"मुंडे-महाजनांच्या लेन्सनंतर पवारांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य लाभलेले..."

18 May 2022 16:19:30

Pankaja Munde Dhananjay Munde
 
 
 
 
मुंबई : "मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य ज्यांना लाभलंय, ते धनंजय मुंडे.", असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपले बंधु आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंना जोरदार टोला लगावला आहे. बुधवार, दि. १८ मे रोजी प्रभादेवी येथे पार पडलेल्या डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उदघाटन समारंभावेळी त्या बोलत होत्या. या नेत्रालायचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, कॅबिनेट मंत्री अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
आपल्या भाषणादरम्यान पंकज मुंडेंनी धनंजय मुंडेंना लगावलेले टोले हे मुंबईतल्या गल्लीपासून ते बीडपर्यंत चांगलेच गाजल्याचे दिसत आहे. 'लेन्स' या शब्दाचा वापर करून पंकजा मुंडेंनी दाखवलेली आपली विनोदी शैली केवळ धनंजय मुंडेंचे नाव घेताना नाही तर इतर मान्यवरांची नावे घेतानाही त्यांनी दाखविली.
 
 
"अनुभवाच्या आणि राजकीय दृष्टीच्या लेन्सेस ज्या सध्या कोणाकडेही नाहीत असे आदरणीय शरद पवार; ज्यांच्याकडे सर्वांना सोबर अशाप्रकारे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि ज्यांचे लेन्सेस सर्वांना सूट करतील असे डॉ. बाळासाहेब थोरात; सध्याचा नवीन चेहरा आणि ज्याच्याकडून नवी दृष्टी देण्याची अपेक्षा आहे असे आदित्य ठाकरे; ज्यांच्या मैत्रीची परंपरा विलासराव देशमुख आणि मुंडे साहेबांपासून आहे, असे सोफेस्टिकेटेड लेन्सेस असणारे आमचे शेजारी अमित देशमुख; माझ्या लेन्सेस मधून बघून समाधानी असलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि मुंडे महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत आज पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघण्याचं भाग्य ज्यांना लाभलंय, ते आमचे बंधु धनंजय मुंडे यांना मी अभिवादन करते.", असे म्हणत त्यांनी एकप्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याचेही दिसून आले. 
 
 
 
धनंजय मुंडे यांची 'व्यवहाराची भाषा'
डॉ. तात्याराव लहाने यांच्या सामाजिक कार्याला सलाम करताना धनंजय मुंडे म्हणाले, "पुढच्या येणाऱ्या १० पिढयांना तात्याराव लहानेंचा अभिमान राहील, तुम्ही लाखो शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आता थोडाफार व्यवहार पाहावा, ती पुढच्या पिढ्यांसाठी कामी येईल".
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0