लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट स्टडीज् चेअर’ची स्थापना

    दिनांक  17-May-2022 13:55:19
|
 
 
 
 
modi
 
 
 
 
 
लुंबिनी : नेपाळच्या दौर्‍यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट स्टडीज् चेअर’ची स्थापन करण्यासाठी भारत सरकार सहकार्य करेल, अशी घोषणा केली आहे. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेत पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली. ‘डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट स्टडीज् चेअर’च्या स्थापनेसह, भारत आणि नेपाळमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सहकार्याशी संबंधित सहा विषयांवरही करार झाले आणि दोन्ही पक्षांच्यावतीने सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. यासंदर्भात माहिती देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ”पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि लुंबिनी बौद्ध विद्यापीठ यांच्यात डॉ. आंबेडकरांच्या स्थापनेसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.”
 
यासह, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि त्रिभुवन विद्यापीठ यांच्यात ‘आयसीसीआर चेअर ऑफ इंडियन स्टडीज्’ स्थापन करण्यासाठी, ‘आयसीसीआर’ आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यात भारतीय अभ्यासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
 
याशिवाय, ‘आयआयटी’ मद्रास आणि काठमांडू विद्यापीठ यांच्यातील संयुक्त पदवी कार्यक्रमासाठी सामंजस्य करारदेखील मंजूर करण्यात आला. याशिवाय इतर अनेक योजनांवर सहकार्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यात एक करार झाला.
 
दोन्ही देशांमधील या करारांपूर्वी पंतप्रधान मोदी भगवान बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनी येथे पोहोचले. तिथे नेपाळ सरकारने त्यांचे भव्य स्वागत केले. लुंबिनीमध्ये पंतप्रधान मोदींनी भगवान बुद्धाचे दर्शन घेतले आणि मायादेवी मंदिरात पूजाही केली. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज भगवान बुद्धांचे जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला भेट देण्याचे सौभाग्य मला मिळाले. ज्या ठिकाणी देवाने जन्म घेतला आहे तेथील ऊर्जा वेगळीच अनुभूती देते. पशुपतिनाथजी असो, जनकपूरधाम असो किंवा लुंबिनी असो, मी जेव्हाही नेपाळमध्ये येतो तेव्हा, हा देश मला आध्यात्मिक आशीर्वाद देतो. तसेच आज भारतात प्रभु श्रीराम मंदिराची निर्मिती होत असून त्याने नेपाळची जनताही आनंदित आहे,” असे मोदी म्हणाले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.