मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ठाण्यात जाहीर सभा पार पडणार असून तत्पूर्वी या सभेचा टीझर मनसेकडून नुकताच रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधील राज ठाकरेंच्या भाषणावर आलेल्या राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्याबी या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेपूर्वीचा टीझर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला असून यात त्यांनी टीझरला करारा जवाब मिलेगा #उत्तरसभा असे कॅप्शन देखील दिले आहे.
टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या सभेनंतर शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका दाखवण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व टीकांवर राज ठाकरे येत्या १२ एप्रिल रोजी ठाण्यात होणाऱ्या सभेत उत्तर देणार असून, राजकीय सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असेही म्हटले आहे.