कोरिया, किम आणि कोरोना...

17 May 2022 11:41:20
 
 
north korea covid 
 
 
 
 
‘ओमिक्रॉन’चा उत्तर कोरियात संसर्ग झाला असून १२ लाखांहून अधिक नागरिकांना या तापाने आपल्या विळख्यात घेतले आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून किम जोंग उनने उत्तर कोरियात घाबरून ‘लॉकडाऊन’चा निर्णयही घेतला. 
 
 
 
''आमच्या देशात कोरोना नाहीच. त्याचा आमच्या भूमीत प्रवेशही केवळ अशक्य!” अशा बाता मारणारा उत्तर कोरिया हा देश तापाने फणफणला आहे. या तापाचा उद्भव कोरोना असला, तरी या देशाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि त्याच्या हाताखालचे तोंडदेखले सरकार आणि सरकारी माध्यमे मात्र या तापाला ‘कोरोना’ म्हणायला, मानायला मुळी तयारच नाही. परंतु, एका माहितीनुसार, ‘ओमिक्रॉन’चा उत्तर कोरियात संसर्ग झाला असून १२ लाखांहून अधिक नागरिकांना या तापाने आपल्या विळख्यात घेतले आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून किम जोंग उनने उत्तर कोरियात घाबरून ‘लॉकडाऊन’चा निर्णयही घेतला. म्हणजे एकीकडे कोरोनाचा देशात शिरकाव झाला, हे मुळी मान्यच करायचे नाही आणि दुसरीकडे देशभर आणीबाणी जाहीर करायची, असा हा या हुकूमशहाचा मनमर्जी कारभार!
 
२०१९ साली कोरोनाचा जगभरात उद्रेक झाला. त्यावेळी सगळ्या जगाने प्रवासावर निर्बंध लादल्यानंतरही कोरोनाने सीमोल्लंघन केले. उत्तर कोरिया हा आधीच उर्वरित जगाशी फारशी जोडलेला नसला तरी चीनचा शेजारी असल्यामुळे या देशाला खरंतर ‘कोविड’चा सर्वाधिक धोका होताच. पण, त्यावेळीही आम्ही काटेकोर काळजी घेत असल्यामुळे कोरोना उ. कोरियात आला नाही, असाच दावा या हुकूमशाही देशाने कायम ठेवला. एवढेच नाही, तर जागतिक आरोग्य संघटना आणि चीनकडून ‘कोविड’संबंधी लसीपासून ते औषधांपर्यंत कुठलीही मदत स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.
 
 
पण, आज याच उत्तर कोरियामधील परिस्थिती भयावह असून या हुकूमशाहच्या पायाखालची जमीनही सरकली आहे. कारण, आधीच अविकसित आणि गरीब असलेल्या या देशात वैद्यकीय सुविधांची मोठी वानवा. त्यातच या तापाशी, कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ना औषधं आणि ना वैद्यकीय कर्मचार्‍यांना कोणते प्रशिक्षण. एकूणच देशातील ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून किमने लष्कराला पाचारण केले. गेल्या दोन-तीन वर्षांत कधीही मास्क परिधान न केलेला हा हुकूमशहा चक्क रस्त्यावर मास्क घालून औषधांची दुकाने तुडवू लागला.
 
 
पण, आपल्याच देशातील औषधांचा तुटवडा आणि दयनीय अवस्था बघून याचे खापर या हुकूमशहाने प्रशासकीय यंत्रणेवरच फोडले. प्रशासकीय यंत्रणेला या संकटाचे गांभीर्यच लक्षात आलेले नाही, असा टोलाही किमने लगावला. पण, उत्तर कोरियातील ही स्थिती प्रशासकीय कारभारामुळे नाही, तर किमच्या आजवरच्या कुचकामी, स्वार्थी धोरणांचाच परिपाक म्हणावी लागेल. कारण, या देशाच्या स्थापनेपासूनच किम आणि त्याच्या बापजाद्यांनी देशातील जनतेला गरीबच ठेवण्यात धन्यता मानली. त्यांच्या हाती धनशक्ती आली, स्वातंत्र्याचे पंख मिळाले, तर आपली एकहाती राजवट, कुलाभिमान क्षणार्धात मातीमोल होईल म्हणून किम घराण्याने उत्तर कोरियाला मागास ठेवले. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात तिथे सामान्य व्यक्ती ना इंटरनेट वापरू शकते आणि देशाबाहेर पलायन करणे हा तर देशद्रोहच!
 
असो. तर अशा या आधीच हलाखीचे जीवन जगणार्‍या देशातील नागरिकांना आता कोरोना महामारीने जोरदार तडाखा दिला आहे. आजवर 50 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी खरा आकडा त्याहीपेक्षा अधिक असू शकतो. याची शीर्ष जबाबदारीसुद्धा किम जोंग उनचीच! कारण, याच किम जोंग उनने आम्ही चीनकडून कोरोना व्यवस्थापन शिकू म्हणून मोठ्या बढाया मारल्या होत्या. पण, आज जेव्हा प्रत्यक्ष कोरोनाने उत्तर कोरियाचे प्रवेशद्वारे ओलांडले, तेव्हा मात्र किम जोंग उनची बोबडी वळली. त्यामुळे राजेशाही थाटात ‘आम्ही करुन दाखवू’ म्हणणे सोपे असले, तरी प्रत्यक्ष वेळ आली की, खरचं कृती करणे मात्र मुश्कील. तशीच आजची उत्तर कोरियाची गत!
 
 
अशा या उत्तर कोरियाला स्वबळावर या महामारीचा सामना करणे, हे कदापि शक्य नाही. त्यामुळे किम आता नेमके काय करणार, ते पाहावे लागेल. संयुक्त राष्ट्रांबरोबरच चीन, दक्षिण कोरियाकडून किम मदत मागू शकतात. पण, या महामारीच्या काळ्या छायेतही किम जोंग उनने आपल्या अण्वस्त्रांच्या हालचालींना मात्र आवर घातलेला नाही. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी सामना करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी दुसरीकडे अण्वस्त्र स्पर्धांची खुमखुमी कायम ठेवण्याचे उद्योगही किम करू शकतो. तेव्हा, उ. कोरियात आगामी काळात काय घडते, त्याकडे लक्ष ठेवावेच लागेल.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0