आरोग्य सेवाक्षेत्रातील दिप्ती...

08 Apr 2022 09:26:37

dipti
 
 
जागतिक स्तरावर त्वचारोग निवारण तज्ज्ञ म्हणून लौकिक असलेल्या डॉ. दिप्ती देसाई. धर्म, समाज आणि देश या बांधिलकीतून वैद्यकीय सेवेला ईश्वरी सेवा मानतात. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा...
 
 
डॉक्टर माझ्या मुलीला तेवढं गोरं करा. कितीही पैसे घ्या... कित्येक पालक अशी मागणी घेऊन डॉ. दिप्ती देसाई यांच्या दवाखान्यात येतात. त्यावेळी डॉ. दिप्ती म्हणतात,गोरं म्हणजे नक्की काय? ईश्वराची प्रत्येक कृती उत्तमच असते. व्यवस्थित उपचार, आहारपद्धती आणि समाधानकारक मानसिक परिस्थितीतूनच त्वचेचा रंग आणि नितळता सकारात्मक होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा मनातली निराशा घालवा. मनातून आणि विचारातून, त्यातल्या कृतीतून सुंदरता निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार घ्या. त्वचा नितळ आणि उजळ होईल. गोरा रंग मिळवण्याच्या नादात मुलींच्या मानसिकतेवर आघात करू नका, अशाप्रकारे पाल्यांचे आणि पालकांचे समुपदेशन करून कित्येकांना डॉ. दिप्ती यांनी त्वचेच्या रंगाबाबतच्या न्युनगंडापासून आणि अगदी जुन्या त्वचारोगापासून मुक्ती मिळवून दिली आहे. ‘इंडियन असोसिएशन ऑफ डमॅटॉलॉजिस्ट व्हेनेरॉलॉजिस्ट लेप्रॉलॉजिस्टीस’च्या अखिल भारतीय अध्यक्षपदी नुकतीच डॉ. दिप्ती देसाई यांची निवड झाली.
 
त्या याच संस्थेच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीतही पदाधिकारी आहेत. मुंबईच्या डॉ. दिप्ती देसाई यांची शैक्षणिक पात्रता आहे, एमबीबीएस, डीव्हीडी, एमडी.असो, त्वचेचा वर्ण काळा म्हणजे वाईटच, तसेच कुष्ठरोग असणे म्हणजे पापी असल्याचे लक्षण. त्वचेवरील कोणताही पांढरा डाग म्हणजे कुष्ठरोगच, दाद, नायटा वगैरेंना कुठचाही कडू पाला वाटून लावला, तर ते बरे होते. त्वचा रोग फक्त त्वचेशीच संबंधित असतात, बाहेरून एखादं मलम लावलं की, रोग बरा होतो अशा अनेक समजूती समाजात आहेत. या सर्व समज-गैरसमजाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातले सत्य लोकांना कळावे यासाठी डॉ. दिप्ती सातत्याने उपक्रम राबवत असतात. त्यासंदर्भात व्याख्याने देतात, जागृती शिबिराचे आयोजन करतात, विनाशुल्क त्वचारोग निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करतात. आजपर्यंत त्यांनी अशा शेकडो शिबिरांचे आयोजन केलेले आहे. त्वचारोग तज्ज्ञ होऊ इच्छिणार्‍या असंख्य होतकरू डॉक्टरांना त्या मार्गदर्शन करतात. डॉ. दिप्ती यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. त्या म्हणतात, आपल्या देशात बुरशी संक्रमणजन्य (फंगस इन्पेक्शन) त्वचारोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. अगदी कुटुंबची कुटुंबे या विकारांनी ग्रस्त आहेत. त्यातच अज्ञानामुळे नकली आणि तकलादू औषध, मलमांचा वापर केला जातो. या मलमांमुळे त्रास थोड्या काळापुरता बंद होतो. पण, त्यामुळे त्वचा आतून फाटते आणि संक्रमण वाढत जाते. बनावटी आणि त्रासदायक औषधापासून दूर राहा अशी मोहीम त्वचारोग निर्मुलन क्षेत्रात चालवण्याची गरज आहे. त्यासाठीही मी काम करते, असे त्या म्हणतात.
 
 
जगातल्या विख्यात त्वचारोगतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या दिप्ती देसाई यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. डॉ. दिप्ती यांच्या समाजशील वैद्यकीय सेवेची प्रेरणा काय असावी? देसाई कुटुंब मुळचे सौराष्ट्रचे, पण चार पिढ्या मुंबईतच वास्तव्य असलेले. हसमुख आणि हंसा देसाई या सुशिक्षित कुटुंबाच्या कन्या दिप्ती. घरी पांडूरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्यायाचे अनुयायी. हसमुख ‘इंजिनियर’ तर हंसा या गृहिणी. मुलांना त्यांनी शिकवले की, आपल्या सगळ्यांंच्या शरीरात एका परमपित्याने रक्त आणि इतर सर्व भावबंध निर्माण केले. आपण सगळी त्याची लेकरे आहोत. त्यामुळे आपण एकमेकांशी बंधुभावाने वागले पाहिजे. दिप्ती यांच्या आई आणि काकी गीतेतले श्लोक म्हणतच स्वयंपाक बनवत असत. या वातावरणातवाढल्यामुळेच की, काय दिप्ती यांचे विचार सकारात्मक आहेत. शैक्षणिक स्तरावरही त्यांची प्रगती नेहमीच उत्तम राहिली. दहावीला तर त्या विज्ञान विषयात गुणवत्ता यादीत मुलींमधून पहिल्या, इंग्रजी आणि गणित विषयात दुसर्‍या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्या. असाच एक प्रसंग. ‘एमबीबीएस’शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह झाला. त्यांना पुढील शिक्षण घ्यायचे होते. पण नायर रुग्णालयात यासाठी एकच जागा होती. दिप्ती यांच्यापेक्षा दोन जणांना गुण जास्त होते. त्यामुळे दिप्ती यांना प्रवेश मिळणे शक्यच नव्हते. त्यांनी विचार केला माझ्या शिक्षणाचा उपयोग मला समाजासाठीच करायचा आहे. प्रवेश मिळाला नाही, तर दुसर्‍या प्रशिक्षणाकडे वळायचे. मात्र, त्यांच्या आधीच्या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी प्रवेश घेणे टाळले आणि त्या जागी दिप्ती यांना प्रवेश मिळाला. हा प्रसंग दिप्ती यांच्यासाठी आयुष्याला वळण देणारा ठरला.
 
समाजाच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्य समर्पित करावे हा नियतीचा संकेत आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे आयुष्यभर या क्षेत्रात गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करायचा, असे त्यांनी ठरवले. त्यावेळी घेतलेल्या निर्णयावर आजही डॉ. दिप्ती काम करतात. लातुरचा भुकंप असो की, गुजरातचा भुकंप. वैद्यकीय सेवा देण्यासाठी दिप्ती तिथे गेल्या. डॉ. दिप्ती म्हणतात, “स्वाध्याय परिवाराच्या धनश्रीदिदी तळवळकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देश, धर्म, समाजकार्य मला नेहेमीच प्रेरणा देते. या प्रेरणेतूनच मला देश समाजासाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून आयुष्यभर कार्य करायचे आहे.” आंतरराष्ट्रीय स्तरावर त्वचारोग तज्ज्ञ म्हणून ख्याती पावलेल्या डॉ. दिप्ती देसाई यांच्या समाजशील वैद्यकीय सेवेला प्रणाम...!
 
 
Powered By Sangraha 9.0