विवाह म्हणजे देहांचे नव्हे, हृदयांचे मिलन!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |
 
 
 
 
ganpati
 
 
 
 
 
 
नवदाम्पत्याचे मिलन म्हणजे देहांचे नव्हे, तर ते दोन हृदयांचे आहे. एक हृदय वराचे, तर दुसरे हृदय वधूचे आहे. ही दोन्ही हृदये एकरूप होत आहेत. एक दुसर्‍यांत मिसळत आहेत. दोघांचेही एक हृदय एक होणे म्हणजेच भावना व विचारांची एकरूपता! वेगवेगळ्या ठिकाणच्या नद्यांचे किंवा विहिरींचे पाणी एक दुसर्‍यात मिसळल्यानंतर त्यांना कोणीच वेगळे करू शकत नाही. तसेच वधू-वरांच्या हृदयांचे एकत्र हे पाण्याप्रमाणे. वधू-वरांच्या हृदयांना पाण्याची उपमा देण्याचे कारण हेच की, पाणी हे आपल्यामध्ये इतर द्रव्यांना सामावून घेते.
समञ्जन्तु विश्वे देवा: समापौ हृदयानि नौ।
सं मातरिश्वा सं धाता समु देष्ट्री दधातु नौ ॥(ऋग्वेद -१०.८५.४७ )

अन्वयार्थ
वर आणि वधू विवाहप्रसंगी म्हणतात- (विश्वे देवा:) विवाहमंडपात जमलेल्या हे दिव्यगुण बाळगणार्‍या विद्वानांनो, थोर माता-पित्यांनो, (नौ) आम्ही दोघेही वर-वधू (सम् + अञ्जन्तु) अगदी आनंदात एकमेकांना स्वीकारत आहोत, आम्ही एकत्र येत आहोत. एक दुसर्‍यामध्ये मिसळत आहोत. (नौ) आम्हा दोघांची (हृदयानि)हृदये (आप:) पाण्याप्रमाणे (सम्) एकसमान, शांत व मिळून-मिसळून राहतील. ज्याप्रमाणे (मातरिश्वा) प्राणवायू सर्वांना आवडतो, त्याचप्रमाणे (सम्) आम्ही दोघेही एक दुसर्‍यांना आवडत, प्रिय बनत नेहमी आनंदाने राहोत. (धाता) सार्‍या जगाला धारण करणारा परमेश्वर (सम्) सर्वांमध्ये मिसळतो, सार्‍या जगाला आपल्यात सामावून घेतो. तसे आम्ही दोघे एक दुसर्‍यांना धारण करोत. (उपदेष्ट्री) ज्याप्रमाणे उपदेश करणारा एखादा पट्टीचा वक्ता श्रोत्यांवर प्रेम करतो, त्याचप्रमाणे (नौ) आम्हां दोघांचे आत्मे एक दुसर्‍यांना (सम्) अतिशय चांगल्या प्रकारे, प्रेमपूर्वक दृढतेने (दधातु) धारण करीत परस्परावर प्रेमाचा वर्षाव करीत राहोत.
विवेचन
विवाह, लग्न, परिणय, पाणिग्रहण हे सर्व एकसमान अर्थ विशद करणारे शब्द आहेत, जे की विवाहाकरिता वापरले जातात. याच विवाह संस्काराच्या माध्यमाने समान गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले विवाहेच्छुक युवक-युवती विश्वसृजनासाठी तत्पर होतात. 16 संस्कारांपैकी महत्त्वाचा मानला जाणारा एक मंगलमय संस्कार म्हणजेच विवाह सोहळा. ‘विवाह’ शब्दाचे विश्लेषण केले, तर त्यात ‘वि+वाह’ असा समासविग्रह होतो. (वि) विशेष प्रकारचे कर्तव्य किंवा जबाबदारी (वाह) वहन करण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा विधी म्हणजेच विवाह. तसेच विवाह म्हणजे एक प्रकारचे (वि) विशेष (वाह) वाहन. गृहस्थाश्रमरूप या वाहनाची दोन चाके आहेत. ती म्हणजे पती आणि पत्नी! या दोन्ही चाकांना वैवाहिक जीवनमार्गाने समान गतीने व तेदेखील पवित्र कार्यासाठी फिरत राहायचे आहे. कोणीही मागे नाही की पुढे? सोबत सोबत चालावयाचे! मती, उक्ती आणि कृतीत एकसमानता ठेवत एक दुसर्‍यांचे मित्र बनून जगायचे आहे. किती उदात्त भावना आहे वैदिक विवाह संस्काराची.
ब्रह्मचर्य (विद्यार्थी जीवन) आश्रमातील कठोर तपश्चर्या व विद्येची साधना संपवून वधू-वर स्वेच्छेने, माता-पिता, गुरुजनांच्या आणि ज्येष्ठांच्या संमतीने धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ साधण्याकरिता एकत्र येतात आणि लग्नमंडपात उपस्थित झालेल्या मान्यवरांच्या आशीर्वादाने गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी सज्ज होतात.
विवाह विधीच्या प्रारंभी नटूनथटून जेव्हा वर-वधू जोडीने मंडपात प्रवेश करतात, तेव्हा स्वागत विधी झाल्यानंतर अगदीच सुरुवातीला उपस्थितांना नम्रतेने अभिवादन करून ते उभय नवयुगल जी प्रतिज्ञा करतात, त्या प्रतिज्ञेचा मंत्र म्हणजेच सदर ऋग्वेदीय मंत्र! ज्याप्रमाणे शाळा भरण्याच्या प्रारंभी प्रभातवेळी प्रांगणात शिस्तीत उभे असलेले विद्यार्थी प्रार्थनेनंतर सामूहिक प्रतिज्ञा करतात, तद्वतच नव वर-वधू विवाहाच्या अगदीच प्रारंभी सर्वांच्या समोर जाहीरपणे एक दुसर्‍याप्रति समर्पित होण्याची प्रतिज्ञा करतात.
विवाह संस्कार करणार्‍या पुरोहिताला, अग्निदेवतेला आणि आशीर्वाददात्या ज्ञानी, अनुभवी विद्वान मंडळींना साक्षी मानून ही प्रतिज्ञा होत आहे.हा प्रतिज्ञा मंत्र म्हणजे जणू काही संपूर्ण विवाह संस्काराचा सारांश होय. ज्याप्रमाणे दुधात लोण्याचे स्थान असते, त्याचप्रमाणे संपूर्ण विवाहविधीतले हे नवनीत. ही प्रतिज्ञा व त्यातील भावार्थ वधू-वरांनी नीटपणे समजून घ्यावयाचा आणि जीवनभर त्या प्रतिज्ञेचे दृढतेने पालन करावयाचे. मग पाहा वैवाहिक जीवन कसे फुलते आणि फलते ते! नवदाम्पत्याच्या समरसतेचा आणि एकरूप तिचा इतका उच्च दर्जाचा आशय इतर मत-पंथाच्या कोणत्याच साहित्यात शोधूनही सापडणार नाही. यात वर्णिलेला उपमा अलंकारिक उत्कटभाव खरोखरच आजकालच्या नवविवाहितांचे भावी आयुष्य मंगलमय बनवण्याकरिता जणू काही संजीवनीच ठरणार आहे.
या मंत्रात वर-वधू सुरात सूर मिळवून म्हणतात-
समञ्जन्तु विश्वे देवा:! म्हणजेच या विवाह मंडपात बहुसंख्येने जमलेल्या माता-पित्यांनो आणि जगातील दिव्य गुण, कर्म व सुस्वभाव बाळगणार्‍या थोर विद्वान मंडळींनो, आपणा सर्वांच्या साक्षीने आम्ही दोघेही परस्परांना स्वीकारत आहोत. एकमेकांना भेटत होते. आमचे मिलन होत आहे. हे मिलन काय साधेसुधे नव्हे किंवा हे काही काळापुरते मर्यादित नव्हे, तर जीवनाच्या अंतापर्यंत टिकणारे आहे. म्हणूनच तर ‘सम् + अञ्जनम्’ आमचे एकत्र मिसळणे हे दीर्घ काळापर्यंतचे आहे. ‘सम्’ म्हणजे अगदी उत्तम रीतीने, निश्चयपूर्वक व अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ‘अञ्’ म्हणजे भेटणे, जोडणे, मिसळणे, पण तेदेखील स्वेच्छेने व आनंदाने. यात कोणाचाही आग्रह नाही की जुलूम जबरदस्ती!
वधू-वरांचे हे एकत्र येणे म्हणजे केवळ शारीरिक, बाह्यआकर्षणाने नव्हे किंवा रूपसौंदर्याला भाळून नव्हे. या शरीराच्याही पलीकडे प्रेम, वात्सल्य व स्नेहाचे प्रतीक आहे, ते म्हणजे हृदय. वेदमंत्र म्हणतो- सम् आप: हृदयानि नौ!
नवदाम्पत्याचे मिलन म्हणजे देहांचे नव्हे, तर ते दोन हृदयांचे आहे. एक हृदय वराचे, तर दुसरे हृदय वधूचे आहे. ही दोन्ही हृदये एकरूप होत आहेत. एक दुसर्‍यांत मिसळत आहेत. दोघांचेही एक हृदय एक होणे म्हणजेच भावना व विचारांची एकरूपता! वेगवेगळ्या ठिकाणच्या नद्यांचे किंवा विहिरींचे पाणी एक दुसर्‍यात मिसळल्यानंतर त्यांना कोणीच वेगळे करू शकत नाही. तसेच वधू-वरांच्या हृदयांचे एकत्र हे पाण्याप्रमाणे. वधू-वरांच्या हृदयांना पाण्याची उपमा देण्याचे कारण हेच की, पाणी हे आपल्यामध्ये इतर द्रव्यांना सामावून घेते. आपल्यासारखेच रूप व रंग आपल्यात मिसळणार्‍यांना प्रदान करते. पाण्यामध्ये उच्च दर्जाचा अप्रतिम असा समन्वयभाव असतो. उत्कृष्ट स्वरूपाची शीतलता व चिरशांतता दृष्टीस पडते. तसेच पाणी हे नेहमीच स्वच्छ, निर्मळ व पवित्र असते. सृष्टीतील समग्र जीवसृष्टीची तहान शमवते. इतरांना ते आनंदित ठेवते. वधू-वरांच्या हृदयांना पाण्याची उपमा देण्याचा पवित्र उद्देश हाच की, या दोघांनीही जीवनभर एक दुसर्‍याशी समर्पित व एकरूप होऊन राहावे. वेगळे होण्याची गोष्ट कधीच करू नये. कारण, हृदये भेदली गेली की, समग्र जीवन उद्ध्वस्त झालेच समजा! म्हणूनच इतका उत्कृष्ट, उदात्त व वास्तविक दृष्टिकोन अलंकारिक भाषेतून वेदमंत्रात विशद झाला आहे.
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य  
 
 
@@AUTHORINFO_V1@@