मनात आणली तर लाख रुपयांपर्यंत मजल जाईल, म्हणून वर्गणी जुळेल त्या मानानें हातपाय पसरावेत.” न. र. फाटक यांनी पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे, “निदान ५० हजार जुळल्यावर समाधीच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, असे त्यांचे नियोजन होते. पण, सरकारदरबारी आतून काय किल्ली फिरली आणि बर्‍याच लोकांनी आपले हात आखडले. सुधारक वगैरे तर मूळापासूनच तटस्थ होते. ते टीका करीत नव्हते. तेव्हांही त्यांना या कामी वर्गणी देण्याची हौस नव्हती.” (पृ. ४३९)
 
 
 
 
१८९५ च्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस ‘केसरी’तून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर लेख प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. “मराठ्यांचे हितशत्रू लॉर्ड हॅरिसाहेब हेदेखील शिवाजीच्या पराक्रमाचे वर्णन करीत असतात. त्यांचे वंशज व सरदार हे स्मारकाची काहीच खटपट करीत नाहीत; त्या अर्थी त्यांचे जिणे व्यर्थ होय.” यावरुन ब्रिटिश अधिकार्‍यांना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारात काडीमात्रही रस नव्हता, हेच टिळक अगदी परखडपणे मांडतात.
 
 
 
 
दि. २८ एप्रिल, १८९६ च्या ‘केसरी’च्या अंकात ‘शिवजयंतीचा राष्ट्रीय उत्सव’ या मथळ्याच्या अग्रलेखात टिळक म्हणतात, “या उत्सवांत मराठे आणि ब्राह्मण, अगर ब्राह्मण आणि परभू अशा प्रकारचा कोणताही भेद ठेवणें अगदी गैरशिस्त आहे. यंदाचे उत्सवांत एकदोन ठिकाणीं असला प्रकार झाल्याचे ऐकिवांत आहे; व जर ही गोष्ट खरी असेल तर वेळीच तिचा बिमोड केला पाहिजे.” तसेच “ब्राह्मणांनी शिवाजीचे राज्य बुडविले हा आरोप निराधार आहे इत्यादी विचार मांडून झाल्यावर इतिहासाचा दुरुपयोग करणारे लोक देशाचे शत्रू होत,” असेही टिळकांनी म्हटले आहे. (पृ. ११०) यावरुन लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाला जातीपातीच्या भेदाभेदात अडकवू पाहणार्‍या, ब्राह्मणद्वेषी प्रवृत्तींचाही चांगलाच समाचार घेतलेला दिसतो.
रायगडावरील पहिल्या यशस्वी उत्सवानंतर असाच दुसरा उत्सव १९०० साली टिळकांच्याच नेतृत्वात संपन्न झाल्याचीही नोंद आढळते. (पृ.११२) तसेच वर्गणीचे काम थंडावले, तरीही टिळक नाउमेद झाले नाहीत. देशद्रोहाच्या कैदेतून टिळक सुटून आल्यानंतरही मोठे उत्सव पार पडले. टिळकांच्या निधनानंतरही लोकवर्गणीचे हे शिवधनुष्य ‘श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळा’ने लीलया पेलले. ही समाधी बांधण्यासाठी ब्रिटिशांशी मोठा संघर्ष करावा लागला आणि अखेरीस १९२६ साली आज रायगडावर दिसणारी शिवाजी महाराजांची भव्य समाधी अस्तित्वात आली.
 
 
 
 
त्यामुळे एकूणच इतिहासातील घटनाक्रम, ब्रिटिश अधिकार्‍यांचे दस्तावेज आणि या विषयातील अभ्यासक, जाणकारांची मते लक्षात घेता, लोकमान्य टिळकांचे शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या बांधणीतील अनन्यसाधारण योगदान पुनश्च अधोरेखित होते.
 
 
 
 
लोकमान्य टिळकांच्याच प्रेरणेने लोकवर्गणीतून समाधीचा जीर्णोद्धार
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली पुण्यात एक सभा घेतली. त्या सभेत रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा संकल्प त्यांनी सोडला. या सभेला अनेक मान्यवरही उपस्थित होते. पुढे जवळ जवळ ३० वर्षे संघर्ष केल्यानंतर या समाधीची ब्रिटिशांकडून परवानगी मिळाली, तोपर्यंत लोकमान्यांचे निधन झाले. त्यांच्या सहकार्‍यांनी, न. चिं. केळकरांनी ही चळवळ पुढे सुरू ठेवली. १९२५ साली परवानगी मिळाल्यानंतर १९२६ साली ही समाधी मंडळाने बांधली. त्यासाठी लोकवर्गणीतून अधिक ब्रिटिश सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या रकमेतून त्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला. आज आपण पाहतो, ती १९२६ साली ’रायगड स्मारक मंडळा’ने बांधलेली समाधी आहे. त्यापूर्वी तिथे फक्त एक छोटा चौथरा होता. आताची ही संपूर्ण समाधी मंडळाने सुळे नावाच्या कंत्राटदाराकडून बांधून घेतली आहे.
- सुधीर थोरात, कार्यवाह, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
 
 
 
 
शाहूंना मानणारे जर टिळकांना विरोध करत असतील तर नवलच!
शिवरायांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात त्यांच्या जयंतीचा उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा झाला. त्याचे कारण लोकमान्य टिळक! कितीतरी दिवस रायगडावर स्मारक बांधायचे, ही नुसतीच चर्चा सुरू होती. या चर्चेला टिळकांनी कृतिरुप दिले. टिळकांनी ‘केसरी’त लिहिले, “ज्याच्या अंगात माणुसकी आहे, त्याला श्रीशिवाजी महाराजांच्या समाधीबद्दल आस्था वाटेलच, पण ज्याचा महाराष्ट्र कुळात जन्म झाला आहे, त्याला तर या कृत्याबद्दल विशेष अभिमान, आस्था, कळकळ किंवा भक्ती असणे हे त्याचे कुलव्रतच होय.” (केसरी -२ जुलै १८९५) या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जो पैसा उभारला गेला, त्याचे हिशेब देण्याची तयारी टिळकांनी ‘केसरी’च्या अंकातून व्यक्त केली होती. एकदा तर त्यांचा मुलगा अत्यवस्थ असल्याची तार आली, तेव्हा ते शिवजयंतीच्या उत्सवासाठी रायगडावर निघाले होते. टिळकांनी सांगितले, “आता शिवजयंती उत्सव संपेपर्यंत पुण्याची कुठलीही बातमी पाठवू नये.” टिळक किती मनापासून या कामात लक्ष घालत होते बघा. यासाठी सयाजीराव गायकवाड यांनी हजारोंची देणगी पाठवली, तर खुद्द शिवरायांचे वंशज शाहू छत्रपतींनी यासाठी आपला पाठिंबा दर्शवला. शिवराय हे महाराष्ट्रीयांचे स्फूर्तिस्थान असल्याने रायगडावरील समाधीची डागडुजी व्हावी, यासाठी सगळीकडूनच देणग्या येऊ लागल्या. त्याला महत्त्वाचे कारण होते, टिळकांचे ‘केसरी’मधील लेखन! टिळकांनी शिवरायांच्या स्मारकासाठी सुरू केलेल्या चळवळीला खुद्द शाहू छत्रपतींचा पाठिंबा होता, शाहूंना मानणारे जर टिळकांना विरोध करत असतील, तर नवल आहे ना?
 
 
 
 
- पार्थ बावस्कर, व्याख्याते आणि टिळक विषयाचे अभ्यासक
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@