...अन् ठाणे पालिकेला आली जाग

23 May 2022 15:47:04

dance bar
 
 
 
 
 
 
ठाणे : शिवसेनेच्या रण’रागिणी’च्या पतीची डान्सबारमधील अय्याशी सोशल मीडियात ‘व्हायरल’झाल्यानंतर ठाण्यातील बार संस्कृती चव्हाट्यावर आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे मनपाने उपवन परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ‘सूर संगीत’ नामक लेडीज बारवर कारवाई करून बार सील केला आहे. मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे साहा. आयुक्त महेश आहेर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, शहरात बेकायदा बार चालविणार्‍या व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत.
 
 
  
ठाणे मनपा हद्दीत ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लेडीज बार सुरू केल्याच्या तक्रारी मनपाला प्राप्त होत होत्या. त्यामुळे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अतिक्रमण उपायुक्त जी. जी. गोदापुरे आणि अतिक्रमण साहा. आयुक्त महेश आहेर यांना कारवाईचे आदेश दिले, त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा आस्थापना तातडीने सील केल्या आहेत. गुरुवारी अतिक्रमण विभागाचे साहा. आयुक्त महेश आहेर यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात उपवन येथील बेकायदा इमारतीत सुरू असलेला सूर संगीत नावाचा लेडीज बार सील केला. यावेळी वर्तकनगर महापालिका प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सचिन बोरसे हेदेखील उपस्थित होते.
 
 
 
धक्कादायक बाब, या बारच्या नामफलकावर हर्षित बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असे लिहिले असून, याच्या नावाखाली सूर संगीताच्या नावाने लेडीज बार चालविला जात होता. याआधी कोरोनाच्या काळात महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी जुलै महिन्यात शहरातील सुमारे १५ लेडीज बार कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सील केले होते. त्यानंतर जवळपास सहा महिने या बारला कुलूप होते. सरतेशेवटी बार चालकांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा बार सुरू झाले होते.
 
 
 
तरीही पोलिसांचे दुर्लक्ष कसे झाले?
 
उपवन परिसरात सुरू झालेल्या या लेडीज बारच्या काही अंतरावर वर्तकनगर पोलीस ठाणे आहे. तरीही पोलिसांचे याकडे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल उपस्थित होत आहे. यावेळी पोलीस ठाण्याच्या नाकाखाली ही कारवाई सुरू असताना पोलीस हातावर हात ठेवून बसले होते. अखेर ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला कारवाई करावी लागली.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0