ज्ञानवापी सर्वेक्षणामध्ये आढळले मंदिराचे स्पष्ट पुरावे

19 May 2022 20:27:14
gv

शिवलिंग म्हणजे कारंजा असल्याचा मुस्लिम पक्षाचा दावा ठरला फोल
 
 
 
वाराणसी, १९ मे, (पार्थ कपोले) : वाराणसी दिवाणी न्यायालयामध्ये गुरुवारी ज्ञानवापी संकुलाचे सर्वेक्षण सीलबंद पाकिटामध्ये सादर करण्यात आले. मात्र, ज्ञानवापी संकुलामध्ये स्वस्तिक, डमरू, कमलपुष्प आदी आढळून आले असून कारंजा असल्याचा मुस्लिम पक्षाचा दावाही पूर्णपणे फोल ठरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दैनिक 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली आहे.
 
 
ज्ञानवापी संकुलाचे चित्रीकरण सर्वेक्षण करण्याचा आदेश वाराणसी दिवाणी न्यायालयाने दिला होता. त्यानुसार, १४, १५ आणि १६ मे रोजी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर १९ मे रोजी ८ पानांचा सर्वेक्षण अहवाल आणि सर्वेक्षण न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयाने सुनावणी टाळली असून पुढील सुनावणी २३ मे रोजी दुपारी २ वाजता घेणार असल्याचे सांगितले आहे.
 
 
एडव्होकेट कमीशनर यांच्यातर्फे सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये मंदिराचे स्पष्ट पुरावे आढळून आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ज्ञानवापी संकुलामध्ये सापडलेले शिवलिंग म्हणजे कारंजा असल्याचा दावा मुस्लिम पक्षातर्फे करण्यात आला होता. मात्र, तलावाच्या मध्यभागी सापडलेल्या काळ्या रंगाच्या दगडाच्या शिवलिंगासमान आकृतीमध्येमध्ये (कथित कारंजा) कोणतेही छिद्र आढळले नाही, तसेच त्यात पाइप टाकण्याचीही जागा नाही. अडीच फूट उंच गोलाकार शिवलिंगासारख्या आकृतीच्या वर एक वेगळा पांढरा दगड आहे. त्यावर कापल्याची खूण होती. त्याची खोली मोडली असता ती ६३ सेंटीमीटर असून गोलाकार दगडाच्या पायाचा व्यास ४ फूट असल्याचे आढळून आले आहे.
 
 
सर्वेक्षणामधील ठळक मुद्दे
 
 
• मशिदीच्या पहिल्या दरवाजाजवळ तीन डमरूच्या खुणा सापडल्या. उत्तर-पश्चिम दिशेला असलेल्या १५*१५ फुटांच्या तळघरामधील दगडांवर मंदिराप्रमाणे कलाकृती आहेत.
 
 
• मशिदीच्या आत हत्तीची सोंड, त्रिशूळ, पान, घंटा आणि मुख्य घुमटाखाली स्वस्तिक चिन्ह आहे.
 
 
• संकुलामध्ये तीन फूट खोल कुंड सापडले असून त्याच्या मध्यभागी असलेल्या ६ फुट खोल विहीरीच्या मध्यभागी एख गोल दगडी आकृती आहे. त्यास एका पक्षातर्फे शिवलिंग असे संबोधण्यात येत आहे.
 
 
• बाहेर विराजमान असलेले नंदी आणि आत सापडलेला तलाव (ज्याच्या मधोमध एका बाजूला शिवलिंग स्थापन केल्याचे सांगितले जाते) यामधील अंतर ८३ फूट ३ इंच आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0