नवी दिल्ली : “भारताच्या मते या वर्षीची शांतता आणि आरोग्य यांना जोडणारी ‘जागतिक आरोग्य संघटने’ची (डब्ल्युएचओ) संकल्पना अगदी कालोचित आणि समर्पक आहे. कारण, शांततेशिवाय कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकास आणि सार्वत्रिक आरोग्य आणि निरामयता शक्य नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तथा रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले. ‘जागतिक आरोग्य सभे’च्या ७५व्या सत्रात ‘डब्ल्युएचओ’च्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय संबोधित करत होते.
जागतिक समुदायाचा एक जबाबदार सदस्य म्हणून भारत सज्ज
“भारताच्या पंतप्रधानांनी अधोरेखित केल्याप्रमाणे, लसी आणि औषधांच्या समानशील वितरणासाठी, जागतिक पातळीवर टिकाऊ आणि मजबूत अशी पुरवठा साखळी निर्माण करण्याची गरज आहे. यामध्ये लसी आणि उपचारपद्धतींना ‘डब्ल्युएचओ’ची मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरळीत करणे आणि ‘डब्ल्युएचओ’ला सशक्त करून अधिक टिकाऊ अशी ‘जागतिक आरोग्य सुरक्षा’ व्यवस्था उभी करणे हेही अनुस्यूत आहे. जागतिक संरचनेचा एक जबाबदार सदस्य देश म्हणून या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यासाठी भारत तयार आहे,” असेही ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण परिषदेची सामूहिक नाराजी केली व्यक्त
भारताच्या वैधानिक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेली देशविशिष्ट अधिकृत आकडेवारी विचारात न घेता, ‘जागतिक आरोग्य संघटने’ने नुकत्याच जाहीर केलेल्या त्यांच्या निरीक्षणांमध्ये भारतातील मृत्यूसंख्या अधिक दाखविल्याबद्दल, या सत्रात भारताने नाराजी आणि चिंता व्यक्त केली. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भारतातील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण परिषदेने नोंदवलेली सामूहिक नाराजी या मंचावर त्यांच्यावतीने व्यक्त केली. भारतातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांचे प्रतिनिधित्व असणार्या या संस्थेने, ‘जागतिक आरोग्य संघटने’ने जाहीर केलेल्या अधिक मृत्यूसंख्येमागील दृष्टिकोन आणि मोजणीपद्धत यांना विरोध दर्शवणारा ठराव एकमताने मंजूर केला होता.
‘जागतिक आरोग्य संघटने’ची भूमिका मध्यवर्ती
‘जागतिक आरोग्य संघटने’ची या वर्षीची शांतता आणि आरोग्य यांना संलग्न करणारी संकल्पना अगदी योग्य वेळ साधणारी आणि समर्पक आहे, असे भारताला वाटते. सर्वांसाठी आरोग्य हे उद्दिष्ट लक्ष्य निर्धारित आणि परिणाम प्राप्तीकारक पद्धतीने साध्य करण्यामध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ची भूमिका मध्यवर्ती आहे, असा भारताचा ठाम विश्वास आहे,” असे मांडवीय यावेळी म्हणाले.