मनाला हितकारक उपदेश

07 Apr 2022 18:23:14

PAGE 8




पैसा मुळात वाईट नाही, पण त्याची अतिलालसा आणि त्याचा वापर करून आपण आपले व इतरांचे समाधान कसे टिकवता येईल, याचे शास्त्र न समजल्याने श्रीमंती असूनही अशांचा अंत वाईट अवस्थेत झालेला दिसून येतो. यासाठी ‘मना कामना सांडी रे द्रव्यदारा’ हा समर्थांचा उपदेश किती सार्थ आहे, हे समजेल.


जीव वासनेत गुंतलेला असल्याने मृत्यूसमयी अतृप्त राहिलेल्या वासनांच्या तृप्तीसाठी संचितानुसार प्रारब्धभोग भोगण्यासाठी अनुरूप देह धारण करुन जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, असे आपले तत्त्वज्ञान मानते. जीव जन्ममरणाच्या फेर्‍यात सापडतो, हे आपण यापूर्वीच्या लेखांतून पाहिले आहे. हा विषय पुढे नेऊन स्वामी मनाला सांगत आहेत की, हे मना, वासनेमुळे येणार्‍या येरझारा तू चुकव. द्रव्य-दारा यापासून दूर राहा आणि राघवाची भेट घडवून आण.



मना वासना चुकवी येरझारा।
मना कामना सांडि रे द्रव्यदारा।
मना यातना थोर हे गर्भवासी।
मना सज्जना भेटवी राघवासी ॥21॥


वासनातृप्तीसाठी मन ऐहिक जीवनात अनेक आकर्षणांना बळी पडते. मनाला वाटत असते की, पैसा आणि सत्ता यांच्या जोरावर जगातील सर्व सुखे माझ्या पायाशी लोळण घेतील आणि मी त्याचा मनसोक्त उपभोग घेत सुखाने कालक्रमण करेन. एकदा भरपूर पैसा माझ्या हाती आला की, मला इतर कशाची पर्वा नाही. पैशाने मी सर्वकाही अगदी सुख-समाधानही विकत घेईन, असं असूनही स्वामी या श्लोकात वासनेला आवरून जन्ममरणाच्या फेर्‍यांतून वाचवण्यासाठी मनाला विनवणी करीत आहेत, तसेच द्रव्य-दारा यांची कामना इच्छा सोडून देण्याचा उपदेश मनाला करीत आहेत. पैशांची आणि स्त्रीसुखाची लालसा सोडून घ्यावी, हे सर्वसामान्य बुद्धीच्या माणसाला पटेलच असे नाही, असे असताना समर्थ, मनाला द्रव्य व दारा यांच्या संबंधीची वासनामय इच्छा सोडून देण्यास का सांगत आहेत, हे तपासून पाहिले पाहिजे.


द्रव्य म्हणजे पैसा, धन, संपत्ती यांच्यासंबंधी विचार करताना द्रव्य हे सुख-समाधान मिळवण्याचे साधन आहे, हे आपण विसरतो. साधनालाच साध्य मानल्याने अनवस्था निर्माण होते. माणसे पैसा हे साध्य समजून तो जास्तीत जास्त मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. नीट विचार केल्यास हे लक्षात येते की, पैसा साधन म्हणून वाईट नाही. पण, ज्यांना जीवनाचे साध्य समजले नाही अथवा समाधानाचे शास्त्र उमगले नाही, ते केवळ आणि केवळ पैशांच्या मागे धावत असतात आणि अशांचाच गट समाजात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी वरील श्लोकांत मनाला केलेला उपदेश आवश्यक आहे, हे जगातील अनेक उदाहरणे पाहिल्यावर लक्षात येते.

प्रख्यात लेखक शिवखेरा यांचे ‘यश तुमच्या हातात’ हे पुस्तक मागे वाचनात आले. त्या पुस्तकात लेखकाने जगातील पैशाने अत्युच्च श्रीमंतांच्या आयुष्यातील शेवटची वर्षे किती भयानक अवस्थेत गेली, याचे वर्णन केले आहे त्यातील काही मोजकी उदाहरणे उद्धृत करतो. एका पेट्रोलियम कंपनीचा अध्यक्ष हॉवर्ड हन्सन हा प्रचंड श्रीमंतीने आयुष्याच्या शेवटी वेडा झाला. अमेरिकेतील एक मोठा व्यापारी आर्थर क्युटन अखेरीस दिवाळखोर झाला. दिवाळे निघाल्यावर त्या धक्क्याने तो मरण पावला. तेथील एक मोठा श्रीमंत दलाल जेसी लिव्हरस मोर याने शेवटी आत्महत्या करून जीवन संपवले. प्रचंड पैसा मिळूनही त्यांना सुखाचे आयुष्य जगता आले नाही. सुखाने मरताही आले नाही.


या प्रकारची आपल्याकडील ही अनेक उदाहारणे सांगता येतील. पैसा मुळात वाईट नाही, पण त्याची अतिलालसा आणि त्याचा वापर करून आपण आपले व इतरांचे समाधान कसे टिकवता येईल, याचे शास्त्र न समजल्याने श्रीमंती असूनही अशांचा अंत वाईट अवस्थेत झालेला दिसून येतो. यासाठी ‘मना कामना सांडी रे द्रव्यदारा’ हा समर्थांचा उपदेश किती सार्थ आहे, हे समजेल. पैशांच्या अतिलालसेची काही उदाहरणे वर सांगितली आहेत. तोच प्रकार स्त्रियांच्या आकर्षणाबद्दल वासनेबद्दल सांगता येईल, जीवसृष्टी अबाधित राहावी, यासाठी सर्व सृष्टीत नर-मादी हे एकमेकांच्या आकर्षणाचा विषय ठरतात, हा निसर्गनियम आहे. तेव्हा पुरुषांना स्त्रियांचे आकर्षण असणे, हे अस्वाभाविक नाही.

तथापि या आकर्षणाचा अतिरेक होऊन त्याचे वासनेत परिवर्तन होणे, हे चारित्र्यदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या समाजविघातक आणि जीवाची हानी करणारे आहे. त्यामागील अस्वस्थता, समाजस्वास्थ्य व मनाचे स्वास्थ्य बिघडवू टाकते. पैशांची लालसा आणि विषयवासना यांना विकृत स्वरूप प्राप्त झाल्यावर त्या अवस्था माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. या वासनेमुळे जीवाला गर्भवासातील दुःखाचे डोंगर अनुभवावे लागतात. हे सांगून झाल्यावर श्लोकाच्या अखेरच्या ओळीत स्वामी मनाला सांगतात की, हे सज्जन मना, आता तूच यातून वाचव आणि माझी राघवाशी भेट घडवून आणि त्या भेटीने मी अखंड समाधानाची स्थिती अनुभवू शकेन. आपले हित आणि अहित करणारे मनच असते. ‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयो:’ असे एक संस्कृतवचन आहे. बंधनात टाकणारे मन आणि मोक्ष मिळवून देणारेही मनच असते. यासाठी आपल्या हिताचे आहे, ते मनाला सांगावे. पुढील श्लोकात समर्थांनी पारमार्थिकदृष्ट्या हितकरणासाठी मनाला वळवले आहे -


मना सज्जना हीत माझें करावें।
रघुनायका दृढ चित्तीं धरावें।
महाराज तो स्वामी वायुसुताचा।
जना उदरीं नाथ लोकत्रयाचा ॥22॥



आपल्याला कल्याणकारी गोष्ट स्वीकारण्यास मनाला सांगावे लागते. वस्तुत: मन चंचल असल्या कारणाने एका गोष्टीवर ते स्थिर राहत नाही. परंतु, मनाचा एक गुणविशेष असा की, आपल्या हितकारक गोष्टीची त्याला जाणीव झाल्यावर ते त्या दृष्टीने प्रयत्न करू लागते. यासाठी मनाला सांगावे की, या रघुनायकाला मनात घट्ट धरुन ठेव. आपल्या चित्तातून त्याला जाऊ देऊ नको. प्रा. बेलसरे म्हणतात की, “राम हे समर्थांचे आराध्यदैवत असल्याने रामरायाचे नाव सर्वत्र येते. तेथे त्यांना भगवंताविषयी सांगायचे असते.” म्हणून सर्व लोकांना उद्धरून नेणारा जो राम म्हणजेच भगवंत त्याला अंत:करणात धरुन ठेवणे इष्ट. रघुनायकाला आपल्या अंत:करणात घट्ट धरुन ठेवणारा हनुमंत आहे. बर्‍याच ठिकाणी छाती फाडून दाखवणार्‍या हनुमानाचे चित्र असते. त्यात हनुमानाच्या अंत:करणात राम-जानकी दाखवलेले असतात.

हनुमानाला रामाशिवाय काहीही प्रिय नाही. कथेकरी काही वेळा सुंदर कथा सांगतात. अशीच एक माझ्या ऐकण्यात आली. रावणाचा वध करुन सीतेसह राम अयोध्येला परतल्यावर लंकेत पराक्रम गाजवलेल्या योद्ध्यांसाठी रामाने समारंभ आयोजित करुन सर्वांचा यथोचित सत्कार केला.हनुमानाचा पराक्रम इतका मोठा होता की, त्याला काय बक्षिस द्यावे, असा सीतामाईंना प्रश्न पडला. अखेरीस त्यांना स्वत:ला प्रिय असलेली गळ्यातील सोन्याच्या मण्यांची माळ काढून त्यांनी हनुमानाला दिली. हा खूप मोठा बहुमान होता. मारुतीने आदरपूर्वक त्या माळेचा स्वीकार करुन त्यातील एकेक मणी दाताखाली चावून पाहायला सुरुवात केली. हनुमान म्हणाले, “माते, यात तर कुठेच मला राम दिसत नाही. माझा उद्धारकर्ता राम आहे. त्याच्याशिवाय अन्य काहीही मला प्रिय नाही.” या कथेचा भावार्थ इतकाच की, हनुमान अंतर्बाह्य राममय झालेला होता. यासाठी समर्थांना हनुमान अतिशय प्रिय होता. त्यामुळे रामाला चित्तात घट्ट धरुन ठेव, हे सांगताना स्वामींना सर्वप्रथम हनुमंताची आठवण झाली. या पुढील श्लोकांतून स्वामींनी फक्त रामाबद्दल बोलायला सांगून रामनामाचे महत्त्व विशद केले आहे.




सुरेश जाखडी

(क्रमश:)

svjakhadi @gmail.com

7738778322
Powered By Sangraha 9.0