मुंबई : शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलन प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किल्ला कोर्टाच्या या निकालानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तुम्ही पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत आहात असा अरोप त्यांनी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला आहे.
सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडून संपूर्ण कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले आहे. "सीआयडीने माझं शंभर पानांच स्टेटमेंट रेकॉर्ड केलं असून बदला घेण्यासाठी हा व्यक्तीगत हल्ला केला आहे. ही लोकशाही नाही, फक्त त्यांना टार्गेट करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे असे म्हणत तुम्ही पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत आहात असा थेट अरोप त्यांनी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला आहे." तसेच, "ही तुमच्या घरची जाहागीरी नाही, ती संपलेली आहे, संविधानाचं राज्य आहे, काही झालं तरी आम्ही लढणार," असेही जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, "असा कोणताही व्हिडिओ नाही ज्यानुसार सदावर्तेंना अटक केली. आम्ही न्यायालयाला सांगितलं, हे वाक्य आमच्या तोंडचं असेल आजच जामीन अर्ज मागे घेतो. हे टार्गेट करण्यासाठी रचलेलं कुभांड आहे. याच्यापासून माझ्या पतीच्या तसेच आमच्या कुटूंबाच्या जीवाला धोका आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडून धोका आहे," असे म्हणतं जयश्री पाटील यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर आरोप केला आहे. तसेच सदावर्ते यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा वचपा काढण्यासाठी हा मुघलाई प्रमाणे कारभार चालू केला आहे असा आरोप करत याच्या विरुध्द लढत राहाणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सोमवारी कोर्टात काय पुरावे सादर होतात ते पाहू असे देखील त्या म्हणाल्या आहेत.