बीड शेतकऱ्याची आत्महत्या : अजित पवार म्हणतात "आम्ही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022
Total Views |
Untitled design




मुंबई : (beed farmer suicide) बीडमध्ये अतिरिक्त  ऊसाच्या प्रश्नावर शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यातील पिकांचा प्रश्न पेटला आहे. कारखान दारांनी तोडणीला आलेला ऊस न नेल्याने संपूर्ण शेत पेटवून देत लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. याच प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. तरीदेखील बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची दुःखद घटना घडली," असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.


"सर्व ऊस गळीताला नेण्याचे काम सरकार करत आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे, कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये," असे आवाहन त्यांनी केले. मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यामध्ये जालना, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात काही प्रमाणात ऊस आहे. सातारा आणि पुण्याच्या काही भागातही ऊस असून शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचं काय होणार याची भीती वाटत आहे, असेही ते म्हणाले. 


"महाविकास आघाडीने पहिल्यापासून ऊस वेळेत नेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ऊसाचे क्षेत्र प्रचंड वाढले आहे. तसेच गळीत हंगाम देखील लांबला आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत देखील ऊस संपलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात रिकव्हरी लॉस आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. साखर आयुक्त आणि सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील हे दोघेही बारकाईने लक्ष देऊन आहेत. तसेच महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील आणि मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

या पत्रकार परिषदेला अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष नाझीर काझी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.




@@AUTHORINFO_V1@@