स्वातंत्र्यलढ्यातील मौल्यवान रत्न सुखदेव रामलाल थापर

14 May 2022 21:56:46
 
sukhdev
 
लाहोरच्या नॅशनल महाविद्यालयामध्ये शिक्षण आणि त्याच महाविद्यालयामध्ये तरुणांना इतिहासाचे अध्यापन करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यातून स्वातंत्र्यलढा तीव्र करण्यासाठी अपार मेहनत घेणे आणि साम्राज्यशाहीला हादरा देण्याचे काम करणे, या आणि अशा तळहातावर शीर घेऊन असंख्य क्रांतिकार्यातील जबाबदार्‍या पार पाडणार्‍या सुखदेवच्या वाट्याला आलेले लौकिक आयुष्य फक्त 23 वर्ष, दहा महिने आणि आठ दिवस, या अल्पशा आयुष्यात अहोरात्र मातृभूमी मुक्तीचा ध्यास घेऊन जगणार्‍या व्यक्तिमत्त्वाला कितीदा वंदन करावे. दि. 15 मे हा त्यांचा जन्म दिवस त्यानिमित्ताने त्यांच्या त्याग, बलिदान, आत्मसमर्पण व देशभक्तीला शतशत नमन.
 
 
सोबतीला एखादं महान व्यक्तिमत्व असेल, तर त्या व्यक्तिमत्त्वाचा सहवास म्हणजे परीसस्पर्श असतो. त्या साथसंगतीमुळे जीवन उजळून निघते. जीवनाचे खर्‍या अर्थाने सोने होते, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. पण, काही वेळेस त्याच तोलामोलचे कार्य करूनही सहकारी मित्र तेवढ्या प्रमाणात लक्षात राहत नाही. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या त्रयीमध्ये सुद्धा हीच बाब प्रकर्षांने आपल्याला जाणवते. भगतसिंग जसे लक्षात राहतात, राजगुरू आणि सुखदेव तुलनेत भारतीयांच्या कमी प्रमाणात लक्षात राहतात. त्यामुळेच भगतसिंगाच्या साथीदारांचा त्याग समजून घेतला पाहिजे. त्यांचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.
 
 
सुखदेव थापर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान सशस्त्र क्रांतिकारक. त्याग, बलिदान व राष्ट्रभक्तीचा परमोच्च बिंदू. सुखदेवांना लाहोर खटल्यातील माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली होती. हंसराज होरा यांनी तसे प्रयत्न करून सुखदेव यांना या खटल्यातून निर्दोष वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, या वीराला हे कदापि मान्य होणार नव्हते. मातृभूमीसाठी सर्वस्व समर्पणाची वृत्ती ज्या देशभक्ताच्या रोमारोमात भिनलेली होती, तो महान सुपुत्र शेवटच्या क्षणी आपली चामडी वाचविण्याचा प्रयत्न कसा करणार? वकिलांचे युक्तिवाद, साक्षीदारांचे पुरावे आणि न्यायालयाचे निर्णय याच्या कितीतरी पलीकडे जाऊन जगण्याचा आणि मरणाचा विचार करणारे हे महान व्यक्तिमत्त्व होते.
 
 
लुधियानातील चौरा बाजार (नौघरा) हे या वीराचे जन्मगाव. राल्लीदेवी व रामलाल थापर यांचे हे अपत्य. दि. 15 मे, 1907 हा क्रांतिवीर सुखदेव यांचा जन्मदिवस. सुखदेवनी पंजाबमध्ये क्रांतिकारी संघटना उभी करून थेट आव्हान दिले किंग जॉर्ज यांनाच. किंग जॉर्ज हे त्यावेळी ब्रिटनचे राजा होते. त्यांच्या विरोधात पंजाबमध्ये गुप्त मसलती सुरू झाल्या. सुखदेव या गगनाला गवसणी घालणार्‍या कार्यात आघाडीवर होते. ब्रिटिश सरकारच्या ही बाब लक्षात आली. तेव्हा त्यांना धमकावण्यात आले, पण घाबरून पळ काढेल तो क्रांतिकारी आत्मा असूच शकत नाही. त्यानंतर ब्रिटिश सरकार विरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली. सुखदेवनी ल्यालपूर येथे 1926 पासून तरुणांच्या संघटनास सुरुवात केली. ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’च्या साहित्याचा प्रचार-प्रसारास सुरुवात केली. त्यावेळी या क्रांतिकारी साहित्याची निर्मिती, त्याचा प्रचार-प्रसार या सर्वच बाबी अत्यंत जोखमीच्या होत्या. या वीराने त्या बिकट परिस्थितीत हे शिवधनुष्य खांद्यावर घेतले व ते समर्थपणे पेलले.
 
 
1928 मध्ये गुप्त क्रांतिकारकांची बैठक घेऊन संघटनेचे नामकरण ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ असे करण्यात आले. या संघटनेचे स्वरूप देशव्यापी होते. केंद्रीय समितीत पंजाबतर्फे सुखदेव व भगतसिंग होते. चंद्रशेखर आझाद, कुंदनलाल या महान क्रांतिकारकांचा समावेश या संघटनात करून संघटन बलशाली बनविण्यात आले. संघटनाला एक विशिष्ट सैद्धांतिक विचारधारा होती. ब्रिटिशाविरुद्ध लढताना आपण बॉम्बविद्या हस्तगत केली पाहिजे, यावर सर्वजण ठाम होते. संघटनेच्या नियोजनानुसार, बॉम्ब बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. बॉम्बची चाचणी झाशीला झाली. झाशीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊनच पहिला धमाका तिथे करावयाचा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. लाहोरच्या नॅशनल महाविद्यालयामध्ये शिकत असताना तेथील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास व रशियन राज्यक्रांतीचा चिकित्सक अभ्यास केला. रशियन राज्यक्रांतीने भगतसिंग व सुखदेव भारावून गेले होते.
 
 
जागतिक पातळीवरील क्रांतिकारी साहित्याचे विविधांगी दृष्टिकोन सुखदेव यांनी अभ्यासले. क्रांतिकार्यात उडी घेताना किती विचारपूर्वक आणि पूर्वतयारीने त्यांची वाटचाल सुरू होती, याची कल्पना यावरून येते.कॉम्रेड रामचंद्र, भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने लाहोर येथे नौजवान भारत सभा ही संघटना त्यांनी स्थापन केली. या संघटनेचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यलढ्याकरिता तरुणांना प्रोत्साहित करणे हा होता. ब्रिटिशाविरोधात लढा देताना तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून अविरतपणे संघर्ष सुरू ठेवणे सर्वांना महत्त्वाचे वाटत होते. जातीयता भारतीय स्वातंत्र्यलढ्याला लागलेला कलंक आहे आणि अस्पृश्यता तर मानवतेला असलेला शाप आहे. या अनिष्ठ बाबींविरोधात ठामपणे उभे राहिले पाहिजे.हा दृढ निश्चय केल्यावर त्यांना राजकीय क्रांतीसोबतच सामाजिक क्रांती खूप महत्त्वाची वाटत होती, हे लक्षात येते. त्यांच्या कार्याची दिशा मानवतेच्या विचाराकडे वाटचाल करणारी होती, हेही सिद्ध होते.
 
 
लाला लजपतराय यांना पोलिसांकडून झालेली अमानुष मारहाण आणि त्यात त्यांचा झालेला अंत त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी स्कॉट आणि सँडर्स यांच्या हत्येच्या कटात सुखदेव यांचा सहभाग असल्यामुळे भगतसिंग राजगुरू यांच्या सोबत लाहोरच्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले. 1929 मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणार्‍या अमानुष वागणुकीच्या विरोधात केलेले उपोषण हे क्रांतिकारकाविषयी असलेल्या प्रेमाचे ज्वलंत उदाहरण होतेच. त्याशिवाय ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या अमानवी वर्तणुकीला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर होते.
 
 
पक्षपाती आणि वसाहतवादाचे समर्थन करणार्‍या न्यायाधीशाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची तारीख दि. 24 मार्च, 1931 ठरविण्यात आली. पण, प्रचंड जनक्षोभ लक्षात घेऊन अगोदरच्या रात्री दि. 23 मार्चला गोर्‍या माकडांनी या वीरपुत्रांना फासावर लटकविले. फासावर जाण्याअगोदर काहीच वेळेपूर्वी सुखदेव यांनी गांधीजींना पत्र लिहून क्रांतिकारकाविषयी सरकारच्या पक्षपाती धोरणाचा निषेध करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख दोन विचारधारांवर प्रकाश टाकला. दोन्ही विचारधारा तेवढ्याच महत्त्वाच्या कशा आहेत, हे अतिशय समर्थपणे पटवून दिले. या त्रयींना वाचविण्यासाठी गांधीजींकडून एकदा प्रयत्न झालाही, पण त्यांना यश मात्र मिळाले नाही.
 
 
लाहोरच्या नॅशनल महाविद्यालयामध्ये शिक्षण आणि त्याच महाविद्यालयामध्ये तरुणांना इतिहासाचे अध्यापन करून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यातून स्वातंत्र्यलढा तीव्र करण्यासाठी अपार मेहनत घेणे आणि साम्राज्यशाहीला हादरा देण्याचे काम करणे, या आणि अशा तळहातावर शीर घेऊन असंख्य क्रांतिकार्यातील जबाबदार्‍या पार पाडणार्‍या सुखदेवच्या वाट्याला आलेले लौकिक आयुष्य फक्त 23 वर्ष, दहा महिने आणि आठ दिवस, या अल्पशा आयुष्यात अहोरात्र मातृभूमी मुक्तीचा ध्यास घेऊन जगणार्‍या व्यक्तिमत्त्वाला कितीदा वंदन करावे. दि. 15 मे हा त्यांचा जन्म दिवस त्यानिमित्ताने त्यांच्या त्याग, बलिदान, आत्मसमर्पण व देशभक्तीला शतशत नमन.
 
 
युवाशक्तीला त्यांनी दिलेला देशभक्तीचा संस्कार खूप मोलाचा आहे. अल्पवयात पितृछत्र हरवले तरी मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ कार्य करण्यासाठीच त्यांनी आपल्या बुद्धी आणि शक्तीचा उपयोग केला. भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, भगवतीचरण व्होरा अशा कित्येक महान क्रांतिकारकांच्या सहवासात राहून आपल्या जीवनाचेसोने करून घेतले. भारतीयांना स्वातंत्र्यसूर्य दाखविला. आपल्या अल्पशा आयुष्यातून युवा पिढीला त्यांनी दिलेला देशभक्तीचा संस्कार खूप मोलाचा आहे.
- प्रा. वसंत गिरी 
 
Powered By Sangraha 9.0