भारताला ‘कान’ महोत्सवात अधिकृत सन्माननीय देशाचा सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2022
Total Views |
 
 
vicharvimarsh
 
 
 
 
 
 
फ्रान्समधील रिव्हिएराची शांत किनारपट्टी ‘कान’ चित्रपट महोत्सवाच्या 75व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या महोत्सवासोबतच दरवर्षी आयोजित होणार्‍या ‘मार्चे दू फिल्म्स’ अर्थात चित्रपट बाजारपेठेत यावर्षी भारताला अधिकृत सन्माननीय देशाचा मान मिळाला आहे. या निमित्ताने जागतिक प्रेक्षकांना भारताची चित्रपट क्षेत्रातली सर्वोत्तमता, या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या पातळीवर भारताने घेतलेली भरारी, भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि कथाकथन विषयक वारसा याचं दर्शन घडवून आणणं हाच भारताचा मानस आहे.
 
 
भारत आणि फ्रान्स यांच्या राजनैतिक संबंधांनाही ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सची राजधानी पॅरिसला दिलेली भेट आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत केलेली द्विपक्षीय चर्चा अधिकच महत्त्वाची ठरते. खरंतर या महत्त्वपूर्ण राजनैतिक पार्श्वभूमीवरच यंदाच्या ‘कान’ चित्रपट महोत्सवासोबत आयोजित होत असलेल्या ’मार्चे दू फिल्म्स’ अर्थात चित्रपट बाजारपेठेत यावर्षी भारताला अधिकृत सन्माननीय देशाचा मान मिळाला आहे.
 
‘कान’ चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाल्यापासूनच या महोत्सवाने भारत आणि फ्रान्समधले परस्पर संबंध दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९४६ मध्ये प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते चेतन आनंद यांच्या ’नीचा नगर’ या चित्रपटाला ‘कान उत्सव पुरस्कार’ अर्थात ’पाम डी ओर’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. तेव्हापासूनच याचा पाया रचला गेला. त्यानंतर एका दशकाच्या अंतराने म्हणजेच १९५६ मध्ये सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटाने ‘पाम डी ओर’ पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. २०१३ साली झालेल्या ‘कान’ चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नाही, तर गेली अनेक वर्षे भारतीय चित्रपटसृष्टीतील असंख्य दिग्गज ‘कान’ चित्रपट महोत्सवात परिक्षक म्हणून काम पाहात आले आहेत.
 
यावर्षीच्या ‘कान’ चित्रपट महोत्सवातला भारताचा सहभाग अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. यावर्षीच्या ’रेड कार्पेट इव्हेंट’मध्ये पहिल्यांदाच चित्रपट क्षेत्रातील भारताच्या सर्वोत्तमतेच्या विविधतेचे दर्शन घडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, यात केवळ भारतातील विविध भाषा आणि प्रदेशांमधले कलाकारांपुरतं मर्यादित असलेलं वैविध्य नाही, तर विविध ‘ओटीटी’ व्यासपीठे/प्लॅटफॉर्म्स आणि त्यांच्यासोबतच तरुण आणि वृद्धांनाही मंत्रमुग्ध करणारे संगीतकार आणि लोककलावंत यांचा सहभाग असलेलं वैविध्य आपल्याला दिसणार आहे.
 
 
या महोत्सवातल्या भारतीय दालनात अर्थात ‘इंडियन पॅव्हेलियन’मध्ये भारतीय संगीत क्षेत्रातले दिग्गज आपल्या सादरीकरणातून भारतीय चित्रपटसृष्टीतील चैतन्य आणि विविधतेचे दर्शन घडवणार आहेत. माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील भारतीय ‘स्टार्टअप्स’ देखील ‘अ‍ॅनिमेशन’, ‘व्हिज्युअल इफेक्ट’, ‘गेमिंग’ आणि ‘कॉमिक’ अर्थात ‘एव्हीजीसी’ (अतॠउ) क्षेत्रातल्या त्यांच्या तांत्रिक क्षमता जगासमोर मांडण्यासाठी सहभागी होणार आहेत. इतकंच नाही ‘अ‍ॅनिमेशन’ क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यावसायिकांचं शिष्टमंडळही त्यांची सोबत करणार आहेत. यंदाच्या ‘कान’ चित्रपट महोत्सवात चित्रपट जगत आतुरतेने वाट पाहत असलेल्या ‘रॉकेटरी’ या भारतीय चित्रपटाचा बहुप्रतिक्षित प्रीमिअर होणार आहे. यासोबतच इतर प्रादेशिक भाषांमधील अनेक चित्रपटांचा पहिला खेळही यावर्षीच्या ‘कान ’चित्रपट महोत्सवातच होणार आहे. महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी की, सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘प्रतिद्वंदी’ ही त्यांची अभिजात कलाकृतीही यंदाच्या ‘कान’ महोत्सवाच्या ‘क्लासिक’ या विभागात दाखवली जाणार आहे.
 
‘कान’ महोत्सवातला भारताचा गौरव आणि त्याचवेळी चित्रपट क्षेत्रातल्या भारताच्या सर्वोत्तमतेची घेतली जाणारी दखल, यामुळे जग आता भारताकडे ’चित्रपट क्षेत्रासाठी आवश्यक आशयाचं जागतिक केंद्र म्हणून पाहू लागेल. खरंतर आजची परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत जगभरातील मनोरंजन विषयक नंदनवनाच केंद्र आता बदलून, ते पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकलं असून यात भारताचाही समावेश आहे. भारताचा हा अद्भुत प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या मांडला गेला आहे आणि अशावेळी जेव्हा आपण ’स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत, तेव्हा चित्रपटाने आपल्या स्वातंत्र्यलढ्यात, अगदी अशांततेच्या काळापासून ते आपल्या यशस्वी मार्गाक्रमणाच्या काळापर्यंत, बजावलेली भूमिका आणि त्याचं केलेलं चित्रण, याचं आपण निश्चितच स्मरण केले पाहिजे.
 
भारताच्या ’सर्जनशील क्षेत्राविषयी’च्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर त्यात प्रसार माध्यमं आणि करमणूक क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे दिसते. इतकेच नाही, तर भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ची इतर देशांना जाणीव करून देण्यातही या क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. संयुक्त-निर्मिती, चित्रीकरण आणि चित्रपट विषयक सुविधांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारने गेल्या आठ वर्षांत अनेक मोठ्या उपक्रमांची संकल्पना मांडली आणि त्या पुढे घेऊन जाण्यासाठी पुढाकारही घेतला. देशातल्या इतर राज्यांप्रमाणेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी चित्रपट सोईसुविधा, धोरणे आणि संयुक्त निर्मितीसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून याबाबतीत पुढाकार घेतला आहे.
 
 
२०१८ मध्ये आमच्या सरकारने १२ ’चॅम्पियन सेवा क्षेत्रे’ घोषित केली होती. यात आमच्या सरकारने दृकश्राव्य सेवांचाही अधिकृतपणे समावेश केला होता. इतकेच नाही, तर अलीकडेच ‘अ‍ॅनिमेशन’, ‘व्हिज्युअल इफेक्ट’, ‘गेमिंग’ आणि ‘कॉमिक’ अर्थात ‘एव्हीजीसी’ (अतॠउ) क्षेत्रात भारताला मोठी झेप घेता यावी आणि जगाने या क्षेत्रातलं पसंतीचं निर्मिती केंद्र म्हणून भारताला प्राधान्य द्यावं, या दिशेने वाटचाल करण्याच्यादृष्टीने, या क्षेत्रासाठी एका कृती दलाची ही घोषणा करण्यात आली आहे. यात या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींचा समावेश आहे. काही आठवड्यांपूर्वीच, आपण ५ हजार, ९०० लघुपट, माहितीपट आणि चित्रपटांचे डिजिटायझेशन आणि जतनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकारचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपल्या चित्रपटविषयक वारशाचं जतन, संरक्षण करणं आणि त्याचा प्रसार करणं या उद्देशानेच सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
 
आपण पाहत आहोत की, भारतासह जगभरात, माध्यमांशी निगडित व्यवसायाचे स्वरूप आणि आशयनिर्मिती, त्याचा वापर आणि वितरण यात आमूलाग्र बदल झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तव अर्थात ‘व्हर्चुअल रियालिटी’ तंत्रज्ञान, आपल्याला गुंतवून ठेवणारे ‘मेटाव्हर्स’सारखे तंत्रज्ञान, या सगळ्यांच्या उदयाने भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कुशल मनुष्यबळासाठी संधींची अपार द्वारे खुली केली आहे. याच पार्श्वभूमीवर जर का आपण काही अहवाल पाहिले, तर त्यात २०२३ पर्यंत भारतातील ‘ओटीटी’ बाजारपेठ वार्षिक २१ टक्के दराने वाढून जवळपास १२ हजार कोटी रुपयांची होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजच्या घडीला ‘ओटीटी’ क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांची संख्या परदेशी कंपन्यांपेक्षा जास्त आहे आणि महत्त्वाचे म्हणजे प्रसारण आणि वितरण तसेच दूरसंवाद कंपन्यांमध्ये भारतात आपला व्यवसाय स्थापना करण्यासाठी कमालीची चढाओढ लागली आहे.
 
आपला भारत हा गजबजलेली शहरे आणि खेडी यांनी बनलेला देश आहे. भारतातील कथानकांचा संपन्न वारसा आणि इथल्या दुर्गम भागातली प्रतिभा मुख्य प्रवाहातील चित्रपटाच्या तसेच ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरच्या चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमींच्या कल्पनांचे वेध घेत आहेत, विविध पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवत आहेत. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने, देशभरात प्रादेशिक चित्रपट महोत्सवांचं अधिकाधिक आयोजन होईल यावर अधिक भर दिला आहे. याअंतर्गतच लडाख, काशी आणि जम्मू-काश्मीरमध्ये चित्रपट महोत्सवांचे आयोजनही करण्यात आले होते.
  
या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर का भविष्याबद्दल बोलायचं ठरवलं, तर असं नक्कीच म्हणता येईल की, भारत आज जे काही निर्माण करतो, तेच उद्या जगात स्वीकारलं जाणार आहे. आता आपण आणखी एक मोठी झेप घेण्यासाठी तयार झालो आहोत. कारण, भारताचे सुमारे ३० कोटी नागरिक परस्परांशी ऑनलाईन पद्धतीने जोडले जाणार आहेत, आणि यातूनच माध्यम आणि करमणूक क्षेत्रातल्या व्यापारविषयक संधींबाबत परस्परांसोबतचा दुवाही साधला जाणार आहे. भारतातील उदयोन्मुख असं माध्यमं आणि करमणूक विषयक क्षेत्राची २०२५ पर्यंत वार्षिक चार ट्रिलियन रुपये इतकी उलाढाल होऊ शकते आणि याची जाणीव असल्यानेच सरकारने आपली धोरणेही माध्यमं आणि करमणूक विषयक देशभरातल्या परिसंस्थेला चालना देतील अशीच आखली आहेत.
परस्परांशी जोडलं जाणं, संवाद साधणं, नवी निर्मिती करणं तसंच नव्या आवडी-निवडी आणि या सगळ्याचा वापर याबाबत भारताने जागतिक पातळीवर जी संधी उपलब्ध करून दिली आहे, तशी इतर कुठेही उपलब्ध नाही आणि त्यामुळेच तर कथाकथन क्षेत्राचा प्रदीर्घ वारसा असलेल्या भारतभूमीवर आज सिनेजगताचा प्रकाशझोत आहे!
 
 
-अनुराग सिंग ठाकूर
 
(लेखक केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत.)
 
@@AUTHORINFO_V1@@