'सासरवाडी’ चे उद्घाटन अभिनेत्री सई ताम्हनकर यांच्या हस्ते संपन्न

    दिनांक  13-May-2022 18:38:11
|

sai 
 
 
नवी मुंबई सीवूड्स येथे सेक्टर ४८ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ हया हटके महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘सासरवाडी’ असे ठिकाण आहे की जिथे माहेरच्या व सासरच्या लोकांना सतत जावेसे वाटते. तिथे जावई मंडळीची चांगली बडदास्त ठेवली जाते, त्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जातात. मी मराठी खाद्यपदार्थांची, विशेष करून पिठलं भाकरीची चाहती आहे. या हॉटेलच्या संचालिका ॲड. सोनाली धामणीकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ मिळवून हा चांगला प्रयोग केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते, अशा शब्दात सईने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तर गेली दहा वर्षे असे मराठी चवीचे खास हॉटेल काढावे हे आपले स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद वाटत असल्याचे संचालिका ॲड. सोनाली धामणीकर यांनी सांगितले.
 
 

saii 
 
ॲडव्होकेट सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या नवी मुंबई सीवूडस सेक्टर ४८ येथे असलेल्या या हॉटेलात एकावेळी ५५ खवय्यांची आसनव्यवस्था असून महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ, पुण्यातील मटकी मिसळ, सांगलीतील गावरान मटण, कोल्हापुरी तांबडा - पांढरा रस्सा, नागपुरचे सावजी मटण व चिकन, कोकणातील मासे, चिंबोरी कालवण, पिठलं भाकरी, अळूवडी, कोथिंबीरवडी, मिरचीचा ठेचा, माडग्याचे सूप, पूरणपोळी, मोदक, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी असे विविध मराठी खाद्यपदार्थ इथे चाखता येतील. तसेच शाकाहरींसाठी मासवडी रस्सा हे येथील वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे हे जेवण काश्याच्या ताट वाटी मध्ये वाढले जाते. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवेल अशी आतील सजावट, घडीव दगडाचे तुळशी वृंदावन, भिंतीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीची कलाकृती, टेबलावर पैठणी साडी, गावाकडील घरातील स्वयंपाक घरातील चित्राकृती, लाकडी माळा इत्यादी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही सासरवाडी खाद्यरसिकांना नक्कीच आवडेल, असेही संचालिका ॲड. सोनाली धामणीकर यावेळी म्हणाल्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.