थायलंडकडून शिकण्यासारखे...

13 May 2022 10:39:37
 
 
 

thailand buddhism 
 
 
 
 
 
 
जही थायलंडचा राष्ट्रीय धर्म आहे बौद्ध धर्म. सध्या थायलंडमध्ये धार्मिक स्तरावर प्रचंड वादचर्चा सुरू आहे. कारण, एका बौद्ध भिक्खूच्या भिक्षापात्रात कुणी तरी कंडोमची पाकिटं टाकली. याबद्दल जनतेत आक्रोश आहे. धार्मिक लोकांचे म्हणणे आहे की, थायलंडमध्ये बौद्ध भिक्खूंसंदर्भात अनेक उलटसुलट बातम्या प्रकाशित होत आहेत. त्यामुळे भिक्खूंची प्रतीमा मलीन होतेे. थायलंडमध्ये लाखो भिक्खू धार्मिक कडक नियमावलींचे पालन करत समाजात धर्म जागता ठेवत आहेत. मात्र, त्यांच्याबाबत काहीच न प्रकाशित करता कुठच्या तरी गावखेड्यात कुणीतरी एकाने गैरवर्तन केले, तर त्याला अतोनात प्रसिद्धी दिली जाते. त्यामुळे थायलंडच्या जनतेमध्ये बौद्ध धर्माची आस्था कमी होते.
 
 
 
 
पूर्वी प्रत्येक पुरूष एक दिवस तरी का होईना, बौद्ध भिक्खू म्हणून जगण्याची पारंपरिक रित पाळायचा. पण, आता भिक्खू म्हणून दीक्षा घेणार्‍यांची संख्याही कमी होत आहे. यावर काही समाजअभ्यासकांनी मत मांडले की, भिक्खूंचा आणि बौद्ध धर्माचा देशाला अभिमान आहे. मात्र, काही वर्षांपासून अशा काही घटना घडल्या की, लोकांच्या मनात धर्मसंकल्पनेबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यामध्ये भिक्खू असतानाही धर्माचे नियम डावलून भ्रष्टाचार करून धनसंग्रह केला म्हणून झालेली अटक किंवा आपल्याला अंतर्ज्ञानाने लॉटरी लागण्यासाठी विजयी संख्या सांगतो, असे सांगून लोकांना फसवणार्‍याला अटक, महिलांची अंतर्वस्त्र चोरणार्‍याला अटक, पवित्र पोषाखात ड्रग्जचा साठा बाळगणार्‍याला अटक... एक नाही तर काही वर्षांपासून अशा एक ना अनेक घटना घडत गेल्या. भिक्ूखंच्या या धर्मबाह्य कृत्यांमुळे थायलंडच्या जनतेमध्ये रोष उत्पन्न झाला. त्यामुळेच थायलंडमध्ये भिक्खूंच्या भिक्षापात्रात कंडोम टाकण्याचा अधर्मी पापीपणा घडला.
 
 
 
 
दोन्ही गटांचे म्हणणे त्यांच्या त्यांच्यापरीने योग्यच आहे. पण, काहीही असो धर्माचे, कर्तव्य-नियमांचे पालन करणार्‍या भिक्खूंसोबत गैरवर्तन करणे योग्य नाही. थायलंडमध्ये भिक्खूंच्या जगण्याची नियमावली अत्यंत कठोर असते. भिक्खू होणार्‍या व्यक्तीला डोके, चेहरा मग त्यात भूवयाही आल्या, यावरील केस त्यागावे लागतात. कुठच्याही मदमोहापासून त्याला विरक्ती घ्यावी लागते. मदिरापान आणि स्त्रीस्पर्श तर वर्ज्यच आहे. पण, हौस म्हणून पाण्यात पोहणेही नियमबाह्य आहे. मोठ्याने हसणे आणि बोलणेही वर्ज्यच. भिक्खूंना ३६५ दिवस त्यांचा विशिष्ट पेाषाखच परिधान करावा लागतो. सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत ते दोन वेळाच अन्नग्रहण करू शकतात. त्यानंतर ते अन्नग्रहण करू शकत नाहीत. थायलंडच्या संस्कृतीनुसार लोक भिक्खूंना अन्नदान करतात. भिक्खूंना त्यांच्या पात्रात जे येईल ते घ्यावेच लागते. आवडनिवड नाही. भिक्षापात्रात मिळालेल्या शिजवलेल्या अन्नाचे वर्गीकरण न करता ते एकत्रित करून ग्रहण करायचे. नुसत्या कल्पना केल्यावरही जाणवते की, भिक्खू होणे सोपी गोष्ट नाही.
 
 
 
 
अन्न ग्रहण केल्यानंतर मग धर्माच्या प्रचार आणि संवर्धनासाठी कार्य करायचे. या सगळ्या भिक्खूंबाबत थायलंडच्या जनतेच्या मनात कमालीचा आदर आणि प्रेम असते. इथल्या बौद्ध पुरोहित वर्गाला ‘सुप्रीम संघ’ ‘कांऊसिल’ नियंत्रित करते. तसेच, थायलंड सरकारचा ‘नॅशनल ऑफिस ऑफ बुद्धिझम’ हा विभागही आहे. २०१३ सालानंतर थायलंड सरकारने विहारासंदर्भात कायदा पारीत केला. त्यानुसार विहारातल्या दानाचा पैसा सार्वजनिक स्तरावर जाहीर करावाच लागेल. त्यावर प्रशासनाचा अधिकार असेल. प्रत्येक बौद्ध भिक्खूला ‘डिजिटल’ कार्ड दिले जाईल. त्यानुसा भिक्खूच्या दैनंदिन जीवनातले धर्मपालन, आरोग्याच्या समस्या तसेच इतरही बाबींवर लक्ष दिले जाईल. देशाने भिक्खूंच्या आरोग्याचेही सर्वेक्षण केले. त्यात आढळले की, ४० टक्के भिक्खूंना हाय-कोलेस्ट्रॉल, २५ टक्के भिक्खूंना उच्च रक्तदाब आणि दहा टक्के भिक्खू मधुमेहाने ग्रस्त आहेत. या देशात ‘हेल्दी माँक हेल्दी न्युट्रिशिअन’ असा सरकारचा उपक्रमही आहे.
 
 
 
 
हे सगळे पाहून वाटते की, आपल्या देशात बौद्ध धर्माचा जन्म झाला. बौद्ध भिक्खूंबाबत आपल्या समाजात काय नियोजन आहे? बौद्ध भिक्खू आणि बहुसंख्य हिंदू समाजाच्या आस्थेतील पुरोहित वर्गासंदर्भात काय नियोजन आहे? काही तथाकथित निधर्मी आणि विद्रोही लोकांच्या टवाळक्या, कुचेष्टा आणि शिव्याशापाचे धनी होण्याचेच त्यांच्या नशिबी बस! आपला समाज थायलंडकडून काही शिकेल का?
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0