स्त्रीशक्तीचे महारूप: डॉ. विद्यागौरी लेले

27 May 2022 10:20:53

vidyagauri
 
 
 
डॉ. प्रा. विद्यागौरी लेले म्हणजे अत्यंत कष्टमय जीवनाच्या अग्निदिव्य पार करत स्वयंतेजाने दिप्तीमान झालेल्या तारकाच! त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
 
 
 
प्रा. विद्यागौरी विवेक लेले यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून, त्यांच्या दोन संशोधन पुस्तिकाही प्रकाशित झाल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी २० शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. विज्ञानसंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून त्यांना पाच संशोधन विषयांकरिता शिष्यवृत्ती/ अनुदान मिळाले. परदेशातील अनेक विद्यापीठांमधून त्यांना सन्माननीय ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून निमंत्रित आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रसायनशास्त्रातील एका विशिष्ट घटकासंदर्भात‘पेटंट’ही मिळाले आहे. डॉ. प्रा. विद्यागौरी यांनी ‘पॉलिमर केमिस्ट्री’ याविषयात ‘पीएच.डी’केली असून, त्या सध्या चेंबूरच्या एन. जे. आचार्य अ‍ॅण्ड डी. के. मराठे महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. तसेच त्यांचे स्वतःचे ‘विद्या डायग्नोस्टिक सेंटर’ही आहे, तर अशा डॉ. प्रा. विद्यागौरी लेले. अर्थात त्यांच्या कर्तृत्वासंदर्भातली ही एक छोटीशी झलक आहे. शिक्षण आणि सामाजिक स्तरावर विद्वतापूर्ण निष्ठा अर्जित केलेले त्यांचे स्थान आहे. हे स्थान त्यांना सहजासहजी मिळाले असेल का?
 
 
तर त्यांचे पिता वसंत हे शिक्षक, तर आई वसुधा या गृहिणी.त्या राष्ट्र सेविका समितीच्या शाखेतही जायच्या. चेंबूरमध्ये त्यावेळी बखलेबाई समितीच्या शाखा भरवायच्या. एकदा विहिरीत एक मुलगी पडली. सगळेजण काठावर उभे राहून हळहळत राहिले. वसुधाबाईंनी विहिरीत उडी मारली. त्या मुलीला वाचवले. असो. विद्यागौरी या शाळेत सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायच्या. अगदी गीतापठनपासून विविध खेळांमध्ये. अभ्यासातही त्या हुशारच होत्या. शालेय स्तरावर जरी सगळे नीट होते, तरी घरी मात्र अनाकलनीय घडत होते. वसंत आणि वसुधा यांच्यामध्ये विसंवाद घडत गेला. वसंत एके दिवशी घर सोडून निघून गेले. त्यावेळी विद्यागौरी दहावीला होत्या. घरातल्या कर्त्या पुरुषाने घर सोडून जाणे ही सत्तरच्या दशकात चेंबूर गावठाणमध्ये मोठी गोष्ट होती. त्याचे पडसाद विद्यागौरी यांच्यावरही पडले. मात्र, परिस्थितीला शरण न जाता जगायचे हे त्यांनी ठरवले. त्या दहावीला शाळेत मुलींमधून तिसर्‍या आल्या. वडील घरात नसल्यामुळे आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे इयत्ता दहावीला असल्यापासून विद्यागौरी आईसोबत काम करायच्या. कुठे आरारूटचे पदार्थ विक, कुठे आई ‘एलआयसी पॉलिसी एजेंट’ महणून तिच्यासाठी काम कर, कुठे कपांऊंडरचे काम कर एक ना अनेक.
दहावीनंतर त्यांनी विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. याच काळात त्यांच्या चेंबूरच्या घरातलीवीज गेली. 80च्या दशकाची सुरुवात होती. घरात वीज यावी म्हणून विद्यागौरी दररोज वीज कार्यालयात खेटे घालत. पण, पैशाशिवाय काम होत नसते, हा अनुभव त्यांनी एक वर्ष घेतला. एक वर्ष विजेविना दोघी मायलेकी घरात राहिल्या. पण, दोन्ही ठिकाणी नोकरी करून रात्री उरलेल्या वेळेत अभ्यास करायची, अशी विद्यागौरी यांची दैनंदिनी. विजेअभावी रात्री अभ्यास कसा करणार? त्यामुळे त्या आईसोबत मावशीकडे ठाण्याला राहायला आल्या. तिथे त्यांना एका औषध कंपनीत नोकरी मिळाली. नोकरी करून त्या शिकायच्या. यथावकाश पैसे जमवून पुन्हा दोघी मायलेकी चेंबूरला आल्या. वीजजोडणी करून घेतली. आता विद्यागौरी सकाळी जोशी मेडिकलमध्येकामाला दुपारी महाविद्यालयात तर संध्याकाळी दाताच्या दवाखान्यात कामाला जाऊ लागल्या. या दोन्ही ठिकाणी त्या खूप काही शिकल्या. ‘एक्स-रे’ काढण्यापासून ते ‘पॅथोलॉजी’संदर्भातल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी, याच काळात त्या आरोग्यक्षेत्रातील सेवा आणि व्यवसायासंदर्भातले अनेक अनुभव घेतले. प्रचंड तणाव, संघर्ष आणि समस्या यावर मात कशी करावी, या त्या आपसूकच शिकत होत्या. गरज, गरिबी आणि निराशा या सगळ्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रचंड नियोजनबद्ध कष्टाशिवाय पर्याय नाही, हा मंत्रही त्यांना मिळाला.
 
पुढे त्यांना ‘आचार्य महाविद्यालया’त व्याख्याताची नोकरी मिळाली. जोशी मेडिकलचे जोशी काका यांनी वडिलांच्या मायेने विद्यागौरी यांना मार्गदर्शन केले. पुढे विद्यागौरी यांनी वडिलांशी संपर्क साधला. वडील आणि दोन सावत्र भाऊ यांच्याशी पुन्हा स्नेह जुळला. याच काळात त्यांचा विवाह रा. स्व. संघाचे स्वयंसेवक विवेक लेले यांच्याशी झाला. जीवनाला स्थिरता मिळाली. विविध स्तरावर काम करत करत त्या आज ‘आचार्य महाविद्यालया’च्या प्राचार्य झाल्या. या महाविद्यालयात प्रामुख्याने चेंबूर आणि परिसरातील कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील विद्यार्थी शिकायला येतात. या मुलांचा सर्वांगीण विकास कसा घडवता येईल, यासाठी त्या विशेष मेहनत घेतात. त्यांच्या कार्यासाठी त्यांना मुंबई विद्यापीठ ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ‘रसायनशास्त्र उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाला. ‘इम्पॉवरमेंट ऑफ वुमेन’ हा महिला सशक्तीकरणासंदर्भातल्या पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ‘मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ’ आणि ‘व्ही.फॉर.यु’ या दोघांच्या विद्यमाने जाहीर होणारा ‘धर्मनिरपेक्ष सद्भावना’ पुरस्कार ही त्यांना प्राप्त झाला. त्यांचे जीवन पाहून वाटते, विद्या आणि गौरी या दोन्ही नावामागचा सांस्कृतिक आणि धार्मिक अर्थ डॉ. विद्यागौरी लेले जगत आहेत. प्रचंड नकारात्मक परिस्थितीवर मात करत स्वकर्तृत्वाने यश मिळवणार्‍या या स्त्रीशक्तीला प्रणाम!
 
 
Powered By Sangraha 9.0