घोरपडीची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

10 May 2022 17:14:02
gp
 
 
मुंबई(प्रतिनिधी): साताऱ्यातील कुमठे गावामधून घोरपडीची शिकार केल्याबद्दल दोन आरोपींना दि. ९ मे रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाकडून आरोपींना चार दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
कुमठे गावातील धनावडेवाडी येथे डांबरी रस्तावरुन दोन माणसे मृत घोरपड घेऊन जात असल्याचे वृत्त वनविभागाला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार तत्काळ कारवाई करत वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वनविभागाने आरोपींना ताब्यात घेतले. आरडगावचा भिमराव जयसिंग बनसोडे आणि मलवाडीच्या अमर अशोक तरडेला मृत घोरपडीसह रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केल्यावर त्यानी ही शिकार कुमठे गावातील दत्ता चव्हाणच्या शेतात केल्याचे कबुल केले. यासाठी गावठी कुत्र्यासह लाकडी काठी आणि कुऱ्हाडीचा उपयोग केल्याचे त्यांनी मान्य केले.
 
घोरपड हा प्राणी कायद्याअन्वये संरक्षित आहे. वन्यप्राणी / वन्यप्राण्याचे मांस अनाधिकृतपणे बाळगणे, शिकार करणे, वाहतुक करणे यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६), २ (३६), ९, ३९, ४३, ४८ अ च्या नुसार वन गुन्हा आहे. मृत घोरपड जप्त करुन आरोपी यांना आज दि. १० मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १३ मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. या कारवाई दरम्यान साताऱ्याचे उपवनंसरक्षक महादेव मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईत सातारा सहा. वनसंरक्षक सुधीर सोनवले, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी, डॉ. निवृती चव्हाण अरुण सोळंकी, कुशाल पावरा, वनपाल सातारा वनपाल परळी, महेश सोनावले वनरक्षक कुसवडे, सुहास भोसले वनरक्षक सातारा, राजकुमार मोसलगी वनरक्षक भरतगाव, साधना राठोड वनरक्षक धावली, अश्विनी नरळे वनरक्षक कण्हेर, मारुती माने वनरक्षक, रोहोट यांनी केली. प्रत्येक वन्यप्राणी हा निसर्गाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वनविभाग सातारा मार्फत आवाहन करण्यात येते की, कोणीही असा वनगुन्हा करीत असल्यास तात्काळ वन विभागास संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0