नैतिक जबाबदारीचे भान गरजेचे!

    20-May-2022
Total Views |
 
 
 
 
chitle
 
 
 
 
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली खासकरुन समाजमाध्यमांवर सुरु असलेला चिखलफेकीचा खेळ हा सर्वस्वी निषेधार्ह असून प्रत्येकानेच नैतिक जबाबदारीचे भान राखणे अत्यंत गरजेचे आहे. केतकी चितळे प्रकरणातून हीच बाब पुनश्च अधोरेखित झाली आहे.
 
 
  
गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात सोशल मीडियावरील एका पोस्टने खळबळ माजविली. मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्याचे पडसाद केवळ महाराष्ट्रातील राजकारणापर्यंतच सीमित राहिले नाहीत, तर या वादाचे प्रतिकूल पडसाद थोपविण्यासाठी कायदा- सुव्यवस्थेचाही कस लागला. त्यामुळे संतांची मांदियाळी आणि अनेक थोर महानुभवांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अशा गोष्टींवरून सामाजिक व राजकीय वातावरण दूषित होणे हे खरंतर अत्यंत क्लेशकारकच म्हणावे लागेल.
 
 
 
खरंतर सोशल मीडिया हे आधुनिक जगतातील एक अत्यंत प्रभावी माध्यम. सोशल मीडियाचा शोध हे विकसित समाजाचेच लक्षण समजले जाते. एखाद्या गोष्टीचा वापर हा चांगला की वाईट करावा, हे सर्वस्वी वापर करणार्‍या व्यक्तीच्या हातात असते. सुजाण नागरिक म्हणून त्याचा योग्य वापर केला, तर नक्कीच यामुळे समाजातील कोणत्याही घटकाला त्रास होणार नाही.
 
 
 
 
 
परंतु, सोशल मीडियाचा अनागोंदी व अविचारी वापर करून समाजातील वातावरण कलुषित करण्याचे अनेक प्रसंग गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने दिसू लागले आहेत. त्यातीलच केतकी चितळे हे एक उदाहरण. तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका जाहीर सभेत कवी जवाहर राठोड यांच्या ‘पाथरवट’ या कवितेतील ओळी, त्या कवितेचा विपर्यास करून सांगितल्या. त्यावर आक्षेप घेणारी पोस्ट सोशल मीडियावर प्रदर्शित झाली. त्या इसमाची पोस्ट ही दुसर्‍या व्यक्तीने राठोड यांच्या मूळ कवितेचे फोटो टाकून शेअर केली. याच सोशल मीडियाच्या लाईक-शेअर्सच्या खेळात मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने उडी घेतली.
 
 
 
जवाहर राठोड यांची कष्टकर्‍यांच्या व्यथा आणि वेदना सांगणार्‍या कवितेचा धागा पकडूनच केतकीने संत तुकाराम महाराजांच्या अंभगाचा आधार घेत शरद पवारांवर विडंबनात्मक कविता पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने ज्येष्ठ असलेल्या शरद पवारांच्या व्यंगावर आणि एकूणच त्यांच्या जगण्याचा अधिकार नाकारणारी अतिशय खालच्या दर्जाची पोस्ट केली. तिची ही पोस्ट लवकर ‘व्हायरल’ होऊन समाजात तिचे पडसाद उमटू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी तिच्यावर आक्षेप घेत अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या. समाजातील विविध माध्यमांत कार्यरत असणार्‍यांनीही आक्षेपार्ह पोस्ट करत केतकीचा निषेध, तर काहीजणांनी समर्थन केल्याचेही दिसले. तुकाराम महाराजांच्या पवित्र गाथेतील अभंगाचे विकृत व हीन पातळीवर जाऊन विडंबन केल्याबद्दल देहू पोलीस ठाण्यात संत तुकाराम महाराज संस्थानानेही केतकीवर गुन्हा दाखल केला आहे. खुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या जाहीर सभेत या प्रकरणाचा उल्लेख करत निषेध नोंदविला. असा हा एकंदरीतच घटनाक्रम.
 
 
 
 
एका ज्येष्ठ व्यक्तीवर अशी टीका होणे नक्कीच समर्थनीय नाही. मग ती एखाद्या पक्षाचे सर्वेसर्वा असो की, एखादी सामान्य व्यक्ती. कारण, आपल्या संस्कृतीची ही शिकवण नाही. थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेणे, त्यांचा आदर करणे, ही झाली आपली हिंदू संस्कृती. आपले आजचे वर्तन हे उद्याच्या येणार्‍या पिढीला दिला जाणारा वारसा असतो. हिंदू धर्म म्हणजेच हिंदू जीवनपद्धती याचाच अर्थ आपले योग्य आचरण. केतकी चितळेची ही पोस्ट म्हणजे संस्कृतीचे विस्मरणच म्हणावे लागेल.
 
 
 
 
या सर्व प्रकारात केतकीला अटक तर झालीच. यावर ‘माझी पोस्ट मी ‘डिलीट’ करणार नाही’ अशी भूमिका तिने घेतली. कारण, लोकशाहीने मला अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिलेले आहे. ‘भारतीय राज्यघटनेच्या ‘कलम 19’ मध्ये अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा उल्लेख केला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत अधिकार आहे. परंतु, अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे मोकाट बडबड करत सुटणे नव्हे!
 
 
 
  
कारण, राज्यघटनेच्या कलमातच पुढे नमूद केले आहे ते असे, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांत असले तरी, घटनेने 19व्या कलमानुसार नागरिकांना बहाल केलेले भाषण, माहिती व अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे अनियंत्रित व निरंकुश नाहीत. देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मा, राष्ट्रीय सुरक्षा, मैत्रिपूर्ण आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता यांपैकी एखाद्या गोष्टीचा भंग होत असल्यास किंवा न्यायालयाची अवमानना, बदनामी, गुन्ह्यास प्रोत्साहन होत असल्यास, व्यक्ती किंवा समूहाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूलभूत अधिकारांवर योग्य व वाजवी मर्यादा आणणारे कायदे राज्याला करता येतात. अशा प्रकारे, अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर शासन माफक बंधने घालू शकते.”
 
 
 
 
स्वतंत्र भारताच्या लोकशाही राज्यात संविधान हा सर्वोच्च कायदा आहे आणि त्या सर्वोच्च कायद्याने आपला देश चालतो, हे प्रत्येक भारतीय नागरिकाने लक्षात ठेवले पाहिजे. एखादी छोटीशी पोस्ट, तिचा विपर्यास, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरवापर, आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे अनेक पथदर्शक विकासकामे बाजूला सारून निव्वळ एका फुटकळ गोष्टींवर आपला वेळ, पैसा, राज्याची दंडशक्ती, राजशक्ती, याचा अपव्यय होऊ शकतो, याचे हे ताजे उदाहरण आहे. यासाठी प्रत्येकाला संविधान साक्षर होणे किती गरजेचे आहे, हे लक्षात येते.
 
 
 
 
लोकशाहीतील महत्त्वाचे अंग असलेली राजसत्ता. राजकर्त्यालाही राजधर्म असतात. सुदृढ समाजाचे लक्षण म्हणजे जनता सुखी असणे. यासाठी राजकर्त्यांचे पहिले कर्तव्य असे की, समाजात तेढ निर्माण होणार नाही, अशा गोष्टींची काळजी घेणे. या कर्तव्यपालनानेे राज्याची अभिवृद्धी होत जाते आणि प्रजा सुखी होते. आपण एखाद्या पक्षाचे अध्यक्ष आहोत आणि पक्षाध्यक्ष म्हणून आपल्या काही जबाबदार्‍या असतात, याची जाणीव ठेवणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे. राज्यकर्त्यांची ही कर्तव्ये सार्वकालिक आहेत आणि राज्यव्यवस्था कोणती आहे, याच्याशी तिचा काहीही संबंध नाही. राज्यकर्ता झाला की, त्याला शक्ती प्राप्त होते. या शक्तीचा वापर राजकर्त्याने लोककल्याणासाठी केला पाहिजे, हे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. राजकारणात मातब्बर असलेल्या व्यक्तीला सांगणे बरे नव्हे, पण एकंदर वातावरण पाहता खेद होतो, त्याबद्दल क्षमस्व!
 
 
 
 
महाराष्ट्र हे सर्वार्थाने समृद्ध राज्य आहे. ‘दिल्लीचेही तख्त राखतोे महाराष्ट्र माझा’ या गीताच्या ओळी सर्वश्रृत आहेतच. या महाराष्ट्राला वैभवशाली करण्यात कला आणि कलाकरांचेही स्थानही तेवढेच अटळ आहे. कलाकार, रचनाकार, प्रतिभावंत लेखक यांच्यामध्ये अभिव्यक्ती सादर करण्याची उर्मी शतपटीने असते. आपल्या कलाकृतीने कलाकार समाज समृद्ध करतात. राष्ट्र कलेच्या दृष्टीने, संस्कृतीच्या दृष्टीने वैभवसंपन्न करण्याची ताकद ही कलाकरांकडे ओतप्रोत भरलेली असते. त्यांच्या या अभिव्यक्तीचा योग्य आणि त्याच क्षेत्रात वापर केला, तर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल होण्यास मदत होईल. हिंदू संस्कृतीतील देवतांमध्येही कलेचा संचार दिसतो. याचाच अर्थ कला ही किती वंदनीय आहे.
 
 
 
 
अभिनय आणि अभिव्यक्ती याचा सुंदर मेळ कलाकाराने साधला, तर कलेच्या उत्कृष्ट अविष्काराचे दर्शन घडते. कलासाधनेने सादर करणे हे कलाकाराचे कर्तव्य आहे. परंतु,अभिनय क्षेत्रात मेहनत करायची सोडून कुठलेही कष्ट न करता वादग्रस्त विधानाने चर्चेत राहायचे, हे विकृतीचे दर्शन आहे. या अशा गोष्टींमुळे साध्य काहीच होणार नाही. फक्त एकच होऊ शकते, ते म्हणजे आपण आपला आणि आपल्या कलेचा अपमान व अनादर करून घेत आहोत. नैतिक जबाबादारीचे भान हरवले की, या अशा गोष्टी होत राहातात आणि त्यातून आपणच आपले नुकसान करत असतो, याची जाणीव होण्याची बुद्धीदेखील गमावून बसलो आहोत, हे अधोरेखित होते.
 
 
 -पूनम पवार