मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मनसैनिकांकडून याची जय्यद तयारीही करण्यात आली. मात्र हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. शुक्रवार, दि. २० मे रोजी, 'तूर्तास अयोध्या दौरा स्थगित!', असे ट्वीट करत राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे अयोध्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे.
तसेच रविवार, दि. २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या जाहीर सभेस महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही राज ठाकरेंकडून या ट्वीटमार्फत करण्यात आले. प्रकृती ठीक नसल्याने अयोध्या दौऱ्याला स्थगिती मिळाली असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. मात्र राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनारून ते पुण्याच्या सभेत अयोध्या दौऱ्याबाबत काय बोलतील? असा प्रश्न सध्या उद्भवतो आहे.