मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रतिक्रीया देताना वापरलेल्या ग्रामीण म्हणीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या, जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा. मी प्रदेशाध्यक्ष आहे."
"ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही. माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.", असे म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
ओबीसी आरक्षण प्रश्नावर मोर्चा काढला असताना चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली होती. त्यावेळी काहीही करा परंतू आरक्षण द्या, शिवाय जमत नसेल तर खुर्चा खाली करा, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. मात्र, ग्रामीण भाषेतील या म्हणींचा विपर्यास करुन चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. या प्रकरणानंतर चंद्रकांतदादांनी याबद्दल आपली बाजू मांडली आहे. तसेच ग्रामीण म्हणीचा वापर हा ओबीसींना न मिळालेल्या आरक्षणाबद्दलच्या राज्य सरकारच्या भूमिकेविरोधातील संतापाबद्दल करण्यात आला होता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे पत्र राज्य महिला आयोगाला चंद्रकांतदादा पाटील यांनी लिहीले आहे.