काशी सज्ज आहे...!

21 May 2022 21:18:41

kashi kashi 1



‘बाबा मिल गए’ या तीन अक्षरी मंत्रामुळे देशभरातील हिंदू समाज आज नव्या ऊर्जेने आपला हक्क मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा उन्माद नसून आपला हक्क प्राप्त करण्याची ऊर्मी आहे. सनातन हिंदू धर्मास नष्ट करण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरीही हा समाज हार मानत नाही. योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती वेळ येताच आपला हक्क मिळविण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करतो आणि यश मिळवतो. त्यामुळे काशीचा हा लढा हिंदू समाजासाठी पुढील अनेक लढ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे, यात कोणतीही शंका नाही.


राजधानी दिल्लीतून ‘गरीबरथ एक्सप्रेस’ने संध्याकाळी निघून दुसर्‍या दिवशी सकाळी काशीला पोहोचलो. देशातील प्रमुख तीर्थस्थळ असणारी काशी तशी नेहमीच गजबजलेली असते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरून निघून गल्लीबोळांतून वाट काढून चौसट्टी घाटावरच्या हॉटेलवर पोहोचेपर्यंतचा अर्धा तास काशी शहराला बघताना त्यामध्ये एक उत्साह असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आता प्रत्येक तीर्थस्थळावर असा उत्साह जाणवतोच.

मात्र, काशी शहराचा हा उत्साह काही निराळाच होता. तो उत्साह काहीतरी सांगू इच्छित होता. तो उत्साह केवळ काशीचा नसून अवघ्या हिंदू समाजाचा असल्याचे वाटत होते. चौसट्टी घाटावर पोहोचल्यावर समोर दिसणारे गंगेचे विस्तीर्ण पात्र आणि अतिशय शांतपणे वाहणारी गंगाही काहीतरी वेगळीच भासत होती. चौसट्टी घाटावर उतरून गंगेकडे जात असताना घाटावरच्या एका मंदिराची देखभाल करणारा सेवेकरी अगदी सहजपणे म्हणाला, “देखिए, अब तो बाबा भी मिल गए. और क्या चाहिए!” त्याचे हे शब्द ऐकले आणि काशी शहरामध्ये संचारलेल्या उत्साहाचे कारण लख्खकन लक्षात आले.


‘बाबा मिल गए’ हे तीन शब्द आता वाराणसीच्या अवकाशात अगदी घट्ट बसल्याचे वाराणसीतल्या तीन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान अगदी स्पष्टपणे जाणवले. दशाश्वमेध घाटावरून काशिविश्वनाथाच्या मंदिराकडे जात असताना नव्यानेच बांधलेल्या ‘काशी कॉरिडॉर’ची भव्यता नजरेत भरत होती. काशिविश्वनाथाचा लखलखता सोनेरी कळसही दुरूनच लक्ष वेधून घेत होता. जसजसे मंदिराच्या जवळ जात होतो, तसतसे एक अनामिक हुरहूर मनात येण्यास सुरूवात झाली होती. मंदिराच्या द्वार क्र. ४ मधून आत प्रवेश केला आणि धर्मांध औरंगजेबाने आपल्या इस्लामी शिकवणीनुसार उद्ध्वस्त केलेले काशिविश्वनाथाचे प्राचीन मंदिर दिसले.


मंदिराचाच पाया आणि भिंती वापरून औरंगजेबाने त्यावरच उठविलेली मशीद, मंदिराचे रक्षण करण्यासाठी तत्कालीन हिंदूंनी केलेला संघर्ष आणि धर्मांध औरंगजेबाच्या पाशवी शक्तीपुढे अखेर त्यांना पत्करावी लागलेली हार आणि आपल्या दैवताचा आपल्या डोळ्यादेखल बघावा लागलेला विध्वंस, त्यानंतर शेकडो वर्षे तो मानभंग सहन करत जगणारा हिंदू समाज हे सर्व चित्र डोळ्यांसमोर तरळले. त्या वारशाला पाहत काशिविश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत असलेल्या नंदीच्या डोळ्यातली प्रतीक्षा आता पूर्ण झाल्याचा भास झाला.


त्याचे कारणही स्पष्ट होते. ते म्हणजे, ज्यांची तो नंदी शेकडो वर्षांपासून वाट पाहत होता, ते काशिविश्वनाथ अखेर पुन्हा प्रकटले आहेत. त्याविषयी काशिविश्वनाथाचे मुख्य अर्चक श्रीकांतजी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, “वेगळे काही घडले आहे, असे आम्हाला वाटत नाही. कारण, मंदिर उद्ध्वस्त केले आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. अर्थात, अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही आत्ता ज्या नंदीचे दर्शन घेतले, त्याच्यासमोरच्या जागेमध्ये (ज्ञानवापी मशीद) अजून बरेच उत्खनन व्हायचे आहे आणि त्यामध्ये तर आणखी बरेच काही सापडणार आहे.” एवढे मोजकेच चार शब्द बोलून श्रीकांतजी आपल्या नित्यकार्यात पुन्हा मग्न झाले.


‘आणखी बरेच काही सापडणार आहे’ हे श्रीकांतजींचे शब्द कानात घोळवतच पुन्हा दशाश्वमेध घाटावर आल्यावर विनाश आणि पुनर्निर्माणाचे कारक असलेल्या भगवान महादेवाच्या रुपाप्रमाणेच काशीमधील ज्ञानवापी परिसर असल्याचे जाणवले. साधारणपणे अकराव्या शतकात मुस्लीम आक्रमक कुतुबुद्दीन ऐबकाने काशिविश्वनाथाच्या मंदिरावर पहिला घाव घातला. त्यानंतर अकबर आणि औरंगजेब या धर्मांधांनी वेळोवेळी काशिविश्वनाथाचे मंदिर उद्ध्वस्त केले. मात्र, तरीदेखील महादेवाचे ते स्थान पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, या मुस्लीम धर्मवेड्यांना जमले नाही. कारण, अनेकवेळा विध्वंस होऊनही काशिविश्वनाथ आणि ज्ञानवापी काशीमध्येच ठामपणे उभे आहेत.


हिंदू समाजानेही यातूनच प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे अनेक आक्रमक आले आणि मातीतही गाडले केले. मात्र, हिंदू समाज अशा प्रत्येक आक्रमकास पुरून उरतोय आणि अधिक बलशाली होऊन नव्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी सज्ज होत आहे. त्यामुळेच राजा मानसिंह, राजा तोरडमल, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या रुपात हिंदू शक्तीने वेळोवेळी काशिविश्वनाथासाठी लढा दिला. हा विचार करत असतानाच दशाश्वमेध घाटावर सुरू झालेल्या गंगाआरतीने हिंदुत्वाची मातृशक्ती आज २०२२ मध्ये आपल्या पूर्वसुरींचा वारसा पुढे नेत असल्याचे लक्षात आले आणि त्या मातृशक्तीस भेटण्याचा एक नवा उत्साह आला.



हा लढा आमच्या हक्काचा, आम्ही तो लढणारच!

ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश वाराणसी दिवाणी न्यायालयाने दिला आणि ज्ञानवापी प्रकरणी काहीतरी ठाम निर्णय येण्याची सुरुवात झाली. वाराणसी दिवाणी न्यायालयात मंगळवारी मोठी गडबड सुरू होती. कारण, त्याच दिवशी ‘कोर्ट कमिशनर’ सर्वेक्षणाचा अहवाल सादर करणार होते. सुनावणीवेळी ‘कोर्ट कमिशनर’नी अहवाल सादर करण्यासाठी मुदत मागून घेतली. मात्र, अहवालामध्ये नेमके काय असेल, याचा स्पष्ट अंदाज प्रत्येकालाच आला होता. त्यामुळे न्यायालयीन कामकाज संपताच तेथे उपस्थित असलेल्या मंजू व्यास, रेखा पाठक आणि सीता साहू यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना त्यांची जिद्द आणि आपला (हिंदू समाजाचा!) हक्क मिळवायचाच, ही आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.


त्या म्हणाल्या, “आम्ही चारही (अन्य एक लक्ष्मीदेवी त्या दिवशी न्यायालयात उपस्थित नव्हत्या) विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये भेटायचो. त्यानंतर शृंगारगौरीची पूजा करण्याच्या निमित्ताने आमची भेट व्हायला लागली. शृंगारगौरीची प्रतिमा औरंगजेबाने अर्धवट उद्ध्वस्त करून मशीद बांधलेल्या ठिकाणी आहे. त्यामुळे तेथे वर्षातून केवळ एकदाच पूजाअर्चा करण्याची परवानगी होती. तेव्हा शृंगारगौरीची अन्य मंदिराप्रमाणेच नित्यपूजा करण्याची परवानगी मिळायलाच हवी, हा विचार आमच्या मनात आला आणि आम्ही त्यासाठी याचिका दाखल केली आणि आज त्यामुळे काय झाले, ते सर्वांसमोर आहे. त्यामुळे हा आमच्या हक्काचा लढा आणि तो आम्ही अगदी शेवटपर्यंत लढणार आहोत. त्याविषयी कोणत्याही प्रकारची तडजोड आम्हाला मान्य नाही,” असे त्यांनी अगदी नि:संदिग्धपणे सांगितले.


या मातृशक्तीच्या याचिकेवर दिवाणी न्यायालयात युक्तिवाद करणारे अ‍ॅड. पवनकुमार पाठक यांच्याशी चर्चा केली असता, खटल्याच्या कामकाजाविषयी महत्त्वाची माहिती मिळाली. ते अगदी स्पष्ट शब्दांत म्हणाले की, “मुस्लीम पक्ष प्रारंभापासूनच सर्वेक्षण करू नये, या मताचा होता. त्यामुळे प्रारंभी दि. ५ आणि ६ मे रोजी सर्वेक्षणास त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्या स्थानी कायदा व सुव्यवस्थेचीही स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसली. हे म्हणजे एकप्रकारे न्यायालयावर दबाव टाकण्याचाच प्रयत्न होता.


मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आणि सर्वेक्षणास प्रारंभ झाला. त्यावेळीही मुस्लीम पक्ष त्यात सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सर्वेक्षणाच्या अखेरच्या दिवशी आम्हाला मुस्लीम वजू करत असलेल्या तलावामध्ये काहीतरी असावे, असा संशय आला. तो संशय आम्ही ‘कोर्ट कमिशनर’ना बोलून दाखविला. त्यानंतर त्याची पाहणी करताना तेथे शिवलिंग असल्याचा आमचा अतिशय स्पष्ट दावा आहे. आता अहवाल न्यायालयात सादर झाला आहेच, तो वाचल्यानंतरच पुढचे धोरण ठरविण्यात येईल. मात्र, हिंदूंचा दावा अतिशय मजबूत असून तो प्रत्येक न्यायालयात टिकणार, यात कोणतीही शंका नाही,” असे मत अ‍ॅडव्होकेट पाठक यांनी व्यक्त केले.




आता तरी ‘गंगाजमुनी तहजिब’ दाखवा...

वाराणसीमधले ज्येष्ठ संपादक अत्रि भारद्वाज यांची भेट घेतली असता त्यांनी सर्वेक्षणात जे काही सापडले, ते स्थानिक वाराणसीवासीयांना अनेक वर्षांपासून माहिती असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “मुस्लिमांची एक सवय आहे आणि ती अतिशय नियोजनबद्धपणे राबविली जाते. ती म्हणजे, जेथे तिथे आपले प्राबल्य निर्माण करणे. वाराणसीमध्येही त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या वस्त्यांचे ‘पॉकेट्स’ निर्माण केले आहेत. काशिविश्वनाथाचा विध्वंस आणि त्यानंतर येथे मुस्लिमांचे धोरण हे अशाचप्रकारचे राहिले आहे.
मात्र, येथील हिंदू समाजाने काशिविश्वनाथाच्या अवतीभोवती मुस्लिमांना आपल्या वस्त्या निर्माण करण्यापासून ठामपणे रोखले. त्यामुळेच हिंदू समाजाला काशिविश्वनाथाचे दर्शन घेणे शक्य झाले. मात्र, सर्वेक्षणामध्ये ज्या वजूखान्यामध्ये शिवलिंग सापडले आहे, ते स्थानिक काशीवासीयांना अनेक वर्षांपासून माहिती आहे. त्यामुळे खरेतर आता मुस्लिमांना जगप्रसिद्ध अशी ‘गंगाजमुनी तहजिब’ दाखविण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. त्यांनी आता वाद न वाढविता ज्ञानवापीची ती जागा हिंदू समाजाच्या स्वाधीन करावी. मात्र, तसे होण्याची शक्यता धुसर आहे. कारण, सर्व काही ओरबाडूनच घ्यायचे आणि ते आपलेच असल्याचे दाखविण्याची मानसिकता एवढ्या लवकर बदलणार नाही,” असे भारद्वाज यांनी सांगितले.

हिंदू पुनर्जागरण आता थांबणार नाही!

बनारस हिंदू विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख प्राध्यापक राणा पी. बी. सिंह या घटनेस हिंदू ‘रेनेसाँ’ अर्थात पुनर्जागरणाचे पुढचे पर्व मानतात. त्यांच्या मते हिंदू हा आपल्या हक्कांसाठी नेहमीच जागरुक होता आणि आहे. त्यामुळे काशिविश्वनाथाचा हक्क हिंदू समाज सहजासहजी सोडून देईल, असे मानणे अतिशय चूक होते. मात्र, काशी आणि ज्ञानवापीकडे केवळ धार्मिक दृष्टीने बघण्याची चूक यापुढे होता नये. कारण, काशी हे भारतातील प्राचीनतम शहर आहे. ज्ञानवापी काशीचे केंद्रस्थान आहे, ज्याची निर्मिती भगवान शिवाने केली आहे. काशिविश्वनाथाच्या प्राचीन मंदिराची बांधणी ही खगोलशास्त्रास अनुसरून झाली आहे आणि ते वैशिष्ट्य या शहराने अनेक शतकांपासून जपले आहे. त्यामुळे काशीचा अभ्यास करताना विज्ञान, खगोलशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र आणि अध्यात्म यांची सांगड घालावीच लागणार आहे.

कारण, वाराणसी हे खगोलीय-आर्किटाईपल शहरांपैकी एक आहे, जेथे भौतिक वातावरण मॅक्रो (स्वर्ग), मेसो (पृथ्वी) आणि मायक्रोकॉसमॉस (मंदिर अथवा मानवी शरीर) यांच्यातील समांतरता व्यक्त होऊन पवित्र अवकाशीय प्रणाली पुनर्गठित करते. या शहरात पाच पवित्र स्थाने आहेत, पाच हा आकडा संपूर्णतेचे प्रतीक असून पाच ही शिवाची संख्या आहे. शिव हा प्रमुख तीन हिंदू देवतांपैकी एक. तो काळाचा नियंत्रक, विश्वाचा नाश करणारा आहे, तोच वाराणसीचा संरक्षक आहे. पवित्र प्रदेशांचे पाच स्तर आणि विश्वाच्या तीन स्तरांमधील वैश्विक परस्परसंबंध आणि ‘कॉस्मिक’ किरणे हे ज्ञानवापीचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी मी गेली ४७ वर्षे संशोधन करीत आहे. मात्र, यामध्ये अद्याप बरेच संशोधन होणे बाकी आहे. कारण, काशी हा विषय फार गहन आहे. त्यामुळे हिंदू पुनर्जागरणाच्या या पुढच्या पर्वामध्ये केवळ काशीच नव्हे, तर भारतातील सर्वच प्राचीन शहरांचे सांस्कृतिक खगोलशास्त्रानुसार अभ्यास करण्याची गरज प्रा. सिंह यांनी व्यक्त केली.


काशीमधल्या तीन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, काशी आता सज्ज आहे. काशी आता सज्ज आहे, ते आपले वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी. काशी आता सज्ज आहे, काशिविश्वनाथाचे आगमन पाहण्यासाठी, काशी आता सज्ज आहे, शेकडो वर्षांचा मानभंग आणि तेजोभंग पुसून टाकण्यासाठी. काशी आता सज्ज आहे आपला हक्क मिळविण्यासाठी लढा कसा द्यायचा, हे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी. त्यासाठी काशीला एक मंत्र मिळाला आहे, तो म्हणजे ‘बाबा मिल गए.’ केवळ काशीच नव्हे, तर देशभरातील हिंदू समाजासाठी हा मंत्र आहे.





या तीन अक्षरी मंत्रामुळे देशभरातील हिंदू समाज आज नव्या ऊर्जेने आपला हक्क मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा उन्माद नसून आपला हक्क प्राप्त करण्याची ऊर्मी आहे. या तीन अक्षरी मंत्रामुळे हिंदू समाजाला पुन्हा एकदा जाणीव झाली आहे की सनातन हिंदू धर्मास नष्ट करण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरीही हा समाज हार मानत नाही. योग्य वेळेची वाट पाहतो आणि ती वेळ येताच आपला हक्क मिळविण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करतो आणि अखेरीस हक्क मिळवतोच. त्यामुळे काशीचा हा लढा हिंदू समाजासाठी पुढील अनेक लढ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे, यात कोणतीही शंका नाही.
Powered By Sangraha 9.0