कार्ती चिदंबरम यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

25 May 2022 16:12:51

ED 
 
 
मुंबई : सध्या देशात ईडीच्या मोठमोठ्या कारवाया होत असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर मोठी कारवाई केली होती. बेकायदेशीर व्यवहारांप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. चिनी नागरिकांकडून अनधिकृतपाने पैसे घेऊन त्यांना व्हिसा दिल्याचा आरोपामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मात्र आता चिनी नागरिकांच्या व्हिसाप्रकरणी ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
काही दिवसांपूर्वीच कार्ति चिदंबरम यांच्याशी संबंधित असलेल्या तब्बल ९ ठिकाणांवर सीबीआयने धाड टाकली होती. त्यानंतर २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी तब्बल ५० लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप सीबीआयकडून त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांनतर आता चीनी नागरिकांना अनधिकृतपणे व्हिसा पुरवल्याच्या प्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला आहे.
 
चिदंबरम यांच्या संबंधित असलेल्या महत्वाच्या ९ ठिकाणांवर कारवाई करत सीबीआयने त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या भास्कर रमण यालाही चिनी नागरिकांच्या व्हिजा भ्रष्टाचार प्रकरणी अटक केली होती. तत्पूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणासाठी सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या मालमत्तांवर कारवाई केली होती. तसेच कार्ती चिदंबरम यांनी आपली खास ओळख वापरुन चिनी कंपन्यांमधील लोकांना व्हिसा दिला असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0