बुद्ध आणि त्याच्या धम्मासाठी....

14 May 2022 21:12:26

buddhism 
 
इस्लाम आणि बुद्ध धर्माचा र्‍हास यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे आहेत. बौद्ध धर्माच्या संवर्धनासाठी आणि वस्तीपातळीवरील समाजबांधवांच्या दैनंदिन जीवनशैलीसाठी हे विचार जाणून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेबांच्या विचारानुसार सध्या बौद्ध धर्माच्या संवर्धन आणि सुरक्षिततेसंदर्भात काय सुरू आहे? उद्या बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने या विषयावर अनुभवलेले मांडण्याचा इथे प्रयत्न केला आहे.
 
 
‘बुद्धम् शरणम् गच्छामी...’ सम्यक ज्ञान आणि सम्यक दृष्टीचे संस्कार असणार्‍या बौद्ध धर्माबद्दल बाबासाहेबांचे विचार किती स्पष्ट आणि आत्मिय होते, हे तसे सर्वश्रूत आणि सर्वज्ञात. नवी दिल्ली येथे दि. 23 ऑक्टेाबर, 1956 रोजी ‘बौद्ध धर्माचा र्‍हास का झाला?’ या विषयावर चिंतनशील विचार प्रगट करताना बाबासाहेब म्हणाले की, ”मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.” मात्र, दुर्दैवाने त्यानंतर काहीच महिन्यांत बाबासाहेबांचे निधन झाले. बाबासाहेबांच्या वैचारिक आणि सामाजिक साहित्यकृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरच आधारितआहेत.त्यामुळे मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाचा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असणार, हे नक्की!
 
 
जगभरात घडणार्‍या घडामोडींचा मागोवा घेतला, तर जाणवते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला हा विषय आजही तितकाच चिंतनशील आहे. रोहिंग्या मुसलमान आणि म्यानमार असो की दहशतवादी आणि श्रीलंका असो, जगाने या घडामोडी पाहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय सुरू आहे? तर एक वेगळेच परिमाण सुरू आहे. निधर्मी आणि मानवतावादी आहोत, असे सांगणारी काही हाताच्या बोटावर मोजता येणारी लोकं आहेत. (त्यांचे निधर्मी मानवतावादीपण म्हणजे भारतीय संस्कृती आणि श्रद्धांना शिव्या देणे आणि समाजात फूट पाडणे होय!) हे लोक समाजात दुफळी माजवण्यासाठी बौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये विष कालवतात की, ”हिंदू (यांच्या मते मागासवर्गीय समाजातील आणि इतर मागासवर्गीय समाजातीलही हिंदू होत) हे तुमचे शत्रू आहेत. त्यांनी तुमच्यावर पिढ्यान्पिढ्या अत्याचार केलेत.
 
 
तुमच्यासारखेच मुस्लीम पण यांच्या अत्याचाराचे बळी आहेत.” मी कितीतरी उच्चशिक्षित व्यक्तींना या प्रवादाचा बळी होताना आणि ‘मुस्लीम -बौद्ध भाई भाई हिंदू कोम कहासे आई’ या सूत्रानुसार जगताना पाहिले आहे. अर्थात, मुस्लीम धर्मीयांना भाई मानणे मुळीच चूक नाही. मात्र, हे भाई केवळ हिंदू समाजाला विरोध म्हणून मानणे असल्यामुळे मात्र अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. दुर्दैव असे की, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही कमालीचे मतलबी लोक समाजामध्ये हा बुद्धिभेद पोसण्यासाठी कावाही करतात. याची काही उदाहरणंही आहेत. त्यापैकी दोन उदाहरणं. साल 2018 कोरेगाव-भीमा प्रकरण. यावेळी या प्रकरणाचे नाव घेत मुंबईतील एका उपनगरात रा. स्व. संघाच्या पदाधिकार्‍यावर मोठ्या जमावाने हल्ला केला. त्याची नवीकोरी अगदी कालपरवा घेतलेली गाडीही फोेडण्यात आली. हल्ला करणारे कोण होते? कुठून आले होते? तर त्याच परिसरातले बौद्ध बांधव नव्हतेच, अपवादाने एक दोन असतीलही; पण त्या व्यक्तींचा वैयक्तिक आकस होता. मात्र, लाल झेंडे आणि एखाद दोन हिरवे झेंडे घेतलेले आक्रमक लोक या जमावात होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे. थोडक्यात, कुणीतरी हिंदू आणि नवबौद्ध समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 
 
दुसरी एक घटना आहे 2021 सालची. महाड चिपळूणला पूर आला. प्रशासनाने, स्वयंसेवी संस्थांनी आणि लोकांनीही मदतीचा ओघ इथे वळवला. मात्र, चिपळूण जवळच्या एका गावात वेगळेच दृश्य होते. इथे दरड कोसळून बौद्धवाड्यातील कुटुंब उद्ध्वस्त झाली. पुनर्वसन होईपर्यंत या कुटुंबांनी मंदिर किंवा गावच्या समाजमंदिरात राहावे, असा प्रशासकीय निर्णय झाला. मात्र, या वस्तीतील वाचलेल्या कुटुंबांनी नकार देत ग्रामपचांयतीच्या कार्यालयात मोर्चा वळवला. कार्यालयातून बाहेर पडण्यास त्यांनी नकार दिला. इतकेच नव्हे, तर प्रशासनाने दिलेला मदतीचा धनादेशही त्यांनी नाकारला. हे सगळे प्रसारमाध्यमांत येत होते.
 
 
पण, खरे काय होते? तर तिथे आसरा घेतलेल्या आयाबाया अत्यंत दुःखात होत्या. आपल्याला या कठीण वेळेत सगळ्यांनी मदत केली, अगदी ब्राह्मण- मराठ्यांनीसुद्धा, असे त्या आवर्जून सांगत होत्या. पण, त्यांनी न सांगताही त्यांचे नेतृत्व करायला या कार्यालयात महाराष्ट्रभरातून विद्रोही, स्वतःला निधर्मी आणि पुरोगामी वगैरे समजणारी मंडळी गेली. देशात समाजात बौद्ध समाजाच्या कुटुंबाशी पूरमदतीमध्येही कसा भेदभाव होतो, अत्याचार होतो, यावर या लोकांनी प्रसारमाध्यमांमध्ये माहिती देणे, व्हिडिओ प्रसारित करणे सुरू केले. या सगळ्यांचे नेतृत्व करणार्‍या माणसाशी बोलले. ’आपण आंबेडकरी विचारांचे अनुयायी असून, मुंबईतून आपल्या समाजाला मदत करण्यासाठी इथे आलो’ असे तो सांगू लागला. आपले मोठे कार्य सांगताना तो म्हणाला, ”गावातल्या लोकांना शह देण्यासाठी मी चांगलीच युक्ती केली. बौद्धवाडीतल्या व्यक्तीने सरपंच बनवायचे असे ठरले. पण, बहुमताअभावी हे होणे शक्य नव्हते. मग काय झाले की, वाडीतल्या एका शिकलेल्या मुलीने मुसलमानाच्या पोराशी प्रेमविवाह केला. आम्ही तिला सरपंच म्हणून उभे केले.
 
 
गावातल्या मुसलमानांच्या आणि आमच्या वाडीच्या निर्णयाने ती सरपंच झाली. त्यामुळे गावातल्या आणि वाडीतल्या लोकांसाठी आम्ही आम्हाला जे वाटतात तेच निर्णय घेताना जरा पण कठीण जात नाही. तुम्ही बघता ना आज गावात वातावरण कसे केले ते?” हे सांगताना त्याच्या चेहर्‍यावर खुनशी आनंद मावत नव्हता. त्याचे म्हणणे खरेच होते. चिपळूणच्या त्या डोंगरकुशीतल्या गावात न जाणे किती हजार वर्षांपासून हिंदू आणि बौद्ध तसेच, इतरही लोक गुण्यागोविंदाने जगत होते. मात्र, आज याच गावात हिंदू आणि बौद्ध समाज यामध्ये वितुष्ट पसरवून ती गरळ प्रसारमाध्यमांत ओकण्यास काही लोकांना मदत मिळाली होती. तसेच, पूरमदतीमध्ये जातीभेद झाला नसतानाही हे सांगायला मुंबईतून तिकडे गेलेल्या लोकांसोबत गावातले मुस्लीम सोबतीला होते. (ही घटना लिहू शकते. कारण, मी या घटनेची प्रत्यक्षदर्शी आहे.) असो. त्या मुलीने मुस्लीमधर्मीय व्यक्तींवर स्वेच्छेने प्रेम केले आणि विवाह केला, याबद्दल आक्षेप नाही. कायद्याने ती स्वतंत्र आहे. मात्र, तिच्या विवाहाचा फायदा घेत गावात दुफळी माजवण्यात काही लोक जिंकण्याचा विकृत आनंद घेत होते वाईट होते.
 
 
याच पार्श्वभूमीवर 1992ची दंगलही आठवते. मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये एका वस्तीच्या रक्षणासाठी परिसरातील युवकांनी रात्रभर जागून पाहारा द्यायचे ठरवले. वस्तीतील सर्व धर्मीय त्यात हिंदू बौद्ध आणि मुस्लीमही तरुण सामील झाले. मात्र, एक युवक म्हणाला ”मी अजिबात पहारा देणार नाही. मुळात हिंदू-मुस्लीम दंगल आहे. बाजूच्या वस्तीतल्या लोकांना माहिती आहे, आम्ही बौद्ध धर्मीय आहोत. त्यामुळे मला कसलाच धोका नाही.” तो अतिशय बेफिकीर वागायचा. कुठेही संचार करायचा. अगदी बाजूच्या वस्तीतही. त्याला विश्वास होता की, आपण हिंदू नाही हे माहिती असल्यामुळे आपल्यावर कोणी हल्ला करणार नाही. मात्र, एकदा त्याच्यावरच बाजूच्या वस्तीतून हल्ला झाला. हल्ला करणारे हिंदू नव्हते. हल्ला करणारे म्हणत होते ‘मारो काफिर को.’ तो कसाबसा चाकूचा वार झेलत वस्तीत पळत आला. शुद्धीवर आल्यावर त्याला आणि त्याच्या समर्थकांना साक्षात्कार झाला. आपणही त्यांच्या नजरेत ‘काफिर’च आहोत. (ही सत्य घटना आहे.) या सगळ्या घटना आठवण्याचे कारण एकच की, बौद्ध धर्माला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा जरी मिळाला तरी सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेत हिंदू आणि बौद्ध हा भेद नाहीच. हे सत्य समाजापुढे येऊ नये, यासाठी मात्र काही चिंतातूर जंतू तीळतीळ जळत असतात.
 
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती’ या ग्रंथात काय लिहिले आहे, हे महत्त्वाचे आहे. बाबासाहेब लिहितात, ”मुसलमानांच्या आक्रमणामुळेच भारतात बौद्ध धर्माचा पाडाव झाला, यात काही शंका नाही. ‘बुत’चा शत्रू म्हणून इस्लाम पुढे आला.” हे सर्वांना माहितीच आहे की, ‘बुत’ हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ ‘मूर्ती’ असा होतो. परंतु, ‘बुत’ हा ‘बुद्ध’ या शब्दाचा अरबी भाषेतील अपभ्रंश आहे, हे बर्‍याच लोकांना माहिती नाही. ही व्युत्पत्ती असे सुचित करते की, मुस्लीम मनात मूर्तिपूजा म्हणजे बुद्धाचा धर्म हे समीकरण पक्के झाले. मुस्लिमांसाठी त्या दोन्ही बाबी (मूर्तिपूजा व बौद्ध धर्म) सारख्याच होत्या. त्यांच्यासाठी मूर्तीभंजनाचे धार्मिक कार्यच बौद्ध धर्माच्या विनाश करण्याचे कार्य ठरले. केवळ भारतातच नव्हे, तर जिथे जिथे इस्लाम पोहोचला, तिथे तिथे इस्लामने बौद्ध धर्माचा विनाश केला. यानंतर आपल्या विधानाला पुष्टी देण्यासाठी बाबासाहेब सांगतात की,”इस्लाम अस्तित्त्वात येण्यापूर्वी संपूर्ण आशियाप्रमाणे बॅक्ट्रिया, पर्शिया अफगाणिस्तान, गंधार व चिनी, तुर्कस्तान या प्रदेशात बौद्ध धर्म होता. या सर्व देशांत इस्लामने बौद्ध धर्माचा विनाश केला. भारतात बुद्धाच्या धर्मावर आलेली ही सर्वात भयानक आपत्ती होती.” अर्थात, बाबासाहेबांचे हे विचार वस्तीपातळीवर पोहोचले आहेत का? तर नाही!
 
 
मात्र, बाबासाहेबांनी हिंदू धर्म, हिंदू श्रद्धा याबद्दल काय म्हंटले किंवा म्हंटलेले नसेल तरी ते बाबासाहेबांच्या नावावर खपवून वस्त्यांमध्ये, समाजात द्वेष पसरवणारे लोक आहेत. हे एक मोठे षड्यंत्र आहे. हे षड्यंंत्र तथागत गौतम बुद्धांच्या दया, करूणामयी बौद्ध धम्माविरोधात आहे. हे षड्यंंत्र बाबासाहेबांच्या विचारांनी देश आणि समाजात एकनिष्ठ राहू इच्छिणार्‍या समाजाविरोधात आहे.
 
 
असो. जरा विषयांतर होईल, पण महत्त्वाचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये धार्मिक वास्तव सगळ्यांना माहिती आहेच. पण, लडाखच्या माध्यमातून बौद्ध समाज लक्षणीय जीवनशैलीचे प्रतीक म्हणून देशवासीयांसमोर आला. धर्माच्या नावावर अधर्म, हिंसा करणार्‍या अतिरेक्यांच्या दहशतवादी कारवायांना सामोरे जात आपले बुद्धत्व टिकवणार्‍या लडाखच्या बौद्धबांधवांचा संघर्ष माननण्यासारखा आहे. आपल्या धार्मिक आणि सामाजिक अस्तित्वासाठी इथला बौद्ध समाज अत्यंत संवेदनशील आहे. ‘यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन’ असू देत की, ‘लडाख बुद्धिस्ट असोसििएशन’ असू देत, इथला बौद्ध समाज संघटित आहे. इथले बौद्ध समाजाचे संघटन सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक स्तरावरही अत्यंत मनस्वी असेच म्हणावे लागेल.लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळावा, मुस्लीम सत्ताधारी बौद्ध समाजाच्या संधी डावलतात, असे संघटनेचे म्हणणे.
 
 
संघटनेला समाजाचा पाठिंबा होता. 1989 साली आंदोलनं झाली. मात्र, मुस्लीम समाजाने या संघटनेला आणि त्यांच्या मागणीला विरोध केला. त्यातून दोन समाजात छोट्यामोठ्या दंगलीही झाल्या. ते युग इंटरनेट-प्रसारमाध्यमांचे वगैरे नसल्याने याबाबत देशभरात वाच्यता झालीच नाही. मात्र, यानंतर लेहमधल्या बहुसंख्य बौद्ध समाजाने एक निर्णय घेतला. त्यांनी ठरवले की, बौद्ध किंवा तिथे अत्यल्प असलेल्या हिंदूंकडूनच कोणत्याही वस्तूची खरेदी-विक्री करायची. त्यामुळे तिथे असलेल्या मुस्लीम समुदायाची आर्थिक नाकेबंदी झाली. 1989 ते 1992 या काळात ती नाकेबंदी कायम होती. बौद्ध समाजाला आव्हान देणे महागात पडू शकते, हे इतरांना कळले. समाजाची ताकदही कळली. धर्मांतरण या विषयावरही इथला बौद्ध समाज जागृत आहे. त्यामुळेच समाजाच्या ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशन’ने इथल्या मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ‘लडाख मुस्लीम असोसिएशन’समोर सरळ धर्मांतर रोखण्याबाबत ठराव मांडला. त्यानुसार धर्मांतरित व्यक्तींना तिच्या मूळ समाजाच्या ताब्यात देण्याची जबाबदारी दुसर्‍या समाजाच्या असोसिएशनवर टाकण्यात आली होती. अर्थात, बौद्धबहुल लेहमध्ये हा करार बौद्धांनी पाळला. मात्र, मुस्लीमबहुल कारगीलमध्ये हा करार मुस्लिमांनी पाळला नाही.
 
 
1992 साल तर विशेष महत्त्वाचे. आपल्या समाजातील 24 युवतींना फसवून आणि दडपशाहीने मुस्लीम व्यक्तींंशी विवाह करण्यास भाग पाडले म्हणून इथल्या बौद्ध समाजाने आंदोलन केले आणि न्यायही मिळवला. आता तर काय जामग्याल सेरिंग नामग्याल हे लडाखचे खासदार आहे. खासदार म्हणून जिंकल्यानंतर ‘370’ कलमाविरोधातील लोकसभेतील त्यांचे भाषण कोण विसरू शकेल? हा प्रबुद्ध युवा नेता बौद्ध धर्माचा खरा वारसा सांगतो. त्याची राष्ट्रनिष्ठा आणि समाजनिष्ठा हे खरे बुद्धाचे सम्यक तत्वज्ञान आणि सम्यक दृष्टी आहे.
 
 
तर पुन्हा मुद्द्याकडे वळू की, लडाखमध्ये बौद्ध धर्मीयांची ताकद आणि नेतृत्व निर्माण झाले. मात्र, महाराष्ट्रात काय? समाजात प्रशासकीय अधिकारी निर्माण झाले. विचारवंत आणि साहित्यिकही निर्माण झाले. पण, तरीही समाजाचे संघटन तितके देदीप्यमानपणे उभे का राहिले नाही? कारण एकच; समाजाला संघटित करण्यासाठी असणारे धार्मिक आणि सामाजिक नेतृत्व ताकदीचे नाही. खरा ऊर्जावान बौद्ध धर्म वस्तीपातळीवर पोहोचण्याआधीच त्याला हिंदुत्वविरोधी विषैल मुलामा देणारे, परिवर्तन म्हणजे केवळ देवदेवतांना शिव्याशाप हे सांगणारे लोक वस्त्यांमध्ये धम्ममार्तंडांचे मुखवटे घालून फिरत आहेत.
तथागत गौतम बुद्धांनी द्वेष, मत्सर करू नका सांगितले. निंदा टाळा सांगितले. जीवनाचा अष्टांग मार्ग सांगितला. त्यांचे विचार खरंच समाज जगतो का? त्यांचे विचार हे समस्त मानवजातीला प्रेरणादायी आणि अनुकूल आहेत. हे विचार सगळ्या समाजाने स्वीकारले, तर सगळ्यांचेच कल्याण आहे. तथागतांनी सांगितले की, स्वतः अनुभवल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवू नका. तथागतांच्या विचारांनुसार, ‘भवतू सब्ब मंगलम’ हा सद्विचार मनात आणि कृतीत जागवत ‘अत्त दीप भव’ होणे गरजेचे आहे, तरच तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा खरा मानवी मूल्यांचा विकास आणि धर्म जगू शकेल, तरच खर्‍या अर्थाने म्हणू शकतो, ‘बुद्धं शरणं गच्छामि!!!’
 
 
Powered By Sangraha 9.0