मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला दि. ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आ. नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहित आपण या कलादालनाकडे हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे. दि. १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादालनावर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, अशी मागणी आ. नितेश राणे यांनी पत्रातून केली आहे. आ. नितेश राणे पत्रात म्हणाले की, “महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना हे कलादालन अद्याप संयुक्त महाराष्ट्राचे कलादालन आजही अंधारात! पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, इथे रंगरंगोटीदेखील केली गेलेली नाही.
एवढेच नाही, तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकार्यांच्या पार्किंगसाठी व बैठकांसाठी केला जात आहे. बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबीयांची वैयक्तिक मालमत्ता करण्याचा घाट, तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे, असा आरोपही आ. नितेश राणेंनी या पत्रातून केला आहे.
पुढे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत आ. नितेश राणेंनी लिहिले की, पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सुचित का गेला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की, आपली या कलादालनाबाबत काही वेगळीच मनीषा आहे. आपण जो महाराष्ट्राच्या आस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहन १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सुचित समावेश करावा आणि आपला हेतूवर उठलेले शंकेचे मोहोळ शांत करावे, अशी मागणीही नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.