देशात रस्ते अपघातांमध्ये सरासरी १८.४६ टक्क्यांची घट

27 May 2022 10:04:35

acssident
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : देशात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. एकूण अपघात सरासरी १८.४६ टक्क्यांनी कमी झाले असून मृतांच्या संख्येत १२.४८ टक्क्यांनी घट झाली आहे. जखमींची संख्या आधीच्या वर्षीच्या सरासरीपेक्षा २२.८४ टक्क्यांनी कमी झाली. वर्ष २०२० मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ३ लाख, ६६ हजार,१३८ रस्ते अपघात नोंदवले गेले, ज्यात १ लाख, ३१ हजार, ७१४ लोकांचा मृत्यू झाला आणि ३ लाख, ४८ हजार, २७९ जखमी झाले.
 
 
 
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेने (टीआरडब्ल्यू) तयार केलेल्या ‘भारतातील रस्ते अपघात-२०२०’ या अहवालानुसार, २०१८ मध्ये ०.४६ टक्क्यांची किरकोळ वाढ वगळता २०१६ पासून रस्ते अपघातांची संख्या कमी होत आहे. २०२० मध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाण ६९ टक्के होते. एकूण रस्ते अपघातात १८ ते ६० वर्षे वयोगटातील लोकांच्या मृत्यूचे प्रमाण ८७.४ टक्के आहे. ’भारतातील रस्ते अपघात-२०२०’ चा सध्याचा अहवाल २०२० या वर्षातील देशातील रस्ते अपघातांच्या विविध पैलूंची माहिती उपलब्ध करून देतो. यात दहा विभाग असून रस्त्यांची लांबी आणि वाहनसंख्या या संदर्भात रस्ते अपघातांशी संबंधित माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. या अहवालात प्रदान केलेला डेटा/माहिती ही आशिया प्रशांत रस्ते अपघात संकलित माहिती आधार प्रकल्प अंतर्गत, आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने प्रदान केलेल्या प्रमाणित स्वरूपानुसार कॅलेंडर वर्षाच्या आधारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस विभागांकडून संकलित केली जाते.
 
 
 
प्राणघातक अपघातांच्या संख्येतही घट
 
अहवालानुसार, ज्या अपघातांमध्ये किमान एकाचा मृत्यू झाला आहे, म्हणजेच प्राणघातक अपघातांच्या संख्येतही घट झाली आहे. २०२० मध्ये एकूण १ लाख, २० हजार, ८०६ प्राणघातक अपघातांची नोंद झाली, ही संख्या १ लाख, ३७ हजार, ६८९ च्या २०१९ च्या आकडेवारीपेक्षा १२.२३ टक्के कमी आहे.विशेष म्हणजे, २०२० मध्ये, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर रस्त्यांवर आधीच्या वर्षाच्या तुलनेत कमी अपघातांची, मृत्यूंची आणि जखमींची नोंद झाली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0