ठाणे महापालिकेत निविदा घोळ; रस्ते कामाच्या निविदा रद्द करा : आ. संजय केळकर

२५० कोटींच्या निविदांची प्रक्रिया संशयास्पद

    19-May-2022
Total Views |

sanjay kelkar
 
 
 
 
 
ठाणे : ठाणे मनपात निविदा घोळ सुरू असून, काळ्या यादीतील ठेकेदार नव्या नावाने कंपनी काढून मनपा अधिकार्‍यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप आ. संजय केळकर यांनी केला आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या २५० कोटींच्या अनुदानावर ठाणे मनपाने हाती घेतलेल्या रस्ते कामांच्या निविदांची प्रक्रिया संशयास्पदरित्या राबविण्यात येत असल्याने ही प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणीही आ. केळकर यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
 
 
 
ठामपातील सत्ताधारी शिवसेनेने नागरी सुविधांच्या कामांसह बॉलीवूड पार्क, थीम पार्क, बीएसयूपीसह 50 प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार केला असून याची ‘पोलखोल’ भाजप करणार आहे. तसेच, रस्ते कामाच्या निविदांमध्येही घोळ घातल्याचा आरोप आ. केळकर यांनी केला आहे. एकीकडे ठाणेकरांना उत्तम रस्ते मिळावेत यासाठी शासन पैसे देत असताना दुसरीकडे मर्जीतील ठेकेदारांच्या भल्यासाठी निविदा घोळ घालायचे प्रकार सुरू असून, अभियंता विभागातील काही वरिष्ठ अधिकारी दबाव टाकत आहे. या निविदा प्रक्रियेत ठेकेदारांनी चांगला प्रतिसाद दिला असला तरी प्रक्रिया मात्र पूर्ण झालेली नाही. निविदांमध्ये अन्य ठेकेदारांनी सहभागी होऊ नये, यासाठी दबाव आणला गेल्याचीही चर्चा आहे.
 
 
 
काळ्या यादीतील ठेकेदारांच्या नव्या कंपन्या
 
ठाणे मनपाने विविध कारणांमुळे काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांच्या संचालकांकडून नवीन कंपनी सुरू करण्यात येते. नव्या कंपनीच्या नावाने हे ठेकेदार पुन्हा निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन विविध कामे पदरात पाडून घेतात. रस्ते कामांमध्येही असेच प्रकार सुरू आहेत. त्यामुळे यापूर्वी काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीच्या संचालकांनी नव्याने सुरू केलेल्या कंपन्यांना कामे देऊ नयेत, अशी मागणी आ. केळकर यांनी केली आहे.