मुंबईकरांना आता विकासाची आशा फक्त भाजपकडूनच : आ. अ‍ॅड. आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

ashish shelar
 
 
 
 
 
मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका, भाजपची त्यादृष्टीने सुरू असलेली तयारी आणि दणक्यात सुरू झालेल्या ‘पोलखोल’ सभा याविषयी भाजपचे आमदार आणि मुंबई भाजपचे निवडणूक संचालन समिती अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांची दै. ‘मुंबई तरुण भारत’ने घेतलेली ही विशेष मुलाखत...
 
 
 
कोट्यवधींचा अर्थसंकल्प असणारी मुंबईची महापालिका आहे. मात्र, तरीही इतक्या वर्षांत सत्ताधारीशिवसेनेला मुंबईचा अपेक्षित विकास का करता आला नाही?
 
खरेतर तर हे मुंबईकरांचे दुर्दैवच आहे. सलग २५ वर्षे एका परिवारावर आणि एका पक्षावर मुंबईकरांनी भरभरून विश्वास टाकला. पण, त्याच्या मोबदल्यात मुंबईकरांना कमी नाही, तर उणिवाच मिळाल्या. म्हणून एकंदरीतच पाहिले, तर २५ वर्षे सत्तेत बसल्यानंतरही सन्मानीय मंत्री आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता असे म्हणतात की, “रस्त्यावर खड्डे पडणारच! मी शाश्वती देऊ शकत नाही. पाणी तर तुंबणारच! कारण, पाऊस पडला तर मी काही करू शकत नाही.” ही हतबलता सातत्याने २५ वर्षे सत्ता असतानाही आदित्य ठाकरे व्यक्त करत असतील, तर तो त्यांचा पळपुटेपणा आणि मुंबईकरांप्रति असलेली त्यांची असंवेदनशीलताही आहे. गेल्या पाच वर्षांत जर आपण पाहिले, तर पालिकेचे दोन लाख कोटींचे बजेट. त्यापैकी ५० टक्के प्रशासकीय खर्चही आपण बाजूला काढू. एक लाख कोटी रुपये १ कोटी, ४० लाख मुंबईकरांसाठी होते. तरी मग या पाच वर्षांत मुंबईकरांसाठी भरीव असे काय सत्ताधारी देऊ शकले? सगळेच चित्र विदारक आहे. कोरोनाच्या काळात महापालिकेच्या रुग्णालयांची स्थिती काय होती? एकाच बेडवर रुग्ण आणि त्याच्या बाजूला मृत शरीरे, यापद्धतीने शीव रुग्णालयापासून सर्वच रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यामुळे नियोजनशून्यता, नावीन्यशून्यता आणि नकारात्मकता यातूनच शिवसेनेने २५ वर्षांत केवळ भ्रष्टाचाराची पाळेमुळे जोपासली.
 
 
 
मुंबईतील कोळी बांधव असतील अथवा चाळींमधील रहिवासी असतील, हा वर्ग सातत्याने पालिकेच्या अनेक प्रकल्पांना विरोध करताना दिसतो. राज्य सरकार आणि मुंबई पालिका या समस्याग्रस्तांशी संवाद साधायला कमी पडली आहे, असे आपल्याला वाटते का?
 
सत्तेत बसलेले शिवसेनेचे नेतृत्व, मग ते सत्तेत बसलेले पक्षप्रमुख असो किंवा इतर मंत्री असो, हे केवळ एकच कार्यपद्धती अवलंबत आहेत आणि ती म्हणजे अहंकार, अहंकार आणि केवळ अहंकार. अहंकारापोटी ते वास्तव बघायला तयार नाही. २०१४ ते २०१९ मध्ये जे जे विकासाचे कार्यक्रम समोर आले, त्याला ज्या अहंकारापोटीच शिवसेनेने विरोध केला. त्याच कार्यक्रमांना पुढे घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आज आली आहे. गिरगावच्या मेट्रोलादेखील शिवसेनेने विरोध केला होता. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध केला, कोस्टल रोडला विरोध केला, आत्ताच्या काळात आरे कारशेडला विरोध केला, मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ला विरोध, मुंबई-दिल्ली महामार्गालाही विरोध सुरु आहे. एवढेच नाही, तर राज्यभरात नाणार असो, जैतापूर असो या प्रकल्पांनाही विरोध सुरू आहे. केवळ अहंकार आणि स्वार्थापोटी विकासाची, सामान्य माणसाची स्वप्ने शिवसेनेने बेचिराख केली. त्यामुळे आता जेव्हा हे प्रकल्प प्रत्यक्ष राबविण्याची वेळ आली आहे, तेव्हा त्याला जनतेतूनच विरोध होताना दिसतो. वरळी कोळीवाड्यात ‘कोस्टल रोड’च्या बांधकामादरम्यान दोन पिलरमधील अंतर १६० मीटरचे असावे, ही साधी मागणी आहे. दोन बोटींमध्ये जाण्यासाठी लागणारे अंतर कोळी बांधवांना माहिती आहे. मात्र, आम्हाला त्यांचे ऐकायचेच नाही. स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांची बैठक बोलावली होती. त्याही वेळेला अगदी १५ मिनिटे बैठक घेऊन ते निघून गेले. त्यामुळे जोपर्यंत हे सरकार सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार करणार नाही, सर्वसमावेशकता त्यांच्या कामाचा भाग होणार नाही, तोपर्यंत विकासाच्या प्रकल्पाला जनतेचे समर्थन मिळविण्यात शिवसेनेचे सरकार कमी पडेल.
 
 
 
मुंबई भाजप ‘पोलखोल’ अभियान, ‘चौपाल’, ‘मराठी कट्टा’ या माध्यमातून मुंबईकरांच्या घरातघरात पोहोचली आहे. तेव्हा या सगळ्या अभियानांना मुंबईकरांच्या मिळणार्‍या प्रतिसादाविषयी काय सांगाल?
 
मी मुंबईभर फिरतो आहे. संपूर्ण मुंबईत वावर असणार्‍या नेत्यांपैकी मी एक आहे. आज मुंबईत जो प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला दिसतो आहे, तो अभूतपूर्व आहे. प्रभादेवी, माहीम, शिवाजी पार्क, दहिसर, मुलुंड, वांद्रे पूर्व या भागांमध्ये मी ‘पोलखोल’ सभा घेतल्या. ‘मराठी कट्टा’ आणि ‘बूथ संमेलन’ही झाले. यानंतर मी ठामपणे सांगू शकतो की, आमचा संपर्क तर मजबूत आहेच, पण विकासाबाबत मुंबईकरांना आता आशा फक्त नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजपकडून राहिलेली आहे. हे चित्र मला प्रत्येक कार्यक्रमांत दिसले. अपेक्षांचे ओझे वाढते आहे, परिपूर्ततेचा पाठपुरावा आणि गृहपाठ आम्ही करू आणि जनतेच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करू!
 
 
 
मागील काही वर्षांत भाजप अधिकाधिक आक्रमक झालेली दिसते. अनेक प्रश्नांना थेट रस्त्यावर उतरून प्रत्युत्तर भाजपतर्फे दिले जाते. तेव्हा, नेमका हा बदल कशामुळे?
 
भाजपचा पूर्ण कार्यकाळ जर आपण पाहिला, तर बहुतांशी आम्ही विरोधी पक्षातच राहिलो आहोत. त्यामुळे विरोधी पक्षात राहणे, आंदोलन करणे, नावीन्यपूर्ण आंदोलन करणे, हा आमचा स्थायीभाव आहे. पण, मी विशेषतः २०१३-१४ नंतरचा भारतीय जनता पक्ष बघतो आहे. यामध्ये तुलनात्मक पाहिले तर जास्त युवती आणि युवकांचा भरणा हा आजच्या भाजपमध्ये आहे. हा युवक मराठी-अमराठी दोन्ही आहे. तो युवक सर्वसमावेशक आहे, प्रतिक्रियावादी आहे, विचारपूर्वकही आहे, क्रियात्मक आहे. त्यामुळे जेव्हा तरुणाई तुमच्याबरोबर असते, तेव्हा त्याच्याबरोबर आक्रमकता हा स्वाभाविक येणारा गुण असतो. त्यामुळे आजच्या भाजपमधील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता दिसून येते. त्याचे मूळ कारण संघविचार, त्यांची कार्यपद्धती, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या काळात भाजपमध्ये तरुणाईचा वाढलेला वावर हा आता रस्त्यावर दिसतोय, सभांमधून दिसतोय, कार्यक्रमांमधून दिसतोय. हाच वर्ग भाजपला संपूर्ण विजयाकडे घेऊन जाईल.
 
 
 
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांना होत असलेली गर्दी आणि मुंबईत विस्तारत असलेली भाजप हे पाहता, मुंबईत युतीत असताना सर्वाधिक नुकसान भाजपचे झाले, असे आपल्याला वाटते का?
 
होय. मी हे कबूलच करेन की, युतीत असल्याने शिवसेनेचाच फायदा जास्त झाला. भाजपची संख्या कमी झाली. सत्य समोर आले पाहिजे म्हणून सांगतो की, जर आकडे पाहिले तर शिवसेनेच्या जन्माला येण्यापूर्वी भाजप म्हणजे तेव्हाचा जनसंघ हा मुंबई महानगरपालिकेत निवडून येत होता. केवळ इतकेच नव्हे तर मुंबईचा पदवीधर मतदारसंघ असो किंवा मुंबईत निवडून येणारा आमदार असो, यात भाजप होता. युती झाली तेव्हा शिवसेना शून्य होती. भाजप निवडून येत होता. मुंबईकरांचा विश्वास संपादन करत होता. युतीच्या काळात बाळासाहेबांसोबत काम करण्याचा आनंदही होता. काँग्रेसच्या निधर्मी वातावरणात सर्वधर्मसमावेशक खोट्यावादाला ’सुडो सेक्युलॅरिझम’ला विरोध करणारी एक फळी निर्माण होत होती, ज्यात बाळासाहेबांसोबत असल्याचा लाभ आणि आनंद होता. मात्र, याचा फायदा शिवसेनेला सर्वाधिक झाला. म्हणून जी शिवसेना त्याकाळात वाढायला जो वेळ लागला असता, माहीत नाही ती किती वाढली असती का? राज्यभर वाढली असती का? मात्र, या सगळ्याला भाजप, जनसंघ आणि संघ याचे व्यासपीठ मिळाले. त्यातून मिळालेली संधी गतीची होती. पण, आज आपण पाहिले की, माझे म्हणणे पुन्हा सिद्ध होत आहे. २०१४च्या विधानसभा, २०१७च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत युतीची बोलणी करायला देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना काम दिले होते, त्यात अध्यक्ष म्हणून मीही होतो. मला आजही आठवतेय, २०१७च्या बोलणीत शिवसेनेचे तेव्हाचे नेतृत्व २०१४ मध्ये मोदीजींचे सरकार येऊनही फाजील आत्मविश्वासात भाजपची कुचेष्टा करण्याचा प्रयत्न करायचे. ‘सीट’ही कमी करा, संधीही मारा आणि त्यांना वाटायचे की, मुंबई म्हणजे आम्हीच! पण, त्यांनी केलेल्या कुचेष्टेचे रूपांतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रेरणेच्या रुपात झालं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खंगला. पालिका निवडणुकीचे निकाल आले. ८४वर शिवसेना आणि ८२वर भाजप. याचाच अर्थ मुंबईकरांना आजही भाजप हवी आहे, पण तशी संधी मिळत नव्हती. संधीच्या मर्यादा युतीत होत्या, ज्या आता संपल्या आहेत. संधीत मर्यादा आता तीन पक्षांना आल्या आहेत. त्यामुळे भाजपचे यश हे आता अमर्याद होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
  
 
 
गेल्या काही काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने फारकत घेतलेली दिसते. मुंबईचा विचार केल्यास, मालाड-मालवणीत हिंदूंवरील वाढते हल्ले हे शिवसेनेने हिंदुत्वापासून घेतलेल्या फारकतीचे अपयश आहे का?
 
बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्ववादी होती. उद्धव ठाकरेंची शिवसेना हळूहळू हिंदुत्वापासून फारकत घेत आता ‘अधर्मी’, ‘अहिंदू’ या दिशेने गेली आहे. मला असे वाटते की, कोणत्या पक्षाने काय भूमिका घ्याव्या, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण, ज्या पक्षाचे निर्मितीचे, त्या पक्षात जन्म घेणारेच जेव्हा ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून ओळखले जातात, त्या पक्षाने सत्तेसाठी भगवी शाल काढून हिरवी शाल अंगावर घ्यावी, यापद्धतीने वागणे हे त्या पक्षाच्या मूळपुरुषाच्या विचारधारेचा बळी देणारे आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. मुंबई शहराचे नेतृत्व २५ वर्षे शिवसेनेकडे आहे. अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट मालाडच्या मालवणीत झाला आहे. यात अनेक घुसखोर घुसले आहेत. यावर कोणतीही कारवाई करताना ना शिवसैनिक दिसतात ना शिवसेनेचे सरकार दिसते. पण, कारवाई कोणावर होते? तर खबरदार जर तुम्ही हनुमान चालीसा म्हणाल, आमच्या विरोधात बोलाल. आता शिवसेनेची सलगीच त्या पक्षाशी आहे, ज्यांनी रामाचा जन्म झाला होता की नाही, असा सवाल उपस्थित केला होता. याच काँग्रेस पक्षाने ‘रामसेतू’ नव्हताच, असे प्रतिज्ञापत्रही दिले होते. त्यांच्याबरोबर आज शिवसेनेने युती केली. त्यामुळे मला वाटते की, शिवसेनेचा आणि हिंदुत्वाचा संबंध आता संपला आहे.
 
 
 
पालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती नाही, भाजपची वाटचाल त्रिसूत्रीनुसारच!
 
“मनसे किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी युती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांत आम्ही करणार नाही. कारण, भाजपने टप्प्याटप्प्याने जनतेपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम ठरवले आहेत. बरोबरीने मुंबईत मुंबई महानगरपालिकेसाठी, ठाण्यात ठाणे महानगरपालिकेसाठी अशाच सर्व महानगरपालिकांत स्थानिक विषयांवर लोकांच्या आयुष्यात बदल व्हावे म्हणून ‘रोडमॅप’, एक ‘ब्ल्यूप्रिंट’ची निर्मिती भाजप करते आहे. एका बाजूला जनसंपर्क, दुसर्‍या बाजूला ठोस आश्वासने आणि त्याची परिपूर्तता करणारे ‘डॉक्युमेंट’ आणि तिसरे बूथस्तरापर्यंत रचना आणि निवडणुकांचे प्रशिक्षण या त्रिसूत्रीवर भाजप पुढील मार्गक्रमण करते आहे.” असे शेलार यावेळी म्हणाले.
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@