वडाळा पूर्वमधील दूषित नाल्यामुळे नागरिक हैराण

18 May 2022 16:14:43

ground zero 
 
 
मुंबई (शेफाली ढवण) : पावसाळ्याला केवळ एक महिना शिल्लक असूनही वडाळा पूर्व, दीनबंधू नगर आणि संगम नगर यांना जोडणारा नाला अजूनही साफ न झाल्याचे आणि मागील १५ ते २० वर्षे या नाल्याची संपूर्ण सफाई न झाल्याचे येथील स्थानिकांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना स्पष्ट केले. आम्ही नगरसेवकांना अनेकदा नाला साफ करण्याविषयी सांगूनही स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पावले उचलण्यात आली नाहीत. लोकप्रतिनिधी हे फक्त निवडणुकांपुरतेच आश्वासन देतात. पण ती आश्वासने अंमलात आणत नाहीत, अशी तक्रार येथील स्थानिकांनी केली आहे.
 
 
तसेच, पावसाळ्यात अनेकदा तुंबलेल्या नाल्यामुळे सर्व दूषित पाणी घरात येत असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे, अनेकदा आमच्या कुटुंबातील लोक आजारीदेखील पडतात. हा नाला पूर्णपणे धोकादायक परिस्थितीमध्ये असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, लहान मुले खेळत असता अनेकदा त्या नाल्यापाशी गेल्याने दुर्घटनादेखील घडल्याचे नागरिकांनी सांगितले.
 
 
साधारण एक लाख वस्त्यांतील दूषित पाणी, हे या नाल्यातच येत असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच,लोकप्रतिनिधींकडून या संदर्भात कोणतीच पावले उचलण्यात येत नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली असून,लवकरात लवकर या नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी विनंतीही केली आहे.
Powered By Sangraha 9.0