पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १९७ माजी न्यायाधीश, नोकरशहा आणि सैन्याधिकार्‍यांचा पाठिंबा

हिंसाचाराच्या राजकारणाचा बुरखा फाडण्याचे केले आवाहन

    01-May-2022
Total Views |
PM
 
 
 
 
नवी दिल्ली : देशातील हिंसाचार आणि त्यावरील पक्षपाती राजकारणावर देशातील विविध क्षेत्रातील १९७ माजी अधिकार्‍यांनी पंतप्रधान मोदींना खुले पत्र लिहिले आहे. देशात एका विशिष्ट अजेंड्याखाली होत असलेले पक्षपाती राजकारण स्वीकारता येणार नाही. त्यासाठी हिंसेचे राजकारण करणार्‍या लोकांना उघडे पाडणे गरजेचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र म्हणजे १०८ माजी नोकरशहांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेस प्रत्युत्तर असल्याचे मानले जाते.
 
 
 
मोदींना लिहिलेल्या या पत्रात माजी न्यायमूर्ती, निवृत्त अधिकारी आणि सशस्त्र दलातील माजी अधिकार्‍यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावर सीसीजीच्या मौनावर टीका केली आहे. त्यांच्या या वृत्तीमुळे त्यांच्या हेतूवर अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे पत्रात लिहिले आहे. याशिवाय, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि नवी दिल्ली येथे श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि इतर सणांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत सीसीजी गटाच्या मौनावर टीका करताना, सीसीजीच्या सदस्यांवर देश आणि समाजात फूट पाडण्याचा आरोपही करण्यात आला आहे. पत्र लिहिणार्‍यांमध्ये आठ निवृत्त न्यायाधीश, ९७ निवृत्त नोकरशहा आणि ९२ निवृत्त सैन्याधिकार्‍यांचा समावेश आहे.