मुंबई : "बाबरीवर चढलेले मराठी लोक हे रामभक्त होते, शिवसैनिक नाहीत आणि हेच अडवाणींनी सांगितले होते" असे सांगत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा खोडून काढला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पडली तेव्हा शिवसेना कुठे होती? असा थेट सवाल आपल्या मुंबईतल्या बुस्टर डोस सभेतून केला होता. त्यावर प्रत्युत्तर म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जुनी मुलाखत ट्विट करून बाबरी मशिदीवर चढलेले लोक मराठी लोक होते असे त्या मुलाखतीत म्हटले असल्याचे सांगितले. यावर 'राममंदिरचे भूमिपूजन झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या लोकांवर सरकारने कारवाई केली होती', असा आरोप उपाध्ये यांनी केला.
लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, "बाबरी मशीद पाडली जात होती तेव्हा मी उमा भारतींना सांगितले की, त्या लोकांना खाली बोलवा, हे थांबवा. तेव्हा उमा भारती म्हणाल्या, की ते लोकं मराठी आहेत. माझे बोलणे त्यांना समजणार नाही. तेव्हा मी प्रमोद महाजनांना सांगितले, की त्यांना थांबाव पण त्यांचेही त्या लोकांनी ऐकले नाही तेव्हा मी स्वतःच जाणार होतो पण माझ्या बरोबरच्या पोलिसांनी मला जाऊ दिले नाही." या संपूर्ण संभाषणात कुठेही शिवसेनेचा उल्लेख नाही मग शिवसेनेचा संबंधच कुठे येतो असा सवाल केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.