महाराष्ट्रातल्या १३ हत्तींची गुजरातला स्वारी

जामनगरचे राधाकृष्ण टेम्पल एलीफंट वेलफेअर ट्रस्ट घेणार काळजी

    दिनांक  12-May-2022 15:34:17
|
Elephant
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातून १३ बंदिस्त हत्ती गुजरातला पाठवण्यात येणार आहेत. जामनगरच्या राधाकृष्ण टेम्पल एलीफंट वेलफेअर ट्रस्ट तर्फे या हत्तींची सोय करण्यात येणार आहे. कमलापूर हत्ती कॅम्प, सिरोंचा, पाटनील आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील हत्ती हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
 
 
भारत सरकारच्या पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने या बाबतचे 'ना-हरकत' पत्र महाराष्ट्र वन विभागाला पाठवले आहे. पाठवण्यात येणाऱ्या हत्तींमध्ये वृद्ध, अप्रशिक्षित हत्ती, आणि बछड्यांचाही समावेश आहे. या हत्तींना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील अशी ग्वाही वनविभागाकडून देण्यात आली आहे.
हत्तींच्या वाहतुकीपासून ते सोयी-सुविधांपर्यंतचा सर्व खर्च ट्रस्ट उचलेल. या हत्तींना चांगले आरोग्य मिळावे यासाठी वनविभाग शासकीय व खाजगी संस्थांतील विविध पशुवैद्यकीय तज्ञांची मदत घेत आहे. त्यांना यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही. तसेच धार्मिक कार्यक्रमाकरिता त्यांचा वापर करण्यात येणार नाही. त्यांना प्राणिसंग्रहालयात किंवा इतर कुठेही प्रदर्शितही करण्यात येणार नाही.
 
 
गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हे महाराष्ट्रात हत्तींचे एकमेव छावणी आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतर महाराष्ट्र सरकारने आठपैकी चार सुदृढ हत्ती कमलापूरमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, उर्वरित हत्ती जामनगरला पाठवण्यात येणार आहेत. राधाकृष्ण टेम्पल एलीफंट वेलफेअर ट्रस्ट कमलापूरमधील चार हत्तींच्या सर्व गरजांची काळजी घेईल आणि हत्तींच्या संगोपनासाठी लागणारा सर्व खर्च उचलेल. या  हत्तींना त्यांच्या आहारासाठी दररोज ४५ किलो तांदूळ, पाच किलो गूळ, एक लिटर तेल आणि एक किलो मीठ लागते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.