जातिभेद नष्ट होईल तो दिवस देशासाठी सर्वोत्तम : शरद पोंक्षे

28 May 2022 15:27:37

sharad ponkshe
 
 
 
पुणे : सावरकर संस्थेने केलेला सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध हे जातीयवाद वाद संपविण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. ज्या दिवशी समाजातील जातीभेद नष्ट होईल तो देशासाठी सर्वोत्तम दिवस असेल, असे प्रतिपादन सावरकर अभ्यासक आणि अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे केले.
 
 
सावरकर जयंतीनिमित्त सामुदायिक व्रतबंध
 
‘मी सावरकर’ आणि ‘स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने सावरकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमात ३५ बटूंची मुंज करण्यात आली, त्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास अभिनेते शरद पोंक्षे, गायक शौनक अभिषेकी, व्हाईस एअर चिफ मार्शल, (निवृत्त) भूषण गोखले, माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवा मंत्री चार्वी सावरकर, अजित गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष धनंजय बर्वे, रणजीत नातू, प्रविण गोखले, शैलेश काळकर, रविंद्र ढवळीकर, अमेय कुंटे यांनी संयोजन केले.
 
पोंक्षे म्हणाले, ‘सावरकरांनी जातीयवाद संपविण्यासाठी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. ज्या ज्या वेळी जातीयवाद वाढतो, त्या त्या वेळी विविध संघटना तो संपविण्यासाठी पुढे येतात. मी सावरकर संस्थेने केलेला सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध हे जातीयवाद वाद संपविण्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे. ज्या दिवशी समाजातील जातीभेद नष्ट होईल तो देशासाठी सर्वोत्तम दिवस असेल. त्यासाठी समविचारी संस्थांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे.’
 
 
 
संस्थेचे अध्यक्ष बर्वे म्हणाले, ‘पूर्वी हिंदू संस्कृतीत काही विशिष्ट समाजामध्येच व्रतबंध हा संस्कार केला जायचा. परंतु स्वा. सावरकरांनी सामाजिक समानतेचा पुरस्कार करुन काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीभेदांना छेद देत सकल हिंदू समाजाकरीता मंदिरे उभारली आणि सर्व समाजातील मुलांच्या मुंजी ही लावल्या. त्याच धर्तीवर आज व्रतबंधाचा सामुदायिक कार्यक्रम आयोजित केला होता.’असे त्यांनी पुढे सांगितले.
 
 
आज सकाळी पारंपरिक पद्धतीने व्रतबंधाचे सर्व विधी पार पडले. दुपारी भोजन आणि संगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता. संध्याकाळी कार्यालयापासून म्हात्रे पुलाजवळील महादेव मंदिरापर्यंत भिक्षावळ यात्रा काढण्यात आली. तिथे सर्व बटूंना मोहनबुवा रामदासी यांच्याद्वारे भिक्षा देण्यात आली.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0