आरोग्य सेवाव्रती डॉ. वैभव देवगिरकर

14 May 2022 12:01:32
news



डॉ. वैभव देवगिरकर म्हणजे आरोग्य क्षेत्रातील सेवाव्रती. सेवाक्षेत्रातील त्यांची कार्यझेप उत्तुंग आहे. मात्र, या देशाच्या मातीशी त्यांचे नाते पक्के आहे. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा...



जो पर्यंत सरणावर जात नाही, या देशाच्या मातीत देह मिसळत नाही, तोपर्यंत माझा देह देश आणि समाजासाठी कार्यरत राहणार,” डॉ. वैभव देवगिरकर म्हणतात.ते ‘हिंदू सभा हॉस्पिटल’चे आणि ‘आरोग्यम् कन्सेप्ट’चे मेडिकल डायरेक्टर आहेत. ‘देव देश प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘बीएमएमए’चे शिक्षण घेतले.


तसेच, ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन हॉस्पिटल अ‍ॅडमिनीस्ट्रेशन’, ‘वार्फ’, ‘एचआयव्ही एड्स अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग’, पत्रकारितेतले पदव्युत्तर शिक्षण, मानवी हक्क विषयातले पदव्युत्तर शिक्षण, ‘आरोग्य प्रमोशन’ विषयात पदव्युत्तर शिक्षण, ‘अ‍ॅडव्हान्स एचआयव्ही कौन्सिलिंग स्किल’, मेडिको लिगल कन्सल्टंट ट्रेनर अ‍ॅण्ड कन्सल्टंट, पदव्युत्तर शिक्षण हॉस्पिटल अ‍ॅडमिनीस्टे्रशन, ‘इंटरनल ऑडिटर’, ‘सीपीक्युआयएच’, ‘मास्टर इन लिडरशिप सायन्स’, ‘फायनान्स फॉर नॉन फायनान्स एक्झिक्युटिव्ह,‘ अशा १५ विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.


वैद्यकीय पेशात अनेक आव्हानं असतात. त्यापैकी एक म्हणजे गरजू आणि गरीब रुग्णांना उपचाराचा खर्च परवडतोच, असे नाही. बरं औषधांची किंमतही काही कमी नसते. २२ वर्षे वैद्यकीय सेवा क्षेत्रात असताना डॉ. वैभव यांनी हे कटू सत्य अनुभवले होते. त्यामुळेच त्यांनी गरजू रुग्णांना स्वस्त दरात औषध उपलब्ध करून देण्यासाठी घाटकोपरमध्ये ‘जेनरिक मेडिकल’ ही सुरू केले. गरीब रुग्णांना आजारासंदर्भात समुपदेशन करणे, सेवावस्त्यांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, आजारांबाबत जागृती करणे, सरकारच्या रुग्ण आणि उपचारासंदर्भात विविध योजना गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणे, असे सेवाकार्य डॉ. वैभव करतात.



‘देव देश प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सर्वच स्तरावरची मदत रुग्णांना केली जाते. सर्वसाधारण आपण म्हणतोकी, डॉक्टर जीव वाचवतो म्हणून तो देवाचे रूप असतो. पण, वैभव यांना आजारांनी गांजलेल्या रुग्णांमध्ये देव दिसतो. या रुग्णांच्या उपचारासाठी मानवी श्रद्धेने आणि वैद्यकीय नीतिमूल्यांच्या साथीने कार्य करणारी देशभक्त समाजनिष्ठ डॉक्टरांचे संघटन करण्याचे कार्यही करतात. आज महाराष्ट्रातील विविध समाजाचे मान्यवर ते अगदी गल्लीबोळातील तरुणाईही डॉ. वैभव यांच्यासोबत जोडली गेली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आजवर त्यांना राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.



‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांना १६ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. वैभव म्हणतात की, “लढून मरायचं की पळून मरायचं, कोरोना काळात इतकचंहातात होते. त्यावेळी आमच्या ‘हिंदू सभा रुग्णालया’चे मगनभाई दोशी यांनी निर्धार केला की, कोरोनाशी युद्ध पातळीवर लढा द्यायचा आणि मानवतेला माणसालाजिंकवायचे. ‘हिंदू सभा हॉस्पिटल’च्या माध्यमातून आम्ही आरोग्यसेवेचा यज्ञकुंड पेटवला. त्या यज्ञकुंडाच्या माध्यमातून जवळ जवळ पाच हजार पेक्षाही जास्त कोरोना रुग्णांना बरं करू शकलो.



डॉ. वैभव देवगिरकर या सेवाव्रतीच्या आयुष्याची प्रेरणा काय असवाी? देवगिरकर कुटुंब मूळचे हिंगणघाटचे. रमेश देवगिरकर यांचे दागिना व्रिकीचे छोटे दुकान. त्यांच्या पत्नी रत्नाबाई या गृहिणी. या दाम्पत्याचे सुपुत्र वैभव देवगिरकरांच्या दारातून कुणीहीकधीही विन्मुख होऊन परत गेले नाही. एकदा तर रात्री 2 वाजता एका व्यक्तीने दरवाजा ठोठावला. त्याच्या घरी कुणाचे तरी निधन झाले होते. अत्यंसंस्कांरासाठीही पैसे नव्हते. रमेश यांनी त्याचे सांत्वन केले. तेवढ्या रात्री सगळी मदतही केली. ती व्यक्ती रमेश यांची नातेवाईक नव्हती.



पण, माणसाने दुसर्‍यांच्या गरजेला उपयोगी पडायलाच हवे, हे रमेश यांचे जीवनसूत्र, अशा संस्कारात वैभव वाढलेले. त्यातच वैभव हे लहानपणापासून रा.स्व.संघाच्या शाखेत जाऊ लागले. मात्र, एका घटनेने वैभव यांचे जीवन बदलले. तब्येत ठीक नाही म्हणून रमेश यांना रुग्णालयात भरती केले गेले. त्यावेळी अचानक रमेश वैभव यांना म्हणाले, “बापू, तू डॉक्टर बन. बनशील ना?” त्यानंतर दोन दिवसांनी रमेश यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. होत्याचे नव्हते झाले. रत्नाबाईंनी कष्टाचे डोंगर उपसले. घर दुकान आणि शेतीभातीही सांभाळू लागल्या. पण, आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागला.




त्यामुळे वैभव यांनी शिक्षण सोडले आणि ते आईला कामात मदत करू लागले. डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्णतः विस्कटले. वर्ष गेले आणि वैभव यांची आत्या शोभा यांनी रत्नाबाईंना सांगितले, “रमेशदादांची शेवटची इच्छा होती की, वैभवने डॉक्टर बनावे. तू त्याला माझ्याकडे पाठव. त्याला शिकवूया.” वैभव शिकण्यासाठी नागपूरला गेले. तिथे आत्याचा मुलगा राजूदादा यांनी खूपच सहकार्य केले. वैभवही नेहमी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत राहिले. पुढे पुसद येथे ‘बीएएमएस‘चे शिक्षण घेताना त्यांचा संपर्क रा.स्व.संघाचे प्रचारक राम वैद्य यांच्याशी झाला.


डॉ. पंकज जैस्वाल (सध्या पुसदचे संघचालक)सारखे मित्र लाभले. त्यामुळे वैभव यांची दिशा पक्की होत गेली. तो दिवस आणि आज २५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली. डॉ. वैभव आरोग्यक्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. वैभव म्हणतात, “स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी मला प्रेरणा मिळते. जेव्हा उपचारांनंतर आजारातून बर्‍या झालेल्या रुग्णाच्या चेहर्‍यावरचे जीवनदायी हास्य पाहतो, तेव्हा मला प्रेरणा मिळते. माझी इच्छा आहे, आयुष्यभर मला आरोग्यसेवा करायची आहे.” असे हे सेवाव्रती डॉ. वैभव देवगिरकर!





Powered By Sangraha 9.0