मुंबर्ई : ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणाचा हट्ट आणि त्यानंतर मुंबईच्या घरातील अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या रवी राणा, नवनीत राणा दाम्पत्यामुळे आता नवे प्रकरण समोर आले आहे. राणा दाम्पत्य राहत असलेल्या खार येथील ’लाव्ही’ इमारतीतील इतर रहिवाशांना आता पालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारतीतील काही रहिवाशांना घरातील अनधिकृत बांधकामाबाबत ‘पालिका अधिनियम १८८८’ ‘कलम ४८८’ नुसार नोटीस बजावल्या आहेत.
खार येथील १४ व्या रस्त्यावरील त्या इमारतीत आठव्या मजल्यावर राणा दाम्पत्याचे घर आहे. या घरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेने काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या घराची पाहणी केली होती. त्यावर राणा दाम्पत्याने पालिका दरबारी आपली बाजू मांडली होती. मात्र, हे उत्तरसमाधानकारक नसल्याचे सांगत पालिकेने दि. १९ मे रोजी पुन्हा नोटीस पाठवली आहे. आता पालिकेने लाव्ही इमारतीतील एक ते सात आणि नवव्या मजल्यावरील रहिवाशांना नोटिसा पाठवल्या आहेत. काही रहिवाशांनी घरात अनधिकृत बांधकाम केले असून, पालिकेचे पथक या घरांची पाहणी करणार असून ही बांधकामे मोजणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.