‘नाटक’ हे संस्कृत साहित्याचे एक अविभाज्य अंग. विविधांगी विषयांवर आधारित संस्कृत नाटके असताना रामायण कथा त्यापासून कशी अलिप्त राहील? रामकथेचा सृजनात्मक आविष्कार संस्कृत नाटकांमध्ये दिसतो. त्यात प्रामुख्याने ‘प्रतिमा’, ‘अभिषेक’, ‘उत्तररामचरित’ आणि ‘महावीरचरित’ या नाटकांचा उल्लेख करावा लागेल. नाटककारांनी पारंपरिक रामकथेचे केलेले सर्जनशील अलंकार या लेखात पाहूया...
अनेकविध विषयांचे रत्नभांडार म्हणजे संस्कृत साहित्य. ‘काव्येषु नाटकं रम्यम्’ या उक्तीनुसार नाटक हे कायमच संस्कृत साहित्याच्या शीर्षस्थानी राहिले आहे. शृंगाररसप्रधान संस्कृत नाटकांसह अजरामर झाली ती वीर-करुणरसप्रधान नाटके आणि त्यातही रामायणाधारित नाटके. प्रामुख्याने अनेक संस्कृत नाटकांमध्ये रामायण कथा असणारी ‘प्रतिमा’, ‘अभिषेक’, ‘उत्तररामचरित’, ‘महावीरचरित’ ही नाटके विशेषत्वाने दिसतात. नाटकाचा उद्देशच नाट्यात्मकता असल्याने मूळ रामकथेत संस्कृत नाटककारांनी केलेले सृजनकार्यही दाद देण्यासारखे आहे. भास या संस्कृतमधील प्रथम आणि दुर्लक्षित राहिलेल्या नाटककाराने दोन, तर भवभूति या जरा भावनिक आणि वेगळा विचार करणार्या नाटककाराने दोन नाटके लिहिली. अन्य नाटकांमध्ये जरी कुठे रामबीज दिसत असले, तरी या लेखामध्ये प्रामुख्याने आपण याच नाटकांचा विचार करणार आहोत.
भास हा आद्य संस्कृत नाटककार. त्याच्या १३ प्रसिद्ध झालेल्या नाटकांमध्ये दोन नाटके ही रामायणावर आधारित आहेत. एक ‘प्रतिमा’ तर दुसरे ‘अभिषेकम्.’ ‘प्रतिमा’ हे सात अंकी संस्कृत नाटक. भासाने या नाटकात ‘वाल्मिकी रामायणा’च्या कथानकात किंचित बदल करून स्वप्रतिभेने काही नवीन प्रसंग योजल्याने रामायणातील दुष्ट चित्रण सुष्ट आणि सुष्ट चित्रण निष्कलंक झाल्याचे दिसून येते. ‘हरवलेल्या राज्याची पुनःप्राप्ती’ हे भासरचित सर्व नाटकांचे मध्यवर्ती सूत्र याही नाटकात दिसते. श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी, वल्कलधारण प्रसंग, अभिषेक थांबणे, लक्ष्मणाचा संताप, राम, सीता, लक्ष्मण यांचे वनात प्रस्थान इत्यादी कथाभाग प्रथम अंकात आहे. द्वितीय अंकात दशरथाचा विलाप, तृतीय अंकात भरताचा अयोध्या प्रवेश, प्रतिमागृह प्रसंग, कैकयीला दूषणे देऊन भरताचे रामास भेटायला जाणे, चतुर्थ अंकात राम-भरत भेट, रामाच्या पादुका घेऊन भरताचे अयोध्येस परतणे या घटना आहेत. पाचव्या अंकात राम-सीता दशरथाच्या श्राद्धाविषयी बोलत असताना संन्यासी रुपात रावणाचा प्रवेश, श्राद्धासाठी कांचनपार्श्व उत्तम असल्याचे रावणाकडून समजल्यावर राम ते मिळवण्यासाठी जाताच रावणाकडून सीतेचे अपहरण, रावण-जटायु युद्ध, जटायुचा मृत्यू हे प्रसंग वर्णित आहेत. सहाव्या अंकात तपस्वीकडून रावण-जटायु युद्धाचे वर्णन, विष्कंभक, जनस्थानातून सुमंत्राचे आगमन, सीतापहरणाची वार्ता समजल्यावर भरताकडून कैकयीची निर्भत्सना, कैकयीचे स्पष्टीकरण, भरताला पश्चाताप, रामाच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे हे प्रसंग आहेत. सातव्या अंकात लंकेतून विजयी होऊन राम सीतेसह जनस्थानात येतो, तेथे तीनही राजमातांना घेऊन भरत शत्रुघ्नासह येतो. रामास अभिषेक होऊन सर्वजण अयोध्येस परततात.
तृतीय अंकातील प्रतिमागृह प्रसंगावरून भासाला प्रस्तुत नाटकाचे नाव सुचले असावे. कारण, या प्रसंगाचे त्याला विशेष महत्त्वही आहे. हा प्रसंग एक छोटीशी घटना म्हणून आलेला नाही, तर तो अंकव्यापी आहे. या प्रसंगाने भासाला खूप काही सुचवायचे आहे. राजवाड्यातील घडामोडी, रामाचा वनवास, दशरथाचा मृत्यू या घटना आजोळी असणार्या भरताला ठाऊक नाहीत. घरच्या भेटीची सुखद चित्र रंगवीत तो अयोध्येस निघाला. त्याला अयोध्येस घेऊन येणारा सारथी अशुभ घटनांची वाच्यता करत नाही. शुभ नक्षत्रावर नगरात प्रवेश करावा, या कुलगुरूंच्या आदेशानुसार तो काही काळ नगराबाहेर प्रतीक्षा करत असताना त्याला ‘प्रतिमागृह’ दृष्टीस पडते. दिवंगत इक्ष्वाकु राजांच्या पाषाण प्रतिमांचे हे मंदिर आहे. येथेच दशरथाच्या मृत्यूची वार्ता आणि त्याला कारण झालेल्या घटना तेथील अबोल प्रतिमेने भरताला सांगितल्या. इक्ष्वाकु राजांशी भरताचे शरीरसाम्य प्रथम पुजार्याच्या लक्ष्यात येते. त्याचा आवाज ऐकून सुमंत्राला दशरथाची प्रतिमाच आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो, तर पुढे चौथ्या अंकात त्याच्या आवाजाने लक्ष्मणाला दशरथाची आठवण येते आणि समोर भरताला पाहताच त्याला तो राम भासतो. ते रूपसदृश पाहून लक्ष्मण म्हणतो, “दशरथासारखे भरताचे रूप म्हणजे जणू आरशात पडलेली रामाची प्रतिमाच.” प्रतिमागृहातील दशरथाची प्रतिमा हे जर राज्यविहीन अवस्थेचे प्रतीक, तर या साम्यामुळे राम आणि भरत हेही अराजकतेच्या चालत्या-बोलत्या जीवंत प्रतिमाच ठरतात. कारण, वनवासात असणारा राम हा राजा नाही आणि भरताला राजा व्हायचे नाही. तसेच, भरताचे रामाच्या रूपाशी आणि दशरथाच्या आवाजाशी साम्य दाखवून या तीनही एकमेकांच्या प्रतिमाच असल्याचे भासाने सूचित केले आहे. प्रथम अंकातील वल्कलप्रसंग हा भासाच्या प्रतिभेची स्वतंत्र निर्मिती आहे. रामास वनवास घडणार हे प्रस्तुत प्रसंगातून भासाने आधीच सूचित केले आहे. सीतेने उत्सुकता आणि कुतूहलापोटी परिधान केलेली वल्कल पाहून रामासही ती परिधान करण्याचा मोह होतो. पुढे तीच वल्कलं घालून ते वनात जातात, यात नाट्य आहे. इक्ष्वाकु वंशातील वृद्धपणाचा अलंकार राम-सीतेला तारुण्यातच परिधान करावा लागला. या प्रसंगाच्या निर्मितीने भासाने मोठेच नाट्यछलित साधले आहे. राम, लक्ष्मण आणि सीता हे दशरथाचा निरोप न घेताच वनात निघून गेल्याने दशरथ शोकसागरात बुडाला. संपूर्ण द्वितीय अंक शोकव्याप्त आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनगमनाची वार्ता सांगताना सुमंत्राने उच्चारलेला क्रमही दशरथाला सहन झाला नाही. शोकाग्नीने जळत त्याचा मृत्यू होतो. गादीवरच्या राजाचा मृत्यू हे तत्कालीन महान संकट होय. या संकटाची भीषणता दिसावी यासाठी भासाने स्वतंत्र अंक रचला. दुसर्या अंकातील दशरथाचा मृत्यू हे परचक्राचे दृश्य रूप मानले, तर याच भीषणतेचे प्रतीकात्मक रूप तिसर्या अंकातील प्रतिमागृह प्रसंग. तृतीय अंकातील प्रतिमागृहाच्या प्रसंगातून दशरथाच्या मृत्यूची वार्ता भरताला समजणे ही भासाच्या कल्पनाशक्तीची स्वतंत्र निर्मिती आहे.
पाचव्या अंकात राम वनवासात असताना राम आणि रावण एकमेकांसमोर येणे व त्यांच्यातील संभाषण हा संपूर्ण प्रसंग ‘नवीन’ आहे. सहाव्या अंकात रामाचे क्षेमकुशल विचारण्यासाठी सुमंत्राला वनात पाठवणे, सीतापहरणाची वार्ता समजल्यावर जेव्हा भरत कैकयीची निर्भत्सना करतो. परंतु, भासाची खरी सृजनशीलता इथे आहे. कैकयीची निर्माण झालेली ‘कपटी’ भूमिका बदलण्याचे अतुलनीय काम तो करतो. भरताने दिलेली दुषणे असह्य झाल्यावर कैकयी सत्य परिस्थिती निवेदन करते. कैकयी लोभी नाही. भरतास राज्य मिळावे, ही तिची महत्त्वाकांक्षा नाही की, प्राणप्रिय पुत्रास वनात धाडण्याची मनोमन इच्छाही नाही. श्रावणाच्या चुकून झालेल्या वधामुळे दशरथाला जो शाप मिळाला तो, तर थांबवता येण्यासारखा नव्हता. पण, त्याला कारण ठरणारा पुत्रविरह हा पुत्राच्या मृत्यूने न घडता दुसर्या काही प्रकारे सिद्ध करण्यासाठी ती प्रयत्न करते. दशरथाला भरताचा विरह हा नैसर्गिक होता, या विरहाने त्याचा देहांत होण्याचा संभव नव्हता. परंतु, त्याचे रामावर इतके प्रेम होते की, त्याचा थोडासा विरहदेखील सहन झाला नसता. म्हणून कैकयी रामास वनात पाठवण्याचे योजते. राम दुरावला, तर दशरथ जीवंत राहणार नाही, शापाची सिद्धी झाली म्हणजे निवृत्तीही होईल. निर्घृण नियतीला समाधान देऊनही हुलकावणी देण्याचा हा डाव ती कुलगुरूंच्या संमतीने रचते. ती रामाला १४ दिवसच वनात पाठवणार असते. परंतु, तणावपूर्ण मानसिकतेतून १४ वर्षे बोलून जाते, हे कैकयीने दिलेले स्पष्टीकरण ऐकून भरतास पश्चाताप होणे, रामाच्या मदतीसाठी सैन्य पाठवणे इत्यादी नवीन कथाभाग योजून भासाने भरताच्या व्यक्तिरेखेस उठाव दिला आहे. सातव्या अंकातील जनस्थानात झालेला रामाचा अभिषेक हे सर्वच प्रसंग भासाने आपल्या उत्तुंग प्रतिभेतून व कल्पनाशक्तीतून चित्रित केले आहेत.
भासाचे दुसरे रामायणाधारित नाटक म्हणजे ‘अभिषेक.’ रामायणकथेवर आधारित भासाचे हे सहा अंकी नाटक रामायणातील किष्किंधाकांडापासून युद्धकांडापर्यंतची म्हणजेच वालिवध ते रामराज्याभिषेक अशी रामकथा यात येते. सुग्रीव, बिभीषण आणि राम या तिघांचा राज्याभिषेक या कथानकात आला आहे. त्यामुळे नाटकाचे ‘अभिषेक’ हे शीर्षक समर्पक ठरते. भासाने नाटकांच्या शृंखलेमधून संपूर्ण रामायणाची कथा नाट्यरूपाने मांडण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. मर्यादापुरूषोत्तम रामाकडून केला गेलेला वालीचा वध न्याय्य होता, असे दाखवण्याचा प्रयत्न नाटककाराने या नाटकाद्वारे केला आहे. पारंपरिक रामायणकथेमध्ये ज्या पद्धतीचे पात्रवर्णन आढळते, तेच काही अंशाने या नाटकातही आढळते. लक्ष्मणाची व्यक्तिरेखा एका आज्ञाकारी सेवक, तसेच रामाच्या विनीत भक्ताच्या स्वरुपात रंगविली आहे. बिभीषण हा रामाचा न्यायप्रिय भगवद्भक्त असल्याचे दाखवले आहे. भासाने रावणाचे चित्रण क्रूर, दुराचारी तसेच परस्त्रीच्या बाबतीत लंपट असणारा असे केले आहे. या नाटकातील प्रधानरस वीररस आहे.
पहिल्या अंकात वानरराज वालीचा रामाच्या हातून वध होऊन सुग्रीवाला राज्याभिषेक करण्याचा प्रसंग येतो. दुसर्या अंकात सुग्रीव सीतेच्या शोधार्थ सर्व दिशांना आपले दूत पाठवतो व त्यामुळे हनुमानाला जटायुकडून सीतेचे रावणाने हरण केल्याचे समजते. हनुमान लंकेला जातो व तिथे अशोकवाटिकेत त्याला सीता भेटते. तिसर्या अंकात हनुमान अशोकवाटिकेचा विध्वंस करतो. त्याला पकडण्यासाठी रावण आपली सेना पाठवतो. हनुमान ती नष्ट करतो. मग रावण आपला मुलगा अक्षयकुमार याला पाठवतो. हनुमान त्याला मारतो. रावण आपला मोठा मुलगा मेघनाद याला पाठवतो. मेघनाद हनुमानाला पकडून रावणासमोर हजर करतो. तेव्हा हनुमान त्याला रामाचा संदेश सांगतो. तो ऐकून रावण चिडतो. त्याला शांत करण्यासाठी बिभीषणाला बोलावले जाते. बिभीषण रावणाला सल्ला देतो की, “त्याने रामाला सीता परत करावी.” त्यावर रावण तो पक्ष:पाती असल्याचा आरोप करतो. चौथ्या अंकात हनुमान परत आल्यावर सुग्रीव सैन्याची रचना करतो. सैन्य समुद्रतटावर पोहोचते. रामाला घाबरून समुद्र वानरसेनेला मार्ग मोकळा करून देतो. बिभीषण रामाचा आश्रय घेतो. शुक-सारक नावाचे दोन राक्षस वानररूप घेऊन रामाच्या सैन्यात दाखल होतात. परंतु, ते पकडले जातात. उदार मनाचा राम त्यांना दंड न करता सोडून देतो आणि त्यांच्याकरवीच रावणाला युद्धाचा संदेश पाठवतो. पाचव्या अंकात राम-रावणाच्या सेनेचे युद्ध वर्णिले आहे. कुंभकर्ण आणि इंद्रजित मारले गेल्यावर रावण खडबडून जागा होतो. भीतीच्या व शंकेच्या भरात तो सीतेचाच वध करण्याचे पाऊल उचलतो. परंतु, त्याचे मंत्री त्याला स्त्रीवध करण्यापासून अडवतात. मग तो एक चाल खेळतो. रामाच्या व लक्ष्मणाच्या मस्तकाची प्रतिकृती करून ती तो सीतेला दाखवतो व राम आपल्याकडून मारला गेला असल्याचे भासवतो. ‘आता तू माझा स्वीकार कर’ असे तिला सांगतो. परंतु, सीता आपल्या निश्चयावर अचल राहते. शेवटी सहाव्या अंकात राम-रावण यांचे युद्ध होते. त्यात रावण मारला जातो. पुढे सीता अग्निपरीक्षा देते. तेथे साक्षात् अग्नी प्रकट होतो व रामाला सांगतो की, “सीता लक्ष्मी आहे. तिचे चारित्र्य शुद्ध आहे. तुम्ही तिचा स्वीकार करा. तुमच्या वडिलांनी तुमच्या अभिषेकाची इच्छा व्यक्त केली आहे.” त्यानुसार राम सीतेचा स्वीकार करतो व अयोध्येला परत आल्यानंतर त्यांचा अभिषेक केला जातो. जनमानसात रुळलेली वाल्मिकी रामायणकथा भासाने या नाटकात साकारली आहे. नाटकातील संवाद लहान आणि प्रभावी आहेत. भासाच्या इतर नाट्यकृतींच्या तुलनेत हे नाटक विशेष वेगळे भासत नाही.
‘उत्तररामचरित’ हे भवभूतिकृत संस्कृत नाटक
‘उत्तररामचरिता’च्या सात अंकांत रामकथेचा उत्तरार्ध भवभूतिने रंगविला आहे. ध्येयनिष्ठेच्या आहारी जाऊन रामाने केलेला सीतात्याग, शंबूकवधासाठी रामाचे पंचवटीत आगमन, सीतेचा प्राणत्यागाचा प्रयत्न, भागीरथीने तिचे प्राण वाचवून जलात प्रसूत झालेल्या तिच्या जुळ्या पुत्रांचे वाल्मिकीच्या हातून करविलेले संगोपन, नंतर १२ वर्षांनी मुलांच्या वाढदिवसाचे धार्मिक कर्तव्य करण्यासाठी सीतेचे पंचवटीत आगमन, वनवासातील राम-सीतेची सखी वासंती हिची रामाशी भेट, तिच्या कठोर छेडण्यामुळे तसेच परिचित प्रसंगांच्या आठवणींनी उफाळून आलेला रामाचा शोक आणि त्यातून रामाच्या अनन्य प्रेमाची साक्ष मिळून सीतापरित्यागाच्या दुःखाचा झालेला परिहार, अश्वमेधीय घोड्याच्या रक्षणार्थ आलेल्या चंद्रकेतूचे लवाशी झालेले प्रलयंकर युद्ध, रामाने घडवून आणलेली शांती, सर्व वडीलधार्या मंडळींचे वाल्मिकी-आश्रमात मीलन, त्यांच्या रामाबद्दलच्या प्रतिक्रिया, रामाची लव-कुशांशी भेट, वाल्मिकीच्या नाटकाचा अयोध्येच्या प्रजाजनांपुढे प्रयोग आणि शेवटी राम-सीतेचे पुनर्मिलन, असा नाट्यकथेचा विकासक्रम आहे.
रामायणातील कथेत भवभूतीने केलेले बदल तसेच नाटकासाठी निर्मिलेले प्रसंग व पात्रे केवळ नाट्यसौंदर्यासाठी नाहीत. सीतात्यागापासून राम-सीतेच्या पुनर्मिलनापर्यंतची वाटचाल केवळ काव्याला कलाटणी देऊन नाटकाचा सुखान्त साधावा म्हणून झाली नसून, एका नव्या सूत्रात सर्व घटना गुंफण्यासाठी झालेली आहे. या रचनेत प्रत्येक दुव्याला नाट्यप्रयोजन आहे. ऋष्यशृंगाच्या १२ वर्षांच्या यज्ञसत्रात वसिष्ठ, अरुंधती, राजमाता गुंतल्याने एकाकी पडलेल्या रामाचा ध्येयनिष्ठ पण ऐकांतिक निर्णय जणू अपरिहार्य बनतो. रामाची वासंतीशी अकल्पित भेट आणि याचवेळी सहेतुकपणे घडलेले अदृश्य सीतेचे आगमन या नाट्ययोगाने प्रजेपासून झाकून ठेवलेल्या रामाच्या अगाध मनाचे दर्शन घडते आणि सीतेलाही रामाची वेदना, त्याचे प्रेम आणि त्याच्या निर्णयाची मनोभूमी कळून येते. पुढील घटनांत सर्व थोर मंडळी वाल्मिकीआश्रमात एकत्र आणण्याचे नाट्यकौशल्य तर आहेच, पण त्यांच्या रामाबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त होण्यासाठी ही नाट्ययोजना आहे, हेही स्पष्ट आहे. लव-कुशांच्या भेटीत अधीर आशेचे नाट्य आहे आणि या भेटीतूनच सीता जीवंत असल्याचा विश्वास रामाला वाटतो. त्यानंतर वाल्मिकीने रामकथेवर रचिलेले ‘गर्भनाटक’ आणि भरतमुनींनी देवादी प्रेक्षकांच्या समवेत अयोध्येच्या प्रजाजनांना गंगातीरावर मुद्दाम उभारलेल्या भव्य मंडपात आणून अप्सरांकरवी त्याचा केलेला प्रयोग म्हणजे कल्पक रचनेचा विलासच आहे. या नाट्याने सीतेच्या शुद्धीची ग्वाही मिळून नाट्यदृष्ट्या तरी राम-सीता एकत्र येतात.
प्रेमाचे अद्वैत साधलेल्या रामाने पत्नीचा त्याग कसा करावा? प्रजानुरंजनासाठी राजकर्तव्य म्हणून हे झाले असे मानले, तरी लोकमत आणि अनुरंजन म्हणजे तरी काय? अशी द्विविध समस्या ‘उत्तररामचरिता’त आहे. नाट्यकथेची ही दुहेरी वीण लक्षात घेतल्यावाचून भवभूतिच्या समग्र नाट्यरचनेचा अर्थच लागणार नाही. रामसीतेचे एकमेकांवरील प्रेम निरपवाद आहे म्हणून त्यांचे हृदयमीलन तिसर्या अंकातच होते. परंतु, लोकमताचा ऐकांतिक आदर करणार्या रामाला, राजा हा प्रजेचा खुषमस्कर्या नसून, एक निष्ठूर पण निःपक्षपाती न्यायाधीश असतो, अशी जाणीव जनकाचा क्रोध आणि लवाचा निर्व्याज उपहास यांमुळे होते. गर्भनाटकाने जनमताची लाज उघडी पडते. एवढे झाल्यावरच नाटक संपते. ‘उत्तररामचरित’ हे केवळ दाम्पत्यप्रेमाचे किंवा प्रेमाच्या आदर्शाचे नाटक नव्हे. पती-पत्नीची अगाध प्रेमनिष्ठा आणि कर्तव्याचा अन्वयार्थ हा ‘उत्तररामचरिता’चा कलात्मक आशय होय. भवभूतीनेच ‘महावीरचरित’ हे नाटक लिहिले. जे सात अंकी असून त्यात रामायणातील पहिल्या सहा कांडांतील कथाभाग आला आहे. यामध्येही त्याने राम आणि सीतेच्या मनाचा वेध घेण्याचाही आटोकाट प्रयत्न केलेला आहे. ‘वाल्मिकी रामायण असो वा जैन रामायण, रामायणाचेही अनेक पाठभेद आहे. परंतु, केवळ रामकथा न सांगता ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ या उक्तीनुसार रामकथेचे भावनिक बंध, नाट्यात्मकता संस्कृत नाटके उलगडतात. त्यामुळे ही नाटके रामकथेचा सृजनात्मक आविष्कारच भासतात!
- वसुमती करंदीकर