आसाममध्ये पुराचा कहर

17 May 2022 16:02:40

Flood
गुवाहाटी (वृत्तसंस्था): आसाममधील २० जिल्हे पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहिती नुसार २० जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख लोकांना याचा फटका बसला आहे. चाचरमध्ये आलेल्या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिमा हासाओमध्ये भूस्खलनात दबून तिघांचा मृत्यू झाला आहे.
बजाली, बक्सा, बिस्वनाथ, चाचर, चरईदेव, दररंग, धेमाजी, दिब्रुगढ, दिमा हसाओ, होजाई, कामरूप, कार्बी आंगलाँग पश्चिम, कोकराझार, लखीमपूर, माजुली, नागाव, नलबारी, सोनितपूर, तामुलपूर आणि उदलगुरी हे २० जिल्हे पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. या पुरामुळे ६५२ गावांमधील सुमारे १,९७,२४८ लोक प्रभावित झाले आहेत. या भागांमध्ये अनेक रस्ते, पूल आणि घरे नष्ट झाली आहेत.
या प्रभावित जिल्ह्यांमध्ये ६७ मदत आणि पुनर्वसन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तर, काही ठिकाणी जीवनावश्यक साहित्य वितरण केंद्र तैनात करण्यात आली आहेत. 'नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स' (एनडीआरएफ), 'स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स'(एसडीआरएफ) आणि अग्निशमन दल यांना पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
आसाममधील हाहाकार माजवणाऱ्या पुराचे कारण ब्रह्मपुत्रा नदी आहे. ही नदी भारतातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्याला दोन भागांमध्ये विभागते. दोन वर्षांपूर्वी सुद्धा असाच पूर आला होता. तेव्हा ही शेकडो लोक विस्थापित झाले होते.
Powered By Sangraha 9.0