...आणि पवारांची स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2022
Total Views |

...आणि पवारांची स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड
 
 
 
मुंबई : कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या 'पाथरवट' कवितेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. पाथरवट या कवितेचा संदर्भ पवारांनी सोमवारी (दि. ९ मे) साताऱ्यात झालेल्या एका सभेत दिला. सोशल मीडियावर पवारांनी मांडलेल्या भूमिकेवर बरीच टीकाही झाली. त्यांचे खंडण करण्यासाठी पवारांना गुरुवार, दि.१२ मे रोजी पत्रकार परिषद घ्यावी लागली. मात्र पत्रकार परिषदेदरम्यान वाचलेल्या त्या कवितेच्या ओळींची मांडणी आणि साताऱ्याच्या कार्यक्रमावेळी बोललेल्या ओळींची मांडणी यात प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले.
 
 
 
'डोंगराचे ढोल' या पुस्तकातील 'पाथरवट' या कवितेत कवी जवाहर राठोड लिहितात, 'तुमच्या ब्रम्ह, विष्णू, महेशाला; लक्ष्मीला अन् सरस्वतीला आम्हीच की रुपडं दिलय. आता तुम्हीच खरं सांगा, ब्रम्हदेव आमचा निर्माता की आम्हीच ब्रम्हदेवाचे पिता?'. मात्र पवारांनी साताऱ्याच्या कार्यक्रमात या ओळींची मांडणी वेगळ्याप्रकारे केल्याचे दिसून आले. "तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या आणि साल्यांनो, आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत.', असे पवार त्यावेळी म्हणाले. त्यामुळे ही पत्रकार परिषदे घेऊन पवारांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे का? असा सवाल आता उद्भवत आहे.
 
 
 
कवी कवितेतून केवळ त्याच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय
"पवार साहेब हिंदू देव-देवतांचा अपमान करतात याचं प्रमाणपत्र भाजपने आम्हाला द्यायची गरज नाही. आजही समाजात जेव्हा दलितांवर पाय चाटायची वेळ येते, तेव्हा मी अस्वस्थ होतो. आजही देशात दलीतांवरचे अन्याय थांबलेले नाहीत. जात व्यवस्थेचं मूळ हे धर्मव्यवस्थेत आहे. 'पाथरवट' या कवितेचा कवी जवाहर राठोड हा कार्ल मार्क्सच्या मार्गाने जाणारा कवी आहे. त्यामुळे व्यवस्थेत बंडखोरी करणं हे त्याच्या रक्तातच आहे. कवी कवितेतून केवळ त्याच्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय. अशा लहान लहान समाजातील पोरं शिकून, समाजाचा अंदाज घेऊन आज लिखाण करतायत. कवीप्रमाणे शरद पवारांचंही हेच म्हणणं आहे. त्यांनी त्याचं केवळ कौतुकच केलं आहे"
 
- जितेंद्र आव्हाड, कॅबिनेट मंत्री
 
 
 
जे पोटात आहे ते ओठांवर आलं असावं
"शरद पवारांनी जरी एखाद्या पुस्तकातल्या कवितेचा आधार दिला असला, तरी त्यातून मुख्यत्वे भावना अधोरेखित होते. राज ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे पवार साहेब हे नास्तिक असल्याचे सुप्रिया सुळेंनीही संसदेत यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे तिच भूमिका अधोरेखित करणारं तर हे वक्तव्य नाही ना? कार्यक्रमाच्या ठिकाणी त्या कवितेचा उल्लेख म्हणजे जे पोटात आहे ते ओठांवर आलं असावं, असं मला वाटतं." 
- प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेते 
 
 
@@AUTHORINFO_V1@@