नाशिकमधून जम्पिंग स्पायडरच्या नव्या प्रजातीचा शोध!

07 Apr 2022 18:42:32
new
 
 
मुंबई(प्रतिनिधी ) : नाशिकमधून जम्पिंग स्पायडरच्या जातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. शिवाय इतर दोन जातींचा उलगडा आंध्रप्रदेशातून करण्यात आला आहे. या तिन्ही जाती  'स्टेनेलुरीलस’ या कुळातील असून हे तिन्ही 'जम्पिंग स्पायडर' त्यांच्या डोळयांच्या विशिष्ठ रचना आणि सतत उडी मारण्याच्या गुणधर्मामुळे ओळखले जातात.
'स्टेनेलुरीलस' कुळातील हे नवीन कोळी जमिनीवर आढळून येतात. इतर छोट्या कीटकांवर आपला उदरनिर्वाह करतात. हे कोळी जैविक अन्नसाखळीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. नाशिकमधील सिन्नरमधून शोधण्यात आलेला कोळ्याचे नामकरण 'स्टेनेलुरीलस मारुसिकी' करण्यात आले आहे.  यापूर्वी याचा शोध २००१ मध्ये इराण मध्ये लागला असून या प्रजातीची ही भारतातून पहिलीच नोंद आहे. याव्यतिरिक्त आंध्रप्रदेशातून उलगडलेल्या 'स्टेनेलुरीलस सरोजिनी' या प्रजातीतून वेगेळ्या रंगाच्या कोळ्यांची नोंद केली गेली आहे.


संपूर्ण जगात 'स्टेनेलुरीलस' या पोटजातीमध्ये जवळपास ५० प्रजातींची नोंद आहे. त्यामधील १८ प्रजाती भारतीय उपखंडामध्ये आढळून येतात. जीवशात्र अभ्यासक राजेश सानप आणि अनुराधा जोगळेकर यांना 'स्टेनेलुरीलस व्याघ्री' आणि 'स्टेनेलुरीलस मारुसिकी' या प्रजाती सर्वप्रथम महाराष्ट्रातील सिन्नर येथे आढळल्या. तसेच जीवशास्त्र अभ्यासक किरण मराठे आणि वेन मॅडिसन यांना स्टेनेलुरीलस श्वेतमुखी आणि स्टेनेलुरीलस ताम्रवर्णी या प्रजाती आंध्रप्रदेशातील कुप्पम येथे आढळून आल्या. बाह्यांग परीक्षण केल्यानंतर यातील तीनही प्रजाती नवीन असल्याचे सिद्ध झाले. जीवशात्रज्ञ राजेश सानप यांच्याबरोबर वेन मॅडिसन, किरण मराठे, जॉन कॅलेब, आणि अनुराधा जोगळेकर यांनीही या संशोधनात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या संदर्भातील संशोधन वृत्त 'झुटॅक्सा' या संशोधन पत्रिकेमध्ये ७ एप्रिल, २०२२ रोजी प्रकाशित झाले. आकाराने लहान असलेल्या या कोळ्यांचा अभ्यास अजूनही अपुराच आहे. जीवसंस्थेतील त्यांचे महत्वाचे स्थान लक्षात घेता या कोळ्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे सानप यांनी सांगितले. 
 
या नव्याने शोधण्यात आलेल्या कोळ्यांचे नामकरण हे त्यांच्या विशिष्ट रंगांवरून केले गेले आहे.

tigerulis
 
स्टेनेलुरीलस व्याघ्री: संस्कृतमध्ये ‘व्याघ्र’ म्हणजे वाघ. वाघाप्रमाणेच या कोळ्याचा रंग नारिंगी असून त्याच्या अंगावर आणि पायावर काळे पट्टेआहेत, ज्यावरून हे नाव देण्यात आले.
 

shwet 
 
स्टेनेलुरीलस श्वेतमुखी: संस्कृतमध्ये ‘श्वेत’ म्हणजे पांढरा आणि ‘मुख’ म्हणजे चेहरा. या प्रजातीतील नराच्या तोंडावरील पांढऱ्या पट्ट्यावरून याला ‘श्वेतमुखी’ असे नाव देण्यात आले आहे.

 

tamra
 
स्टेनेलुरीलस ताम्रवर्णी: संस्कृतमध्ये ‘ताम्र’ म्हणजे तांबूस तर ‘वर्ण’ म्हणजे रंग. या कोळ्यांच्या तांबूस रंगावरून यांचे ‘ताम्रवर्णी’ असे नामकरण केले गेले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0