कितने दूर कितने पास...

10 May 2022 12:41:20

image aarogya 
 
 
 
 
पूर्वी अग्रस्थानी असलेल्या जागतिक संस्थांना भौगोलिक आणि ‘टाईम झोन’मधील फरकांमुळे एकमेकांशी संपर्कात राहणे कठीण होते किंवा गैरसोईचे होते, पण कोरोना काळात हाताच्या बोटांवर विसावलेल्या तंत्रज्ञानामुळे या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकत आहेत.
 
 
कोरोना महामारीच्या काळात जगभर लोक इतके हताश झाले होते, हेलावले होते की, आता आपले दैनंदिन जीवन सामान्य होण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही, असे सांगत ते खरंच कधी गोष्टी पुन्हा सामान्य होतील का, असे प्रश्नार्थक उद्गार काढत बसले होते. सगळेच वातावरण असे काही अनिश्चित होते की, भविष्यात कधी आपले आयुष्य सामान्य होईल, या विवंचनेत लोक पडले होते. शेवटी आपल्या हातात काही-काहीच उरले नाही. ‘पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा’ अशी काहीशी परिस्थिती आपल्यासमोर उभी ठाकली होती. अर्थात, शेवटी अपरिहार्यपणे का होईना, आपण नवीन सामान्य स्वीकारण्यासाठी जमिनीवर उतरलो आहोत, २०१९ किंवा २०२० च्या सुरुवातीच्या काळात गोष्टी आणि परिस्थिती जशी होती तशी ती कदाचित पुन्हा तशीच होणारही नाही. आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात जीवन जगण्याच्या सामान्य पद्धतीत होणार्‍या छोट्या-मोठ्या बदलांमुळे काही आवश्यक आणि अटळ असे समायोजन निश्चितच केले जाणार आहे, पण या बदलांबरोबरच अनेक नवीन संधी आपल्याला क्षितिजावर येताना दिसतील, यात शंकाच उरत नाही. सामान्य आयुष्य हे प्रत्येकासाठी सापेक्ष आहे आणि सामान्य जीवनाचे विविध पैलू आहेत. गोष्टी सामान्य होतील का, या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ आणि ‘नाही’ असे थोडक्यात द्यावे लागेल. सर्व क्षेत्रात थोड्याफार प्रमाणात बदल असतील. काहींसाठी त्या गोष्टी जशा पूर्वी होत्या, तशाच असू शकतात. इतर शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात मोठे बदल घडताना दिसले आहेत. महामारीत आपले समाजकारण, कार्य करण्याच्या पद्धती आणि शिकण्याच्या व शिकवण्याच्या पद्धती यात प्रामुख्याने बदल घडले आहेत आणि ते आणखी आरामदायी आणि मैत्रीपूर्ण होण्यासाठी अजूनही काही बदल घडण्याची आवश्यकता आहेच.
 
आपल्या जीवनाचे विविध भाग एकत्र गुंफले गेले आहेत आणि एक लवचिक वेळापत्रकासह हे सगळे करण्याची संधी यामुळे आपल्याला मिळाली आहे. या लवचिकतेचा वापर आपण सर्वांनी आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे. कित्येक लोकांनी एकमेकांशी जुळवून घेण्याची सभ्याचारपद्धती कोरोना काळात काम करताना शिकली आहे. त्यामुळे जेव्हा जग ‘लॉकडाऊन’मधून व प्रतिबंधक सवयींमधून उघडायला लागले तेव्हा अत्यंत नवख्या बदलांची काही गरज आपल्याला भासली असे नाही. ‘घरी बसून काम करा’ (थेीज्ञ षीेा हेाश) आजही सुरू आहे आणि कदाचित ते पुढेही चालू राहील, हे आता अनेक जणांना कळलेले आहे. तुम्ही तुमचे सर्व काम कसे पूर्ण करू शकता आणि तुमच्या कंपनीला व तुम्हाला स्वतःला तुम्ही कसे मूल्य व महत्त्व देऊ शकता, याचा अंदाज आता तुम्हाला कळून आला आहे. आता जी वेळेची लवचिकता तुम्हास मिळाली आहे, याचा प्रयोग तुम्ही तुमच्या भल्यासाठी केला पाहिजे. अशावेळी बाहेर आवाज करणारी मुले, भुंकणारे कुत्रे आणि इतर अस्वस्थ करणार्‍या मानवी क्षणांना तुम्ही माफी देऊ शकाल, तर ती अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. तंत्रज्ञान नवनूतन मार्गांनी स्वीकारले गेले आहे. ‘इन्स्टंट मेसेजिंग’ वा तातडीचे संदेशवहन हे आता शक्य झाले आहे. पूर्वी खूप काम हाताशी असताना एखाद्या सहकार्‍याला पटकन पकडायचे व शोधायचे इतके गुंतागुंतीचे होत असे; तेच आता त्वरित संदेशवहनातून चटकन होते. बरे, यामध्ये जो कडवट संवाद घडत असे तो टाळला जाऊ शकतो. कोरोनाच्या महामारीत, जगातल्या कामानिमित्त असणार्‍या अनेक भिंती खाली आल्या आहेत. जागतिक पातळीवरचे सहकर्मचारी आता एकमेकांना चटकन भेटतात. अर्थात, किती वेळ काम करायचे, हे बदलले जरी नाही, तरी जे सहकारी एकटे पडत होते किंवा मूळ कृतीपासून व ऑफिसमधील घटनांपासून वगळले जात होते, त्यांना आता डिजिटली सर्व गोष्टींत समाविष्ट करून घेतले जात आहे. अर्थात, एकत्र येऊन ‘केक पार्टी’ होणार नाही, पण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणूस एकत्र ‘झूम’वर ‘झूमायला’ लागलीत, एवढे खरे म्हणजे जागतिक पातळीवर विविध ठिकाणी असलेले मित्रपरिवार आणि सहकारी सोबत असू शकतात, हेही नसे थोडके.
 
वैयक्तिक स्पर्श किंवा संबंध गमावणे याचा अर्थ स्पर्श पूर्णपणे गमावणे, असा होत नाही. पाश्चात्य देशांमध्ये हे समजावून घेणे अत्यंत गरजेचे होते. त्या देशांत तरुण लोक यामुळे खूप नाराज होते. दूरस्थ कामाच्या या वातावरणात आपण आमनेसामने होणारी संवादाची संधी गमावली. एकमेकांसमोर राहून मोकळेपणा अनुभवायची संधी गमावली, असे लोकांना वाटत असे.‘कॉफी ब्रेक’ संवाद वा ‘लंच’च्या वेळी मन हलकं करणारे संवादाचे प्रसंग, जे रम्य असतात, ते आपल्याला आता अनुभवता येत नाहीत, अशी अनेक कर्मचार्‍यांची तक्रार होती. अशा अनेक गोष्टी ज्या वैयक्तिक आहेत, पण व्यावसायिक पातळीवरही समकालिक केल्या आहेत, त्या अनेक लोकांना उपभोगायला मिळत नाहीत. पण काही वैचारिक सुसंवाद आणि मोकळेपणाने ‘हाय-हॅलो’ करत मोकळेपणाने व्यक्त करायची संधी दूरस्थ पातळीवर आजही मिळू शकेल, हे महत्त्वाचे आहे. पूर्वी अग्रस्थानी असलेल्या जागतिक संस्थांना भौगोलिक आणि ‘टाईम झोन’मधील फरकांमुळे एकमेकांशी संपर्कात राहणे कठीण होते किंवा गैरसोईचे होते, पण कोरोना काळात हाताच्या बोटांवर विसावलेल्या तंत्रज्ञानामुळे या सगळ्या अडथळ्यांवर मात करत लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकत आहेत. दूरस्थ पातळीवर काम करणार्‍या सहकार्‍यांना ऑनलाईन भेटण्याची संधी अधिक समावेशक आणि मौल्यवान वाटू शकते.
 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0