राहुल भट यांच्या हत्येविरोधात काश्मिरी हिंदूंचा आक्रोश

14 May 2022 12:57:23
rahul bhat
 
 
 
 
 
 
नवी दिल्ली : मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात इस्लामी दहशतवाद्यांचे बळी ठरलेले काश्मिरी हिंदू राहुल भट यांच्या पार्थिवावर जम्मूमध्ये शुक्रवारी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित लोकांमध्ये एकाचवेळी दु:ख आणि रोष असल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थितांनी ‘भारतमाता की जय’, ‘राहुल भट अमर रहे’ आणि ‘राहुल यांच्या मारेकर्‍यास फाशी द्या’ घोषणाही दिल्या. या हत्येची जबाबदारी ‘काश्मीर टायगर्स’ या संघटनेने घेतली असून त्यामागे ‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे.
 
 
 
बडगाम जिल्ह्यातील तहसील कार्यालयात कार्यरत राहुल भट यांची दहशतवाद्यांनी गुरुवार, दि. १२ मे रोजी संध्याकाळी निर्घृणपणे हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, भट यांच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. राहुल भट्ट यांचे पार्थिव गुरुवारी उशिरा जम्मूतील दुर्गानगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार, उपायुक्त अवनी लवासा आणि ‘एडीजीपी’ मुकेश सिंग, अनेक राजकीय आणि गैर-राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होते.
 
 
 
भट यांच्या हत्येविरोधात काश्मिरी पंडित समुदायाने जोरदार आंदोलन केले. यावेळी संतप्त नागरिकांनी श्रीनगर-जम्मू महामार्गही काही काळ रोखून धरला होता. दुसर्‍या दिवशीदेखील संतप्त हिंदूंचा रोष कायम होता. या हत्येमुळे काश्मिरी हिंदू समुदायामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीर खोर्‍यात सरकारी नोकरी करीत असलेल्या पंडित समुदायातील कर्मचार्‍यांनी त्यांची जम्मूमध्ये बदली न केल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील बांदिपोरा येथे शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अतिरेक्यांसोबत पोलिसांच्या चकमकीस प्रारंभ झाला. यावेळी दोन्ही अतिरेक्यांना ठार करण्यात यश आले आहे. हे दोन्ही अतिरेकी गुरुवारी चदूरा येथे झालेल्या हत्येच्यावेळी ते तेथे उपस्थित होते, अशी माहिती पोलीस अधीक्षक इफ्तिकार तालिब यांनी दिली आहे.
 
 
 
हत्येच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना
 
जम्मू आणि काश्मीर सरकारने राहुल भट यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे राहुल भट यांच्या पत्नीस सरकारी नोकरी आणि कुटुंबास आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणा नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली आहे.
  
 
 
जम्मू-काश्मीर परिसीमनास सर्वोच्च न्यायालयात आव्हान
 
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशामधील विधानसभा मतदारसंघांच्या परिसीमनाच्या अधिसूचनेला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला असून सहा आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
 
पाकिस्तानला किंमत चुकवावी लागेल
 
भ्याड पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा रक्तपात घडवला आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट काश्मीरमधील पुलवामा येथे तहसीलदार कार्यालयात कार्यरत होते. भ्याड दहशतवाद्यांनी त्यांची निर्दयीपणे हत्या करून अक्षम्य गुन्हा केला आहे. या जघन्य अपराधाची भ्याड पाकिस्तानी लोकांना मोठी किंमत चुकवावी लागेल.
-रवींदर रैना, प्रदेशाध्यक्ष, जम्मू-काश्मीर भाजप
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0