विशेष ‘एनआयए’ न्यायालयात फुटीरतावादी यासिन मलिकची गुन्हे कबुली

12 May 2022 16:31:21
Yasin
 
 
 
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी): जम्मू-काश्मीरमध्ये गेली अनेक दशके फुटीरतावाद, दहशत आणि हिंसेचा चेहरा असलेल्या यासिन मलिक याने मंगळवारी दिल्ली येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयात आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्याला ठोठावण्याच्या शिक्षेविषयी 19 मे रोजी न्यायालयात युक्तिवाद होणार आहे.
 
 
जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिकने न्यायालयासमोर दहशतवादी कारवायांमध्ये आपला सहभाग असल्याचे मान्य केले आहे. काश्मीर खोर्‍यात 2017 मध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये त्याने त्याचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. यासिन मलिकने आपल्यावरील आरोपांना आव्हान देण्यास नकार दिला. मलिकवर ‘युएपीए’ कायद्यांतर्गत ‘कलम 16’ (दहशतवादी कृत्य), ‘कलम 17’ (दहशतवादास अर्थपुरवठा), ‘कलम 18’ (दहशतवादी कट रचणे), (पान 6 वर) विशेष ‘एनआयए’ न्यायालयात फुटीरतावादी यासिन मलिकची गुन्हे कबुली (पान 1 वरुन) ‘कलम 20’ (दहशतवादी संघटनांशी संबंध) आणि भादंवि ‘कलम 120 ब’ आणि ‘124 अ’ (देशद्रोह) ही कलमे लावण्यात आली आहेत.
 
 
 
न्यायालयाने इतर काश्मिरी फुटीरतावादी नेत्यांवरही आरोप निश्चित केले आहेत. या यादीत फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे, शबीर शाह, मुशर्रत आलम, मोहम्मद युसूफ शाह, आफताब अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर, राजा मेहराजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, जहूर अहमद शाह, शब्बीर अहमद शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांच्यासह ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांचीही नावे आहेत.
Powered By Sangraha 9.0