काँग्रेसच्या हाती १९८४ पासूनच केरोसीन : भाजपची टीका

22 May 2022 19:33:19

kirit somayya 3
 
 
 
 
  
नवी दिल्ली : “राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष देशात सातत्याने आग लावण्यासाठी कार्यरत आहे. देशात १९८४ साली काँग्रेसने हत्याकांड घडविले. त्यात आग लावण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या हाती १९८४ सालापासूनच केरोसीन आहे,” अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
 
 
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडन येथे आयोजित ‘आयडियाज् फॉर इंडिया परिषदे’त भारतविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. “भारतात सध्या चांगले वातावरण नाही. भाजपने आपल्या विचाराने देशभर केरोसीन ओतले आहे. आता फक्त ठिणगीची गरज आहे आणि त्यानंतर देशात सर्वत्र आग लागेल,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.
 
 
 
केरोसीन घेऊन कोण फिरत आहे, हे सार्‍या देशाला माहीत आहे. काँग्रेस तर १९८४ पासून केरोसीन घेऊन फिरत आहे. देशात १९८४ साली काँग्रेसने नरसंहार घडविला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनीच केरोसीन ओतण्याचे काम केले होते. देश सातत्याने पेटत राहावा, अशीच काँग्रेसची इच्छा असते. ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाचे अपयशी नेते राहुल गांधी परदेशात जातात, त्या त्या वेळी ते तेथे भारतविरोधी वक्तव्ये करत असतात. त्यामुळे देशात नेहमी वाद निर्माण होऊन आग पेटत राहावी, हे १९८४ पासूनचे धोरण राहुल गांधी पुढे नेत असल्याचे गौरव भाटिया म्हणाले.
 
 
 
राहुल गांधी लंडनमधील ‘केम्ब्रिज विद्यापीठा’च्या सेमिनारला जातात आणि तिथे जाऊन देशाची प्रतिमा मलीन करतात. पंतप्रधान मोदींचा तिरस्कार करताना राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय भारतमातेच्या विरोधात वक्तव्ये करू लागतात, ही त्यांची जुनी सवय आहे. मात्र, भाजपला विरोध करताना देशविरोधी वक्तव्ये करण्याचे कृत्य देशातील जनता कदापि सहन करणार नसल्याचेही भाटिया यांनी यावेळी सांगितले.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0