नाशिक सीपींचे पत्र हरवले... तेच माध्यमांकडे पोहोचले!

08 Apr 2022 15:27:57
 
nashik
 
 
नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलीस महासंचालकांना लिहिलेले पत्र हे प्रसार माध्यमांकडे पोहोचले. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून नाशिक पोलीस आयुक्तांच्या पत्राची चर्चा राज्यभरात सुरू आहे. मात्र, आयुक्त यांचे महसूल अधिकार्‍यांवर आरोप करणारे पत्र माध्यमांकडे कसे पोहोचले याची चौकशी पोलीस आयुक्तांनी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिक सीपींचे पत्र हरवले. तेच माध्यमांकडे पोहोचले अशी चर्चा सध्या नाशिक शहरात सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी खुद्द आयुक्तांनीच विशेष शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे आपलेच पत्र हरविल्याबद्दल आपल्याच खात्यातील अधिकार्‍यांना आता पोलीस आयुक्तांनी कामाला लावले आहे.
 
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल विभागावर महासंचालकांना दिलेल्या पत्रात महसूल अधिकारी ‘आरडीएक्स’, तर दंडाधिकारी ‘डिटोनेटर’ असून यातूनच ते जीवंत बॉम्ब सर्वसामान्य नागरिकांसाठी बनत असल्याचा आरोप केला होता. माध्यमांमध्ये हे पत्र प्रसिद्ध झाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही सांगितले होते. तसेच, पांडे यांच्याकडून अखिल भारतीय नागरी सेवा नियमांचे उल्लघंन झाल्याचा मुद्दाही महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून उपस्थित केला जात होता. त्यानंतर मात्र पांडे यांनीदेखील थोरात यांच्या नाराजीवर बिनशर्त माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, हरविल्याचा शोध घेण्याचे प्रशिक्षण असणार्‍या शहर पोलीस दलाच्या प्रमुखांना आपलेच पत्र कसे बाहेर गेले, हा विचार त्रासदायक ठरत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनीच आता चौकशीसाठी अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे. पत्रावर ठाम असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले होते. दि. २ एप्रिल रोजी महसूल खात्याच्या विरोधातील हे पत्र ‘व्हायरल’ झाले. महसूल, ग्रामीण पोलीस असो की, महानगर विकास प्राधिकरण, ‘एमआयडीसी’ या कार्यालयातील अधिकार्‍यांकडून नागरिक त्रस्त झाला असून, त्याला योग्य ती मदत मिळत नसल्याचे म्हटले होते. हे पत्र कसे ‘व्हायरल’ झाले याच्या चौकशीसाठी विशेष शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुरेखा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात दिवसांत आपल्या चौकशीचा अहवाल पाटील यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त तातडीने मुंबईत
 
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे आज तातडीने मुंबईत आले असून दिवसभर त्यांच्याशी निगडित विविध घडामोडी घडत आहेत. आयुक्त पांडे यांच्या ‘लेटरबॉम्ब’चे पडसाद आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्त पांडे हे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी मुंबईत आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या पत्राप्रकरणी गृहविभागाने पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचा खुलासा आता त्यांना करावा लागणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0