समर्थाचिया सेवका वक्र पाहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |
 
 
 
Samarth Ramdas
 
 
 
 
 
 
परमार्थाची ओळख करून घेताना सुरुवातीच्या काळात माणसाला असे वाटत असते की, या मार्गातील ज्ञानमार्ग, योगमार्ग हे आचरण्यास कठीण आहेत. त्यातल्या त्यात भक्तिमार्ग हा सोपा वाटतो. तथापि तो खरंच सोपा आहे का? भक्तिमार्गाचे आचरण करताना अशाश्वत प्रपंचातून मन बाजूला काढून, विषयवासनांची विलक्षण गोडी असलेल्या संसारातून आणि अहंकार, देहबुद्धी या चिवटवृत्ती सोडून शाश्वत परमेश्वराची अनन्यभावे भक्ती करणे, हे वाटते तितके सोपे नाही. हा भक्तिमार्ग आचरायला विलक्षण मानसिक सामर्थ्य, श्रद्धा, शरणागती लागते, ईश्वराविषयी प्रेम लागते, ते प्राप्त करणे तितकेच कठीण आहे.
 
सर्वसामान्य माणसाला असे वाटत असते की, चार-दोन लोकांनी एकत्र येऊन भजन केले, अभंग म्हटले की, आपण भक्तिमार्गी झालो. पण, हे वरवरचे असते. भक्तिमार्गात भगवंताशी जो अनन्यभाव साधायचा असतो, त्यावर चिंतन केले जात नाही. मनाच्या श्लोकांत ‘राघवाचा पंथ’ विस्ताराने सांगताना स्वामींनी भक्तिमार्गाची रुपरेषा व त्यातील बारकावे उलगडून दाखवले आहेत. भक्तिमार्ग समजून घेताना मनाचे श्लोक अभ्यासणे योग्य आहे. माणसाचे प्रापंचिक जीवन इतके धकाधकीचे असते की, त्याला कोणाचा तरी आधार शोधावा लागतो.
 
काहीवेळा मानसिक आधाराचीही गरज असते. माणूस सर्व क्षेत्रांत कुणाचा तरी पाठिंबा, आधार शोधत असतो. भक्तिमार्गाचा प्रांत हा तर अनभिज्ञ असल्याने तेथे शाश्वत आधाराची आवश्यकता असते. भक्तिमार्गात भगवंत अंतिम साध्य असले, तरी त्यासाठी भगवंताचाच आधार शोधावा लागतो. सर्वसामान्य भक्ताची अपेक्षा असते की, आपले आराध्य दैवत हाच आपला स्वामी असून तो सर्वशक्तिमान असला पाहिजे आणि त्याने मला जवळ केले पाहिजे. अर्थात, भक्तानेही आपल्या स्वामींवर, भगवंतावर, त्याच्या सामर्थ्यावर श्रद्धा, पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या अस्तित्वावर, सान्निध्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपला भगवंत कुठेतरी एखाद्या देवस्थानात किंवा आपल्याला अज्ञात अशा स्वर्गाच्याही पलीकडे वैकुंठात आहे, असा आपला समज असतो, तसेच माझ्याप्रमाणे त्याला भजणारे त्याचे असंख्य भक्त आहेत. या सर्व पसार्‍यातून भगवंताचे माझ्याकडे कसे लक्ष जाईल, असा व्यावहारिक प्रश्न माणसाच्या मनात उत्पन्न होतो. स्वामींनी असे प्रश्न मनाच्या श्लोकांतून सोडवले आहेत. आपला भगवंत सर्वशक्तिमान व न्यायी असून तो आपल्या जवळ आहे. ‘सदा सर्वदा देव सन्नीध आहे।’ आणि त्याचा आपल्याला आधार आहे. या भावनेचा अभ्यास करावा लागतो. आता भगवंत माझ्याकडे दुर्लक्ष तर करणार नाही ना, याचे उत्तर स्वामींनी दिले आहे की, ’नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ हे दोन्ही भाव मनात वाढवावे लागतात. ‘जसा भाव तसा देव’ हे साधे सूत्र लोकांसमोर ठेवून समर्थ सांगतात की, “लोकहो, रामाला आपल्या भक्ताचा अभिमान असतो. तो खर्‍या भक्ताकडे कधी दुर्लक्ष करीत नाही. तो भक्ताचा सांभाळ करतो, हे माझे सांगणे निश्चितपणे सत्य आहे.” ‘जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी।’ आता यापुढील श्लोकांतून आपल्या विधानाच्या पुष्टीकरणासाठी समर्थ उदाहरणे देत आहेत. तसेच प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।’ हे भक्तांच्या मनावर बिंबवत आहेत. असे दिसून येईल.
 

पदीं राघवाचें सदा ब्रीद गाजे।
बळें भक्तरीपूशिरीं कांबि बाजे।
पुरी वाइली सर्व जेणे विमानीं।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२९॥
 
या श्लोकात समर्थांनी आपल्या आराध्य दैवताचे अफाट सामर्थ्य, कृपाळूपणा व त्याला असलेला आपल्या दासाचा अभिमान या गुणांचा उल्लेख केला आहे. मालक नोकराला चांगला वागवतो, काळजी घेतो, तसा सामर्थ्यवान स्वामी भक्ताची काळजी घेतो. भक्ताचे रक्षण करण्याची भगवंताची प्रतिज्ञा असते. ते ब्रीद त्याने पायात घालण्याच्या तोडर अलंकाराप्रमाणे आहे. तोडराच्या होणार्‍या आवाजातून जणू भक्तांचे रक्षण करण्याचे ब्रीद राम जगाला सांगत आहे. इतर अलंकार शरीराची शोभा वाढवतात आणि ते काढून ठेवता येतात, पण तोडर मात्र सदैव पायात घातलेले असते.
 
 
त्याप्रमाणे भक्ताचे रक्षण करण्याचे ब्रीद सदैव भगवंताच्या स्मरणात असते, असे असल्याने भक्ताला कशाची चिंता करण्याचे कारण नाही, असा आश्वासक संदेश समर्थ यातून देतात. तो उपदेश राघवाच्या भक्तीबरोबर तत्कालीन राजकीय परिस्थितीशीही सुसंगत आहे. समर्थांच्या काळी जुलमी म्लेंच्छ सत्तेच्या धाडी येत आणि विध्वंस करून जात. त्याची लोकांत दहशत होती. त्यावेळी समर्थांचा आश्वासक संदेश लोकांना धैर्य देत होता. राजकीय अस्थिरतेप्रमाणे भक्ताला सामाजिक शत्रूंनाही सामोरे जावे लागते.
 
 
समाजात असे अनेक लोक असतात की, त्यांना सत्वगुणी भक्ताचे शांत, समाधानी, परोपकारी जीवन पाहवत नाही. ते त्या भक्ताचा विनाकारण द्वेष-मत्सर करू लागतात. त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतात, त्रास देतात. अशा शत्रूंचा बंदोबस्त करायचा, तर रामाला धनुष्याला बाण लावावा लागत नाही. राम धनुष्याची कांबी शत्रूंच्या डोक्यावर जोराने आपटतो. तेवढे शत्रूचा नाश करायला पुरेसे असते. ‘भक्तरिपू’याचा अर्थ असाही घेता येतो की, भक्ताला त्रास देणार्‍या काम, क्रोध, मद, अहंकार, देहबुद्धी या शत्रूंना अद्दल घडवण्यासाठी राम, विवेक वैराग्यरुपी धनुष्यकांबीचा जोरात वार करुन भक्ताच्या या शत्रूंचा नायनाट करतो.
 
 
जे रामाचे भक्त झाले, जे अनन्यभावाने रामाला शरण गेले, त्या सर्वांना राम उद्धरून नेतो. यासाठी रामायणातील एका प्रसंगाचा स्वामी उल्लेख करतात. असे म्हणतात की, रामांनी अखेरच्या वेळी आपली नगरी, अयोध्येतील सर्व प्रजाजन विमानात बसवून वैकुंठात नेले. ही एक सांकेतिक भाषा आहे, हे ओळखून त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नये. वैकुंठ ही भक्तिमार्गातील अत्युच्च समाधानाची, आनंदाची अवस्था आहे. रामाने त्याच्या नगरीतील सर्व लोकांना, त्यांच्यात भेदभाव न करता, आपल्या कृपेने विनासायास (विमानात जसा अडथळा न येता प्रवास होतो तसे) समाधानाच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवले. असा हा राम सामर्थ्यशाली असून भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. जो त्याच्या सहवासात येतो, त्याचा उद्धार राम करतोच. आपल्या भक्तांत तो दुजाभाव करीत नाही. तो भक्ताला सांभाळतो व त्याच्याअंगी सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे रामभक्ताला भिण्याचे कारण उरत नाही. रामाच्या भक्ताचे शत्रू रामाच्या प्रभावाने निष्प्रभ होतात.
 
 
यासाठी समर्थ म्हणतात-
समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे।
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३०॥
 
 
मनाच्या श्लोकांतील हा एक महत्त्वाचा, प्रभावशाली व लोकप्रिय असा श्लोक आहे. भक्ताच्या मनात धैर्य, आत्मविश्वास निर्माण करणारी ओजस्वी भाषा समर्थांनी या श्लोकात वापरली आहे. समर्थांचा समर्थ जो श्रीराम त्याचे आपण सेवक आहोत. राम हा महाप्रतापी असल्याने तुमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. या सर्व भूमंडलात रामाच्या भक्ताकडे कपटी नजरेने पाहू शकणारा कोणी नाही. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात लोकांचा आत्मविश्वास परत येत होता. अशावेळी समर्थांनी वरील श्लोकांद्वारा तात्त्विक अधिष्ठान देऊन लोकांच्या धैर्याला, आत्मविश्वासाला बळकट केले. हा श्लोक आजही खेड्यापाड्यातसुद्धा सर्वत्र बोलला जातो. आपण एकदा डोळे बंद करुन मनातल्या मनात हा श्लोक मोठ्याने म्हणून पाहा, तुम्हाला अंत:चक्षूंसमोर एका डोंगरावर उभे राहिलेले, उजव्या हातात कुबडी धारण केलेले, दोन्ही हात उंचावून रामभक्तांना आश्वासन देणारे प्रेरक समर्थ दिसतील, इतकी या श्लोकाची भाषा प्रभावी आहे.
 
 
 
 
 
 -सुरेश जाखडी
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@